Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

By रवी टाले | Published: June 6, 2024 09:47 AM2024-06-06T09:47:53+5:302024-06-06T09:49:24+5:30

Lok Sabha Election Result 2024 : आज धक्का बसला असला, तरी स्वपक्षाला २४० पेक्षा जास्त जागा मिळवून देण्याचा करिश्मा नरेंद्र मोदींनी सलग तीनवेळा करून दाखवलेला आहे, हे विसरता येणार नाही!

Lok Sabha Election Result 2024 : Brand Modi: Down, but not out! | Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

- रवी टाले 
(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)

लोकसभा निवडणुकीचा शिमगा संपला असला, तरी त्याचे कवित्व काही काळ सुरू राहणारच आहे. विशेषतः ‘अब की बार चार सौ पार’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला स्वबळावरील साध्या बहुमतासाठीही तब्बल ३२ जागा कमी पडल्यामुळे तर कवित्वाला आणखीच धार चढणार आहे. राजकारणात स्वत:चा ‘ब्रॅण्ड’ प्रस्थापित केलेल्या नरेंद्र मोदींचा करिश्मा कसा ओसरला याची खात्रीपूर्वक कारणमीमांसा करणारे लोक आणि तात्कालिक धक्क बसला असला, तरी मोदींचा करिश्मा ही कशी अक्षय, अजिंक्य गोष्ट आहे असा छातीठोक दावा करणारे लोक यांच्यातील तुंबळ युद्ध आगामी दिवसांत रंगू शकते.

निकालाच्या दिवशी दुपारपासूनच समाजमाध्यमांवर या युध्दाची सुरुवात झालीदेखील आहे. सत्तेचा सोपान चढलेल्या प्रत्येकाला केव्हा न केव्हा तरी पायउतार व्हावेच लागत असते; पण त्यापैकी फार थोडे स्वत:ची छाप सोडून जातात. नरेंद्र मोदी हे नि:संशय त्या श्रेणीत मोडणारे नेते आहेत. मोदी काही जणांना प्रचंड आवडतात, तर काहीजणांसाठी त्यांचे नाव घेणेही संतापाचे कारण असते हे खरे; पण एकविसाव्या शतकातील भारताचा इतिहास त्यांच्यावर काही पाने खर्ची घातल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, हे मात्र नक्की!
कोणाही एका पक्षाला बहुमत मिळण्याचा काळ आता संपला आहे आणि केंद्रात आघाडी सरकारशिवाय पर्यायच नाही, अशी धारणा १९८९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झाली होती. एकापाठोपाठ एक आघाडी सरकारे सत्तेत येत होती. त्यापैकी फार थोडी कार्यकाळ पूर्ण करू शकली. 

या पार्श्वभूमीवर, २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर बहुमत प्राप्त करून देणे आणि त्यानंतर २०१९ मध्ये आणखी जास्त जागा मिळवीत त्या यशाची पुनरावृत्ती करणे, हे कल्पनातीतच होते. हे यश मोदींनी एकट्याच्या बळावर खेचून आणले होते, हे खरेच! त्या यशाशी तुलना होत असल्याने स्वत: मोदींनीच यावेळी ४०० जागांचे लक्ष्य निर्धारित केले.  आज भाजपला स्वबळावर २४० जागा मिळूनही तो मोदींचा पराभव असल्याची चर्चा सुरू झाली, ती त्यामुळेच! वस्तुत: १९८४ नंतर मोदी वगळता इतर कोणत्याही नेत्याला, स्वपक्षाला २४० पेक्षा जास्त जागा मिळवून देता आलेल्या नाहीत. मोदींनी तो करिश्मा सलग तीनदा करून दाखवला आहे. त्यांना यावेळी स्वपक्षाला बहुमत मिळवून देता आले नसले, तरी निवडणूकपूर्व आघाडीला त्यांच्याच नेतृत्वाखाली बहुमत मिळाले आहे, आणि तरीदेखील त्यांचा पराभव झाल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

‘ब्रॅण्ड मोदी’ अजिंक्य असल्याच्या धारणेला निवडणूक निकालांनी निश्चितपणे तडा दिला आहे आणि त्यामुळेच यापुढे ‘ब्रॅण्ड मोदी’चे काय होणार, या चर्चेलाही तोंड फुटले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री पद असो वा पंतप्रधान पद, मोदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ स्वपक्षाचे बहुमताचेच सरकार चालविले आहे. गत दोन वेळा त्यांचे सरकार नावालाच आघाडी सरकार होते. यावेळी प्रथमच त्यांना खऱ्या अर्थाने आघाडी सरकारचे नेतृत्व करावे लागणार आहे आणि तेच त्यांच्या समोरचे प्रमुख आव्हान असेल. सरकार गठनाच्या हालचालींना प्रारंभही होण्यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी पक्षांनी त्यांच्या मागण्या पुढे रेटण्यास प्रारंभ केल्याचे वृत्त आहे. त्यातच अनुक्रमे १६ आणि १२ खासदार गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांचा यापूर्वीचा अनुभव फारसा चांगला नाही. दोघांनीही एकापेक्षा जास्त वेळा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मोदींना यापुढील पाच वर्षांत स्वत:च्या मनाप्रमाणे सरकार चालवता येणार नाही, हे सुस्पष्ट आहे.

आघाडी सरकार चालविताना अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा शांत, संयत, सुसंस्कृत नेताही समता-ममता-जयललिता यांच्यासमोर हतबल झाला होता. मोदी यांचा तो स्वभाव नसल्याने, ते आघाडी सरकारच्या अपरिहार्यतांसोबत कितपत जुळवून घेऊ शकतील, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे मोदी आघाडी सरकारला कितपत रेटू शकतील, हा प्रश्नच आहे. ते त्यामध्ये अपयशी ठरल्यास तीच ‘ब्रॅण्ड मोदी’ची अखेर ठरू शकते. दुसऱ्या बाजूला भाजपची मंडळी कितीही म्हणत असली, तरी वय लक्षात घेता मोदी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत (मध्यावधी निवडणूक न झाल्यास) भाजपचे नेतृत्व करतील, याबाबत शंकाच आहे.

त्यामुळे तशीही आगामी पाच वर्षे ही ‘ब्रॅण्ड मोदी’ची शेवटची पाच वर्षे ठरण्याचीच शक्यता आहे. त्यांच्यावर आघाडीतील घटक पक्षांकडून जास्तच दबाव वाढल्यास ती घटिका आधीही येऊ शकते. मोदींचा एकंदर स्वभाव लक्षात घेता, सर्वोच्च शिखरावर असताना निरोप घेणेच त्यांना आवडेल. त्यांनीही त्या दृष्टीने विचार करायला प्रारंभ केला असेलच ! ‘ब्रॅण्ड मोदी’ची अखेर होणार असेल, तर ती स्वत:ला हवी त्याच पद्धतीने व्हावी, असाच मोदींचा प्रयत्न राहील. त्यांची लढवय्या वृत्ती लक्षात घेता ते त्यासाठी शेवटपर्यंत लढतील, हे निश्चित! त्यामुळे बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील वाक्प्रचार वापरायचा झाल्यास, ब्रॅण्ड मोदी इज डाउन, बट नॉट आउट, असे नक्कीच म्हणता येईल!

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : Brand Modi: Down, but not out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.