विशेष लेख: माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, कंगनाच्या गळ्यात कमळांची माळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:27 AM2023-11-30T11:27:28+5:302023-11-30T11:30:34+5:30
Lok sabha Election 2024: अक्षय कुमार यांना दिल्ली, तर माधुरी दीक्षित यांना उत्तर मुंबई किंवा मथुरेतून उमेदवारी मिळू शकते. कंगना राणावत यांना मंडी मतदारसंघाचे तिकीट मिळेल, असे म्हणतात!
- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे; परंतु भाजपचे नेतृत्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अद्याप संपली नसतानाच लोकसभेत कोणकोण निवडून येऊ शकते, हे शोधण्यात व्यग्र आहे. पक्ष चित्रपट उद्योगातल्या नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे म्हणतात. हेमा मालिनी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्याने त्यांना यावेळी मथुरा मतदारसंघातून कदाचित तिकीट मिळणार नाही. सनी देओल यांनीही उमेदवारी घ्यायला नकार दिल्यामुळे भाजपला गुरुदासपूरमधून नवा चेहरा शोधावा लागत आहे. किरण खेर यांचीही प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्यामुळे चंडीगडमधून भाजपला त्यांच्या जागी पर्याय शोधावा लागणार आहे. अक्षय कुमार, कंगना राणावत आणि माधुरी दीक्षित यांच्यासारख्या तारे-तारकांची नावे सध्या घेतली जात आहेत. अक्षय कुमार हे पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पंतप्रधानांची मुलाखत घेतली होती. अक्षय कुमार यांना दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून उभे केले जाईल, अशी शक्यता आहे.
कंगना राणावत यांनी राजकारणात येण्याची इच्छा आधीच प्रकट केली आहे आणि काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांच्याविरुद्ध मंडी लोकसभा मतदारसंघात त्यांना उभे केले जाईल असे दिसते. माधुरी दीक्षित यांनाही उत्तर मुंबई किंवा मथुरेतून उमेदवारी मिळू शकते. मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव हे तीन भोजपुरी अभिनेते भाजपचे खासदार आहेत. पश्चिम बंगालचे लॉकेट चटर्जी आणि कन्नड फिल्म स्टार सुमनलता याही लोकसभेत आहेत. दक्षिणेकडून आणखी काही चित्रपट ताऱ्यांची भाजपला गरज असेल. क्रिकेट स्टार वीरेंद्र सेहवाग यालाही हरयाणातून लोकसभेसाठी उभे केले जाईल, अशी दिल्लीत चर्चा आहे.
जेष्ठ नेते शड्डू ठोकत आहेत
पक्षातील जुनी खोंडे मागे हटायला तयार नसल्यामुळे भाजप नेतृत्वाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या मंडळींसाठी कर्नाटकातील ताकदवर लिंगायत नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा आदर्श आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना शेवटी बसवलेच. त्यातून शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे शिंदे आणि इतरांनी प्रेरणा घेतली. येडियुरप्पा यांनी पदग्रहण केले तेव्हा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. येडियुरप्पा यांनी त्यांचे निष्ठावंत आर. अशोक यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला लावले. त्याचप्रमाणे जनता दल एसचे नेते एच. डी. देवेगौडा यांच्याशी पक्षाने केलेल्या आघाडीवरही बरेच जण नाखुश आहेत. तरी ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आहे. आपण फार काळजी करू नये, असे येडियुरप्पा यांना सांगण्यात आले आहे.
नितीश गेले कोशात!
लोकसंख्यावाढीच्या संदर्भात महिलांचा ‘अनुचित उल्लेख’ केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नितीश कुमार यांना माफी मागावी लागली, तेव्हापासून ते शब्दश: विजनवासात गेले आहेत. अगदी त्यांचे पक्षातले आणि बाहेरचे कट्टर निष्ठावंत नितीश यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याचे कुठे आणि कसे चुकले याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आहे. विसरभोळे नितीश कुमार एका कॅबिनेट मंत्र्याच्या घरी चहापानासाठी दोनदा कसे गेले, याच्या सुरस कथा बिहारमध्ये सध्या चघळल्या जात आहेत. त्यांनी चहाचे दोन घोट घेतले आणि ते काही काळासाठी तेथून निघून गेले; पुन्हा आले आणि त्यांनी म्हणे पुन्हा चहा मागितला. त्यांचे वागणे कमालीचे बदलले आहे, असे बऱ्याच जणांचे म्हणणे असून, अलीकडे नितीश अचानक भडकतात. एकेकाळी ते माध्यमांना फार प्रिय होते; परंतु आता जनता दरबारात ते पत्रकारांना बोलवेनासे झाले आहेत. महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही पत्रकारांना निमंत्रण नसते. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही रोजच्या कार्यक्रमांची माहिती दिली जात नाही. अलीकडेच नितीश यांनी हात जोडून पत्रकारांना निघून जायला सांगितले. हे करताना ते तीन वेळा त्यांच्यापुढे वाकले म्हणतात. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आता पाच विधानसभांच्या निकालानंतरच नितीश कुमार काय ते बोलतील... पाहूया!