छोटा कार्टर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 09:03 AM2024-02-01T09:03:44+5:302024-02-01T09:04:07+5:30

Mount Everest: सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा पट्टीचा गिर्यारोहक, जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनेरी बर्फाच्या या पर्वतावरून सूर्याचं दर्शन घ्यावं, निसर्गाच्या अद्भुत कलाकारीत स्वत:ला विसरावं आणि तो क्षण आयुष्यभर आपल्या स्मरणात कैद करून ठेवावा, असं त्यांना वाटत असतं.

Little Carter at the base camp of Mount Everest! | छोटा कार्टर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर !

छोटा कार्टर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर !

सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा पट्टीचा गिर्यारोहक, जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनेरी बर्फाच्या या पर्वतावरून सूर्याचं दर्शन घ्यावं, निसर्गाच्या अद्भुत कलाकारीत स्वत:ला विसरावं आणि तो क्षण आयुष्यभर आपल्या स्मरणात कैद करून ठेवावा, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे अनेक सर्वसामान्य माणसंही माउंट एव्हरेस्ट सर करायचंच या उर्मीनं या पर्वताकडे झेपावतात. तिथला शेर्पा आणि ऑक्सिजनची सिलिंडर्स आपल्याला तारून नेतील, असा त्यांचा विश्वास असतो. माणूस तेवढाच जिद्दी असेल, निसर्गाची साथ असेल आणि सगळंच जुळून आलं तर ते काही वेळेस शक्यही होतं, पण बऱ्याचदा निसर्गाच्या या लहरीपणापुढे भल्याभल्यांनाही शरणागती पत्करावी लागते. त्यामुळे आजवर अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांनाही माउंट एव्हरेस्टवरच चिरसमाधी घ्यावी लागली आहे. पण तरीही जगभरात या पर्वताचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही. 

अनेक जण तर यासाठी अनेकदा प्रयत्न करतात. कारण आजवर अनेकांना माउंट एव्हरेस्टचं शिखर अगदी हातातोंडाशी असतानाही मोहीम सोडून द्यावी लागली आहे. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे कोणाचंच काही चालत नाही. शेर्पा आणि ऑक्सिजनच्या सिलिंडर्सनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं काम बऱ्यापैकी आवाक्यात आणलं असलं तरीही हे साहस अनेकदा तुमच्या प्राणांचीही मागणी करतंच. दि. २५ एप्रिल २०२२ हा दिवस तर माउंट एव्हरेस्टच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कारण या एकाच दिवशी इथे तब्बल २२ जणांना चिरसमाधी मिळाली होती. त्यात अर्थातच अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांचा समावेश होता. काही जणांनी तर याआधीही माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं ! 
माउंट एव्हरेस्टवर नुसतं एकदा पाऊल ठेवायचं तर आजही अनेकांना आपले प्राण गहाण ठेवावे लागतात, पण नेपाळच्या कामी रिता शेरपानं आतापर्यंत तब्बल २८ वेळा माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केलं आहे. सध्या तो ५४ वर्षांचा आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाणारा सर्वाधिक कमी वयाचा व्यक्ती म्हणून आजवर झेक रिपब्लिकच्या एका चार वर्षांच्या मुलाचं नाव घेतलं जात होतं, पण ते रेकॉर्ड नुकतंच एका दोन वर्षांच्या चिमुरड्यानं मोडलं आहे. स्कॉटलंडच्या या मुलाचं नाव आहे कार्टर डलास ! 

माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत कार्टर कसा पोहोचला याची कहाणीही रोमांचक आहे. कार्टरचे आई-वडील जेड आणि रॉस दोघेही पट्टीचे गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि भटके ! माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षीच त्यांनी स्कॉटलंड, आपली मायभूमी सोडली होती. त्यासाठी त्यांनी तिघांचीही ‘वन-वे’ तिकिटंच काढली होती. कारण आपण परत कधी जाऊ, कसं जाऊ हे त्यांनाही माहीत नव्हतं. आशियाच्या यात्रेवर ते निघाले होते. निघण्याआधी त्यांनी पैशांचा थोडा बंदोबस्त केला. आपलं घर भाड्यानं दिलं आणि नियमित काही पैसे मिळत राहतील याची व्यवस्था केली. सर्वांत पहिल्यांदा ते भारतात आले आणि मग नेपाळला गेले. ज्या दिवशी ते नेपाळला पोहोचले, त्याच दिवशी छोट्या कार्टरसह त्यांनी चढाईला सुरुवात केली. या दरम्यान कधी ते कार्टरचं बोट धरून त्याला चालवायचे, कधी तो स्वत:च त्यांचं बोट सोडून पळायचा, तर बऱ्याचदा त्या दोघांनीही आळीपाळीनं कार्टरला चक्क पाठीवर घेत बेस कॅम्पपर्यंतचा आपला ट्रेक पूर्ण केला. १७,५९८ फुटांपर्यंतची ही चढाई अर्थातच कस पाहणारी होती. कारण इतक्या उंचीपर्यंत पोहोचणं ही कुठल्याही अर्थानं सोपी गोष्ट नाही. शिवाय त्यांच्याबरोबर तर कार्टरही होता ! 

रॉस आणि जेड सांगतात, आमच्या सुदैवानं आमचा मुलगा कार्टरही लहानपणापासूनच निसर्गप्रेमी आहे. त्याला केवळ निसर्गच नाही, तर माणसंही खूप आवडतात. आशियाच्या प्रवासात अर्थातच माउंट एव्हरेस्ट हे आमचं प्रमुख आकर्षण होतंच. त्या वातावरणाचा सराव व्हावा आणि दमसास थोडा वाढावा म्हणून लांब श्वास घेण्याचा आणि योगाभ्यासाचा सराव आम्ही सुरू केला. माउंट एव्हरेस्टला मरणाची थंडी असते. बर्फाचा पर्वत म्हटल्यावर तेवढी थंडी असणारच. त्याचाही सराव व्हावा म्हणून घरी आम्ही रोज बर्फाच्या पाण्यानं अंघोळ करायला सुरुवात केली. अर्थातच कार्टरची अंघोळही याच पाण्यानं असायची! 

ना श्वासाचा त्रास, ना थंडीचा ! 
रॉस म्हणतो, सुरुवातीला आम्हाला जर शंका होती, पण एव्हरेस्टच्या मोहिमेबाबत कार्टर स्वत:च इतका आनंदी आणि उत्फुल्ल होता की मग आमचाही उत्साह दुणावला. थोड्या अधिक उंचीवर पोहोचल्यावर आम्हा नवरा-बायकोला श्वास घ्यायला काही वेळा त्रास झाला, पण कार्टर एकदम व्यवस्थित होता. बेस कॅम्पच्या आधीच्या गावात दोन डॉक्टर होते. त्यांच्याकडूनही आम्ही तपासणी करुन घेतली होती, पण त्यांनीही सांगितलं, तुम्हा दोघांपेक्षाही कार्टर जास्त हेल्दी आहे !

Web Title: Little Carter at the base camp of Mount Everest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.