Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 03:33 PM2019-03-30T15:33:09+5:302019-03-30T15:34:43+5:30

सुसंस्कृत राजकारणाचा ‘लातूर पॅटर्न’ 

Lok Sabha Election 2019: History reminds... Latur's historical tussles on ideological issues | Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

Next

- धर्मराज हल्लाळे

लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली लढत झाली ती शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे पी.जी. पाटील यांच्यात. या लढतीत भाई उद्धवराव पाटील यांनी बाजी मारली. पुढे १९८० पासून २००४ पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी सात वेळा या मतदारसंघाचे विजयी नेतृत्व केले. देशपातळीवर मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. वैयक्तिक टीकेचा तर विषयच नसायचा. पक्षाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण ते मतदारांना पटवून सांगत असत. जातीय समिकरणांचा कधी मेळ घातला नाही. त्यामुळेच शिवराज पाटील चाकूरकर १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ सातवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. एस. काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील, जनता दलाचे डॉ. बापूसाहेब काळदाते, भाजपाचे डॉ. गोपाळराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

१९८४ ची काँग्रेस विरुद्ध एस. काँग्रेस ही लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एस. काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पद्मसिंह पाटील यांना उतरविले. या निवडणुकीत चमत्कार होईल, असे राजकीय अंदाज बांधले गेले. परंतु, या तुल्यबळ लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार १२९ तर चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४३६ मते मिळाली. ७८ हजार ३३७ मतांनी चाकूरकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. १९८९ ला डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी चाकूरकरांच्या विरोधात तुल्यबळ लढत दिली. काँग्रेस विरुद्ध जनता दल अशी दुरंगी लढत झाली. त्यात चाकूरकर यांनी ३ लाख ४ हजार ७३३ मते घेऊन विजय मिळविला. तर बापूसाहेब काळदातेंना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती. त्यानंतर १९९६ ला बापूसाहेब काळदाते पुन्हा चाकूरकरांच्या विरोधात उतरले. समोर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे डॉ. गोपाळराव पाटील होते. तिरंगी लढत झाली. तिघेही दिग्गज. कोण बाजी मारणार, असा प्रश्न होता. महाराष्ट्रात जनता दलाचे वारे होते. त्यामुळे राजकीय विश्लेषक याच अंगाने अंदाज बांधत होते. पण या तिरंगी लढतीतही शिवराज पाटील चाकूरकर यांनी बाजी मारली. २ लाख ७९ हजार ७७५ मते त्यांनी घेतली. गोपाळराव पाटील २ लाख ४०३ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर बापूसाहेब काळदाते यांना १ लाख ३८ हजार ७२५ मते मिळाली अन् ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जातीय समिकरणे नाहीत, एकमेकांची उणीदुणी नाही की, व्यक्तिगत टीका नसलेल्या या लढतीने सुसंस्कृत आदर्श पाया रचला आहे. 

१९७७ ला अस्तित्वात आलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि वैचारिक मुद्यांवर लक्षवेधी लढती झाल्या असून, सुसंस्कृत राजकारणाचा लातूर पॅटर्न म्हणून या लढतींकडे आदराने पाहिले गेले आहे. वैयक्तिक टीकेचा लवलेश नाही की, एकमेकांची उणीदुणी नाहीत. केवळ विकास आणि राजकीय मुद्यांवर लढण्याची परंपरा लातूर लोकसभा मतदारसंघाने देशात निर्माण केली आहे. 

विकास अन् पक्षाचे धोरण...
लातूर लोकसभा मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. बापूसाहेब काळदाते, डॉ. गोपाळराव पाटील या दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या. प्रचारात कधी व्यक्तिगत टीका नाही, भाषाही सुसंस्कृत, राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा लवलेशही नाही. विकास आणि पक्षाचे राष्ट्रीय धोरण आपापल्या शैलीत त्यांनी मतदारांसमोर मांडले. ही परंपरा सहाव्या लोकसभा निवडणुकीपासून आहे. १९८० पासून चौदाव्या लोकसभेपर्यंत चाकूरकर काँग्रेसकडून लढत राहिले आणि ते सातवेळा विजयीही झाले.

Web Title: Lok Sabha Election 2019: History reminds... Latur's historical tussles on ideological issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.