औरंगजेब, दुर्योधन, जल्लाद आणि बरेच काही... मोदींच्या जाळ्यात काँग्रेस अडकली!
By संदीप प्रधान | Published: May 10, 2019 06:05 PM2019-05-10T18:05:40+5:302019-05-10T18:09:10+5:30
मोदी यांनी लावलेल्या पिंजऱ्यात काँग्रेस अडकली हे मान्य करावे लागेल.
>> संदीप प्रधान
रस्त्यात चुकून धक्का लागला आणि बाचाबाची सुरू झाली किंवा रेल्वेच्या डब्यात सीटवरून झगाझगी सुरू झाल्यावर परस्परांना केले जाणारे गालीप्रदान ऐकण्याकरिता व प्रकरण हातघाईवर केव्हा जाते व मनोरंजन कधी सुरू होते ते पाहण्याकरिता जागीच खिळणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. त्याचबरोबर शालेय जीवनापासून अगदी कार्यालयीन कारकिर्दीपर्यंत आपल्या मित्रांना, शत्रूंना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना, बॉसला त्याच्या शारीरिक व्यंगावरून, रंगावरून, लकबीवरून, सवयीवरून, स्वभावावरून वगैरे वगैरे नावे ठेवणे हेही भारतीयांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आपल्याकडे नावे पूर्ण न घेता त्याचा अपभ्रंश करून उच्चारण्याची सवय आहे. त्यामुळे देशपांडेंचा पांड्या केला जातो आणि समीरचा सम्या होतो. थोडक्यात काय तर अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत असतील तरी आपण त्यामध्ये दोन घटका करमणूक शोधतो. जर परस्परांची उणीदुणी काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी, संजय निरुपम, राबडीदेवी, मणिशंकर अय्यर आदी महनीय व्यक्ती असतील तर करमणूक अधिक होते. शिवाय ही बिनपैशाची करमणूक असल्याने त्याचा आनंद अधिकच.
लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे संपले असून उर्वरित दोन टप्प्यांचा प्रचार व मतदान बाकी आहे. उत्तर प्रदेशच्या रणभूमीत जेव्हा संग्राम सुरू झाला तेव्हा तेथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी या उमेदवार आहेत व प्रियंका गांधी त्यांचा प्रचार करीत आहेत हे पाहिल्यावर नरेंद्र मोदी यांनी स्व. राजीव गांधी यांना लक्ष्य केले. एलटीटीईच्या निर्घृण हल्ल्यात राजीव यांनी प्राण गमावले, देशाकरिता बलिदान दिले हे दुर्लक्षून मोदी यांनी त्यांना भ्रष्टाचारी ठरवण्याचा खटाटोप सुरू केला. गांधी कुटुंबीयांच्या पर्यटनाकरिता विराट युद्धनौकेचा वापर केला गेला, असा जावईशोध लावून जुने कोळसे उगाळण्यास सुरुवात केली. मोदी यांनी हे हेतूत: केले. उत्तर प्रदेशात बसपाच्या मायावती व समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या आघाडीशी मोदींचा मुख्यत्वे सामना आहे. मात्र त्या दोघांऐवजी मोदी हे काँग्रेस व गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करीत आहेत. कदाचित भविष्यात गरज भासली तर सपा-बसपाच्या या आघाडीत फूट पाडून त्यांच्यापैकी एका पक्षाची मदत सरकार स्थापनेकरिता किंवा भविष्यात टिकवण्याकरिता घ्यावी लागेल हे हेरून त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. महाराष्ट्रात प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करून मोदींनी पवार यांना दखलपात्र ठरवले तर काँग्रेसला बेदखल केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आपल्याला कसे कुर्ते व रसगुल्ले पाठवतात हे सांगण्याचा किंवा ममतांनी चापट लगावून देण्याच्या केलेल्या विधानावर तुमची चापट मी आशीर्वाद म्हणून स्वीकारेन ही मोदींची टिप्पणी हाही दीदींची पराकोटीची नाराजी ओढवून न घेता काँग्रेसपासून अन्य विरोधकांना वेगळे पाडण्याच्या रणनीतीचा भाग आहे. कायम बहुमताचे सरकार चालवलेल्या मोदींना मोठ्या आघाडीचे सरकार चालवणे कठीण जाईल ही पक्षातील काही नेत्यांच्या मनातील शक्यता खोटी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे.
