विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा
By यदू जोशी | Published: April 6, 2024 09:53 AM2024-04-06T09:53:20+5:302024-04-06T09:54:15+5:30
Amravati lok sabha constituency: अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा.
- यदु जोशी
अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा. समाज प्रबोधनाच्या चळवळीत संत गाडगेबाबांनी जे केले तेच निरपेक्ष भावनेने राजकारणही करता येते हे काकांनी कृतीतून सिद्ध केले. कितीही सत्तापदे मिळाली तरी अभावात जगणे हा त्यांचा स्थायिभाव होता. दोन वेळा अचलपूरचे आमदार होते.
१९८९ ची लोकसभा निवडणूक लागली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या उषाताई चौधरी रिंगणात होत्या. इतर सर्वपक्षीयांनी (त्यात काही काँग्रेस नेतेही होते) सुदामकाकांना गळ घातली; तुम्ही लढले पाहिजे. ते उभे राहिले आणि फाटक्या माणसांपासून सगळ्यांनी आपणच उमेदवार असल्याचे मानून ती निवडणूक लढवली. काकांजवळ पैसे होते कुठे? रिक्षावाले, भाजीवाले, हातठेलेवाल्यांपासून सगळ्यांनी दोन रुपये, पाच रुपये गोळा करून निवडणूक निधी उभा केला. आज ज्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक पैसा वाटतात अशा गरिबांनी काकांसाठी पैसा उभा केला. प्रचारात फारशा गाड्या वगैरे नसायच्या; पण काकांच्या प्रचारातील गाडी पेट्रोलपंपावर आली की बिनापैशांनी टंकी फुल व्हायची. काही दुकानदार ग्राहकाला बदाम खायला द्यायचे अन् म्हणायचे, ‘खाओ बदाम, लाओ सुदाम.’ हयातभर रस्त्यावरची लढाई लढलेल्या या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा सामान्य माणूस हाच स्टार प्रचारक होता. काका कम्युनिस्ट पक्षाचे होते; पण कोणीही त्यांचा पक्ष पाहिला नाही, जात विचारली नाही. प्रभाकरराव वैद्य, बाळासाहेब मराठे अशा अमरावतीतील पितृतुल्य व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत मतदारसंघातील भिंतींवरचा एक नारा आजही अमरावतीकरांच्या लक्षात आहे, ‘तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा.’
साधेपणा, त्याग, नैतिकता हे काकांसाठी बोलण्याचे नाही तर कृतीचे विषय होते. ते अनवाणी फिरत, मग कोणी तरी त्यांना स्लिपर, चप्पल घेऊन देई. मग कोणी अनवाणी दिसला की काका त्यांना चप्पल देऊन टाकत. अखंड समाजसेवेला वाहून घेतलेल्या या नेत्याला लोक विचारायचे, ‘काका! तुम्ही लग्न का नाही केले?’ काका म्हणायचे, ‘अरे बेटा, कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिले.’ अमरावतीत नमुना गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहायचे. तिथेच सगळ्यांना भेटायचे, कोणताही आडपडदा नव्हता, सामान्य रिक्षावालाही त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलू शकत असे, आजच्या नेत्यांकडे पाहून हे सगळे खरे वाटणार नाही. लोकसभेला ते १ लाख ४० हजार २३९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्यांच्या विजयी मिरवणुकीत लोकांनी आपापल्या परीने गोडधोड वाटले, सुदाम्याचे पोहे अन् साखरही वाटली. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
सुदामकाकांच्या ठायी पारदर्शकता किती असावी? त्यावेळी खासदारांना दहा गॅस कनेक्शन आणि दहा टेलिफोन कनेक्शन वाटण्याचा कोटा दिला जायचा. सुदामकाकांनी आपलातुपला न करता त्यांच्याकडे ते मागण्यासाठी आलेल्या लोकांची निवड ईश्वरचिठ्ठीने केली. स्वत:साठी काहीही ठेवून घेतले नाही. सामान्यांशी कधीही नाळ तुटू न देणाऱ्या या सत्शील नेत्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, पण ते गेले त्या दिवशी लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी होते, हीच त्यांची कमाई होती.