लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : धार्मिक ध्रुवीकरणाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:24 AM2019-05-24T04:24:57+5:302019-05-24T04:25:24+5:30

भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथील शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले. हे सारे या देशात प्रथमच घडले. यापूर्वी असे कधी पाहावयास मिळाले नव्हते.

Lok Sabha election result 2019: The success of religious polarization | लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : धार्मिक ध्रुवीकरणाचे यश

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : धार्मिक ध्रुवीकरणाचे यश

Next

- पृथ्वीराज चव्हाण
(माजी मुख्यमंत्री)

मागील २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. आजच्या निकालाचे कल पाहता भारतीय जनता पक्षाला २0१४ सारखाच विजय मिळाल्याचे दिसून येत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन.

२0१४-१९ या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत तीन मुद्दे उल्लेखनीय ठरतात. १) नोटाबंदीसारख्या अविचारी निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशाची झालेली अपरिमित हानी, २) सामाजिक क्षेत्रात धर्मा-धर्मामध्ये आणि जातींमध्ये वाढलेला तणाव आणि ३) राजकीय विरोधकांना शत्रू ठरवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे व वेळप्रसंगी सीबीआय, ईडीसारख्या संस्थांमार्फत त्रास देणे. भ्रष्टाचारमुक्त भारत, सर्वांगीण विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकार निवडून आले होते. परंतु संसदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवूनदेखील सर्वच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अयशस्वी ठरले.

२0१४ साली मोदी सरकारला ३१ टक्के मते मिळाली होती तर उर्वरित ८९ टक्के मते विरोधी पक्षांमध्ये विखुरली गेली. मोदी सरकारचे अपयश आणि विरोधकांची विभागली गेलेली मते या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक जाहीरनामा आणि लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्षवादी पक्षांची व्यापक आघाडी हे महत्त्वाचे प्रयत्न होते. त्याचसोबत मागील पाच वर्षांत उद्ध्वस्त झालेली कृषी अर्थव्यवस्था, बेरोजगारी हे सर्व विषय जनतेसमोर घेऊन जाताना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना चांगला निकाल अपेक्षित होता.
परंतु, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथील

शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले.
प्रज्ञासिंह ठाकूर यासारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीला पक्षात घेऊन तिकीट देण्यात आले आणि त्यांमार्फत शहिदांचा अपमान करण्यात आला. विखारी वक्तव्ये करून धार्मिक ध्रुवीकरणाचा पुरेपूर प्रयत्न केला. या सगळ्याची वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण तसे झाले नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.
याउलट काँग्रेस पक्षाने राफेल खरेदीतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी अर्थव्यवस्था आणि शेतकरी आत्महत्या अशा प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. प्राथमिक आकड्यांवरून हेदेखील दिसून येत आहे की महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपला झाला. आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या पराभवाचे आत्मचिंतन करून येणाऱ्या काळात जनतेसमोर अधिक प्रभावीपणे कसे जाता येईल याची रणनीती पक्षाला स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन ठरवावी लागेल.

Web Title: Lok Sabha election result 2019: The success of religious polarization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.