काँग्रेसनी व मुख्यत्वे राहुल गांधी यांनी राफेलवरुन आणि 'चौकीदार चोर है' या प्रचाराद्वारे मोदींना लक्ष्य केल्याने अखेरच्या टप्प्यात मोदींनीच प्रचाराचा स्तर घसरवून राफेल, बालाकोट वगैरे मुद्द्यांना प्रचारातून हद्दपार केले. राजीव गांधी यांच्यावरील टीका जिव्हारी लागल्याने प्रियंका गांधी यांनी मोदींना दुर्योधनाची उपमा दिली तर संजय निरुपम यांना त्यांच्या ठिकाणी औरंगजेब दिसला. (गेली साडेचार वर्षे सत्तेत भाजपचा हात हातात घेऊन बसलेल्या शिवसेनेलाही मोदी-शहा यांच्यामध्ये चोर चौकीदार व अफझलखान दिसला होता. शिवसेनेनी पुन्हा युतीच्या आणाभाका घेतल्याने बंद झालेल्या या उपमा-अलंकारांची उणीव अखेरच्या टप्प्यात भरून काढली गेली) त्यामुळे मोदी यांनी लावलेल्या पिंजऱ्यात काँग्रेस अडकली हे मान्य करावे लागेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांना उद्देशून 'नीच' शब्दाचा वापर केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने पराभूत केल्याचा संदर्भ देत मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अय्यर यांनी तो शब्द वापरला होता. मात्र मोदी यांनी अय्यर हे उच्च जातीचे असून आपण खालच्या जातीचे असल्याने ते आपली निर्भत्सना करीत असल्याचा कांगावा केला. हा समस्त गुजरातचा अपमान आहे, असा रंग देऊन काँग्रेसवर डाव उलटवला. परिणामी राहुल गांधी यांनी अय्यर यांना माफी मागण्यास भाग पाडले. मोदी हे आपल्या विरोधकांवर खरे-खोटे आरोप अत्यंत बेमालूमपणे करतात आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे चलाखीने राजकारण करतात.
दुसरे मोदी यांचे वैशिष्ट्य असे की, विरोधकांनी एखादा आरोप केल्यावर त्याची सत्यता कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करण्याकरिता ते आपल्या परिवारातील काही मंडळींमार्फत न्यायालयापासून वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांमागे लावतात. 'सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर है', असा निष्कर्ष काढल्याचे आरोप प्रचाराच्या रणधुमाळीत करून मोकळे झालेल्या राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्रावर माफी मागायला लावेपर्यंत मोदींनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. मागील निवडणुकीच्यावेळी भिवंडीत राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभागी असल्याचे जे विधान केले होते. त्याबाबतही असेच न्यायालयीन खटल्याचे शुक्लकाष्ठ राहुल यांच्या पाठीमागे लावून दिले आहे. त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर विरोधकांना बोलताना दहावेळा विचार करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण करायची आणि दुसरीकडे आपल्याला हव्या त्या आरोपांना उत्तर द्यायला लागेल, असा बंदोबस्त करायचा ही मोदींची रणनीती आहे.
बहुमताचे सरकार व त्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीशी केंद्रीभूत राजकारण याचाही हा परिणाम आहे. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा डावे, उजवे, मधले या साऱ्यांच्या शत्रू इंदिरा गांधी याच होत्या. इंदिरा गांधी यांच्यावर चिखलफेक करण्यात येत होती. त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जात होत्या. त्यामुळेच विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना इंदिरा गांधी यांनी 'मै कहती हूँ गरिबी हटाओ और वो कहते है इंदिरा हटाओ', असे विधान केले होते. अर्थात त्या काळात बहुतांश नेते हे सुसंस्कृत असल्याने राजकारणाची धार ही तीव्र असली तरी दोन्हीकडून तिखट शब्दांचे सध्या होत आहे तेवढे आदानप्रदान होत नव्हते.
देशातील जनता याकडे केवळ दोन क्षणांची करमणूक म्हणून पाहते. कारण जनतेचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न गेल्या पाच वर्षांत बिकट बनले असून भविष्यात ते आणखी बिकट बनणार हे उघड आहेत.