प्रचारकी फंड्यांना प्रारंभ!

By किरण अग्रवाल | Published: April 4, 2019 08:12 AM2019-04-04T08:12:28+5:302019-04-04T08:40:33+5:30

राजकीय पक्षांकडून अभिनयादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते त्यामागील हेतू स्पष्ट असतो तो म्हणजे, जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून जागा राखणे.

lok sabha election 2019 Hema Malini in full campaign mode, seen working in field with workers harvesting wheat crop | प्रचारकी फंड्यांना प्रारंभ!

प्रचारकी फंड्यांना प्रारंभ!

किरण अग्रवाल

नेहमीपेक्षा वेगळे काही घडते, तेव्हा तो चर्चेचा अगर माध्यमांतील बातमीचा विषय होतो; म्हणून बातमीत येऊ पाहणारे अशा वेगळेपणाच्या शोधात असतातच. निवडणुकीच्या राजकारणातही ते प्रकर्षाने पाहावयास मिळते, कारण माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याबरोबरच मतदारांशी जवळीक साधण्याचे कामही त्यातून साधता येते. भाजपाच्या खासदार हेमामालिनी या मुळातच अभिनेत्री असल्याने त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान शेतातील गहू कापून त्याच्या पेंढ्याही बांधून दिल्याच्या प्रकाराकडे असा प्रचारकी फंडा म्हणूनच बघता यावे, अन्यथा वाढत्या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडून येत असताना त्यांच्या दारावर गेल्याचे न दिसलेल्या हेमामालिनी अशा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेल्या दिसल्या नसत्या.

राजकीय पक्षांकडून अभिनयादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते त्यामागील हेतू स्पष्ट असतो तो म्हणजे, जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून जागा राखणे. यात बऱ्याचदा यशही लाभते कारण ते आपल्या कलागुण वैशिष्ट्यांमुळे अगोदरच मतदारांच्या मनात पोहोचलेले असतात. ती जवळीक मतपरिवर्तनासाठी कामी येते. पण, सेलिब्रिटीजमुळे त्या त्या राजकीय पक्षांना संबंधित जागेवर विजय मिळवणे सोपे होत असले तरी, मतदारांचे प्रश्न सोडविण्यात हे निवडून गेलेले सेलिब्रिटीज यशस्वी ठरतात का, हा प्रश्नच ठरावा आणि मग तसे होत नसताना किंवा एरव्ही अभिनय बाजूला ठेवून सामान्यांचे प्रश्न मार्गी लावताना न दिसलेले राजकारणातील अभिनेते वा अभिनेत्री, प्रचाराच्या दरम्यान वेगळे काही करून चर्चेत येऊ पाहतात तेव्हा त्यातून त्यांनाही राजकारणाचीच हवा लागल्याचे स्पष्ट होऊन जाते. हेमामालिनी यांच्याबाबतीतही तेच वा तसेच घडल्याचे म्हणता येणारे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हेमामालिनी यांनी शेतकाम करणाऱ्या महिलांमध्ये प्रचार करताना गहू कापून देण्याचा प्रचारकी फंडा राबवला. पण, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी संसदेत खासदारकी गाजवल्याचे कधी दिसून आलेले नाही. ‘पेरिओडिक लेबर फोर्स सर्व्हे-२०१८’ची आकडेवारी अलीकडेच समोर आली आहे, ती पाहता ग्रामीण भागातील महिलांचा जो रोजगार २००४-०५ मध्ये ४९.४ टक्के होता तो घटून २०१७-१८ मध्ये निम्म्यावर म्हणजे २४.६ टक्क्यांवर आला आहे. काम करण्यायोग्य ठरविल्या गेलेल्या १५ ते ५९ या वयोगटातील महिला मोठ्या संख्येने बेरोजगार झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. गहू काढणी करणा-या शेतकरी भगिनींची कणव बाळगून प्रचारादरम्यान हे शेतकाम करून दाखवणाऱ्या हेमामालिनींनी या महिलांच्या हाताचे रोजगाराचे काम संपत चालल्याकडे खासदार म्हणून कधी लक्ष पुरवले असते तर ग्रामीण भागातील बाजार व अर्थव्यवस्था अधिक भक्कम होण्यास नक्कीच मदत झाली असती; पण तसे न होता पडद्यावरील अभिनयाप्रमाणे प्रचारातही अभिनयच करताना त्या दिसून आल्या.

अर्थात, सेलिब्रिटीज हे अधिकतर अभिनय क्षेत्रातीलच राहात असल्याने त्यांचा अंगभूत अभिनय समजून घेता यावा, मात्र अनेकदा राजकीय नेतेही त्यात मागे राहात नसल्याचे दिसून येते. नकलाकारी हा असाच अभिनय प्रकार. राजकीय व्यासपीठांवरून शिवसेनाप्रमुखांनी विरोधकांची खिल्ली उडवत केलेल्या नकला आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे व छगन भुजबळ सध्या अनेक सभा व बैठका गाजवताना दिसत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील प्रचाराचा विचार करता, त्या-त्या राज्यांमध्ये तेथील वेशभूषा करून व तेथील स्थानिक भाषेत ‘मित्रो और भाईयो, बहनो...’ करण्याचे फंडेदेखील बघायला मिळतातच ना ! तेव्हा, मतदारांशी जवळीकता साधण्याचे हे फंडे यापुढच्या काही दिवसात अधिक वाढलेले दिसून येतील. मतदारांनीच निर्णय घ्यायचाय की, या प्रचारकी फंड्यांना भुलायचे का आपले प्रश्न संसदेत मांडून ते सोडवून घेऊ शकण्याची क्षमता असणाऱ्यांना तेथे निवडून पाठवायचे!  

 

Web Title: lok sabha election 2019 Hema Malini in full campaign mode, seen working in field with workers harvesting wheat crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.