लॉकडाऊनने जागविला भूतकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:37 PM2020-04-11T12:37:28+5:302020-04-11T12:37:57+5:30
एडिटर्स व्ह्यू मिलिंद कुलकर्णी हसत हसत जगायचे की, रडत रडत...तुमचे तुम्हीच ठरवा असे कवीराज म्हणतात, ते या लॉकडाऊनच्या काळाला ...
एडिटर्स व्ह्यू
मिलिंद कुलकर्णी
हसत हसत जगायचे की, रडत रडत...तुमचे तुम्हीच ठरवा असे कवीराज म्हणतात, ते या लॉकडाऊनच्या काळाला यथार्थ लागू पडते. कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. ‘जान है तो, जहान है’ असे म्हणत सगळे त्याचे पालन करीत आहेत. ते पालन न केल्यास अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा आपल्याविरुध्द दाखल व्हायचा.
परवा एक मित्र फोनवर या कायद्यांविषयी माहिती देत होता. २००५ चा आपत्ती व्यवस्थापन कायदा, १८९७ चा ( हो, इंग्रज काळातील) भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १९७३ ची फौजदारी प्रक्रिया संहिता १९५१ चे महाराष्टÑ पोलीस अधिनियम यांचा अंमल सध्या सुरु आहे. घराबाहेर पडलो तर पोलिसदादाचा दंडुका बसेलच, पण आपले वाहन जमा होईल. गुन्हा दाखल होईल आणि दंडदेखील होईल. नवापूरला मास्क लावला नाही, म्हणून एकाला पाच दिवसांच्या कैदेची शिक्षा झाली. ही झाली कायद्याची सक्ती, पण हे सगळे आपल्या आरोग्यासाठी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. ते आम्ही समजून घेतले नाही, तर सगळे मुसळ केरात जाईल.
आता कुरकूर करणारे, रडतराऊंबद्दल कितीही चर्चा केली तरी ती कमीच होईल. त्यापेक्षा लॉकडाऊनच्या काळात हसत हसत जगणाऱ्यांविषयी बोलूया. पोटापाट्यासाठी नोकरी -व्यवसाय करणाºयाला अशी सक्तीची सुटी मिळणे अवघड असते. मरण-तोरणाचा प्रसंग असला तरच अशी सुटी घ्यावी लागते, अन्यथा सगळेच कामाला जुंपलेले असतात. यात पुन्हा लिंगभेद नाही. नोकरदार वा गृहिणी अशा दोन्ही प्रकारच्या महिलांना सारखेच कष्ट करावे लागतात. पण संपूर्ण कुटुंब घरी असताना घरगुती कामांचे नियोजन करण्याचे काम कर्त्या व्यक्तीने केल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. मुलांना टीव्ही, गेम किती खेळायचा याचाही कंटाळा येतो. म्हणून घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घेण्यात येते. अगदी भांडी पुसण्याचे काम मुलांना शिकविले तर ते व्यवस्थित करतात. एक मित्र सांगत होता, मुलांना हे काम शिकविले, त्याचबरोबर या कामातही रंगत यावी म्हणून त्यांना भांड्यांवरची नावे वाचायला सांगितली. लग्न, मौंज, दिवाळी, बारसे अशा वेगवेगळ्या सणांच्यावेळी भेट म्हणून दिलेल्या भांड्यांनी भूतकाळ जागविला. अमूक यांनी तमूक यांना निमित्ताने सप्रेम भेट दिले, असे वाचत मुले अमूक कोण, कुणाचे कोण, असा नातलगांचा परिचय करुन देण्याचा सुंदर कार्यक्रम मग घरात सुरु होतो. आत्या, मावशी, चुलत बहीण, मामेभाऊ, दीर, नणंद अशा नात्यांची ओळख त्यांना होते. आपणदेखील या नातलगांच्या स्मृतीमध्ये रमतो. भांडी लावण्याचे कामदेखील होते, आणि भूतकाळातील स्मृती जागविल्या जातात. पुढे जाऊन या नातलगांना फोन लावून ख्यालीखुशाली विचारली जाते, ती वेगळीच.
दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या एकेकाळी प्रसिध्द असलेल्या मालिका सध्या दाखविल्या जात आहेत. जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासोबतच घरातील लहानग्यांना भारतीय संस्कृतीतील या महान ठेव्याची ओळख करुन दिली जात आहे. एका नातलगांच्या जुळ्या मुली सकाळी लवकर उठून स्रान आटोपून रामायण बघायला बसतात. एरवी सुटीच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत झोपणाºया या मुली आता रोज ‘देवा’चे बघण्यासाठी शूचिर्भूत होतात, हे वेगळे चित्र नाही काय?
अभ्यास कर, मैदानावर खेळायला जा, नृत्याच्या क्लासला सोडायला येतो, असा सातत्याने मुलांच्या पाठी धोशा लावणाºया पालकांना आता त्यांच्यासोबत खेळायला बसावे लागते. कॅरम, लगोरी, सापशिडी, चौपट, लंगडी, आंधळी कोशिंबीर असे खेळ शिकवावे लागत आहे. चांदोबा, किशोर ही मासिके कपाटातून बाहेर आली असून त्यांची ओळख मुलांना करुन दिली जात आहे. मुलांसोबत पालकदेखील बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमत आहे. लॉकडाऊनचा हा फायदा नजरेआड करुन कसे चालेल?