नातीगाेती, नेता, पक्ष...! निवडणुकीत महत्त्वाचे काय?

By अतुल कुलकर्णी | Published: April 21, 2024 11:11 AM2024-04-21T11:11:40+5:302024-04-21T11:12:12+5:30

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. आणखी चार टप्पे बाकी आहेत. या कालावधीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गीतेचा अर्थ लावून घेत आहे.

Lok Sabha Election 2024 - Special article on current political affairs | नातीगाेती, नेता, पक्ष...! निवडणुकीत महत्त्वाचे काय?

नातीगाेती, नेता, पक्ष...! निवडणुकीत महत्त्वाचे काय?

अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई

प्रिय मतदारांनो,
समोर सगळे माझे नातेवाइक उभे आहेत. मी लढणार कसा? असा प्रश्न अर्जुनाने युद्धभूमीवरून श्रीकृष्णाला केला. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. हे आपल्याला लहानपणी शिकवले. मात्र, सध्याच्या राजकारण्यांना ती गीता सांगण्याची गरज दिसत नाही. जो आपला तो आपलाच... पण परका आपल्याकडे बघत असेल तर तोही आपला... शेजारचा आपल्या घरात डोकावत असेल तर तोही आपला... जो कोणी आपल्याकडे आशेने बघत असेल, तो प्रत्येक जण आपला... या वृत्तीने सध्या सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. आणखी चार टप्पे बाकी आहेत. या कालावधीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गीतेचा अर्थ लावून घेत आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं... हे ज्याने कोणी लिहून ठेवले असेल, त्याचे फोटो प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या ऑफिसमध्ये, बेडरूममध्ये जिथे शक्य असेल, तिथे लावले पाहिजेत. कारण या विधानावर विश्वास ठेवूनच सध्या प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता वागत आहे. 

आधी देश, नंतर पक्ष, सगळ्यात शेवटी मी, असे भाजपचे बोधवाक्य आहे. काँग्रेसचे असे कुठले बोधवाक्य नाही. तर निवडून येणाऱ्या सुभेदारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. शिवसेना, मनसे दोघेही ठाकरे या नावावर चालतात. मात्र, या लोकसभा निवडणुकीत अशा बोधवाक्यांना, भूमिकेला काहीही महत्त्व उरलेले नाही. एकमेकांवर टोकाची टीका करून निवडून आलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीने काही दिवसांचा संसार थाटला. त्यातून काडीमोड घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिघांनी दुसरा संसार थाटला. त्यानंतर पुन्हा दोन घरांत उभी फूट पडली आणि दोनची चार घरे झाली. त्यातली दोन दुसरीकडे गेली, तर दोघांनी तिसरा घरोबा केला. हे सगळे कमी म्हणून की काय, लोकसभा निवडणुकीत कोण कोणासोबत गेले आहे? कोण कोणासोबत टिकून राहणार? हे कोडे सोडवायला प्रत्यक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी त्याचे डोके भंजाळून जाईल. तुम्ही म्हणाल, आम्ही अतिशयोक्ती करत आहोत, पण असे काही नाही. 

फार दूर कशाला, धाराशिवपासून सुरुवात करू. त्या ठिकाणी उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर खासदार आहेत. तो मतदार संघ अजित पवार गटाला हवा होता. त्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटात प्रवेश करायला लावला. प्रवेश झाल्याबरोबर लगेच त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारीही दिली गेली. एवढ्या गतीने तर पक्षाचा सामान्य कार्यकर्ता देखील त्याच्या गल्लीचा पक्षप्रमुख होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल, एखाद्या उदाहरणाचा विनाकारण बाऊ करू नका... तर आणखी काही उदाहरणे सांगू का... 

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात होते. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि लगेच त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली गेली. ज्या दिलीप वळसे-पाटील यांनी आढळराव पाटलांना एके काळी प्रचंड विरोध केला. त्यांचाच प्रचार कसा करायचा, या विचारात मग्न झालेले दिलीप वळसे-पाटील आता थेट दवाखान्यात ॲडमिट आहेत. त्यामुळे ते प्रचार करणार की नाहीत हे आढळराव पाटलांना माहिती नाही. रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राजीव पारवे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करत थेट उमेदवारी मिळवली. तर अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेल्या आ. नीलेश लंके यांना तत्काळ अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

वर्धा येथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळाली, तर अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या बजरंग सोनवणे यांना बीडमधून शरद पवार गटाने उमेदवारी दिली. भिवंडी खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय आहे, असे म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे अनेक पक्ष फिरत फिरत शरद पवार गटात येताच त्यांना उमेदवारी जाहीर झाली.
ही अशी एवढी उलथापालथ एकट्या अजित पवार आणि शरद पवार गटात झाली आहे. शिंदेसेनेतही ज्या तेरा खासदारांनी नव्या सरकारमध्ये साथ द्यायची ठरवली, त्यातील सहा जण घरी बसले आहेत. 

भाजपचे नेते एकमेकांना भेटले की, आधी तुम्ही कोणत्या पक्षात होतात... आणि आणखी कुठे जाणार आहात का? असे विचारतात म्हणे... त्या पक्षात मूळ भाजपवासी परके झाल्याची भावना अनेक नेत्यांमध्ये आहे.  पूर्वी निवडणूक विचारांवर लढली जायची. ताई, माई, अक्का... विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का... अशा घोषणा त्या काळी दिल्या जात होत्या. आता विचारापेक्षा नात्यागोत्यांचे, जातीपातीचे, आपल्या तुपल्याची गणिते मांडून मतदान होते. त्यावेळी साने गुरुजींचा जमाना होता... आता नाणे गुरुजींचा जमाना आला आहे. त्यामुळे सानेगुरुजींच्या विचारावर श्रद्धा ठेवायची की रंगीत कागदावर छापलेल्या महात्मा गांधींच्या फोटोवर अधिक प्रेम करायचे..? हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते..?
- तुमचाच, 
बाबूराव.

Web Title: Lok Sabha Election 2024 - Special article on current political affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.