Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?
By रवी टाले | Published: June 7, 2024 09:32 AM2024-06-07T09:32:52+5:302024-06-07T09:35:46+5:30
Lok Sabha Election Result 2024 : यावेळी उत्तर प्रदेशातली हक्काची मतेही मायावतींना मिळाली नाहीत, कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घेतलेले अनाकलनीय निर्णय!
- रवी टाले
(कार्यकारी संपादक, जळगाव)
लोकसभा निवडणूक निकालांनी ज्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यामध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावेळी त्यांच्या पक्षाला एकही जागा तर जिंकता आली नाहीच; पण मतांची टक्केवारीही चांगलीच घसरली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाखालोखाल बहुजन समाजवादी पक्षाचा दबदबा होता; परंतु २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला आणि मायावतींच्या कारकिर्दीला ग्रहणच लागले.
गत लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करून बसपने १० जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र मायावतींनी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास नकार दिला होता. त्याशिवाय आणखीही बरेच अनाकलनीय निर्णय त्यांनी निवडणुकीदरम्यान घेतले. उमेदवारांची निवड आणि घोषणा यामध्येही बरेच घोळ घातले. राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ४८८ जागा बसपने देशभर लढविल्या; पण पक्ष निवडणूक लढवतोय, असे जाणवलेच नाही. मायावतींनी गतवर्षी त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून भाचा आकाश आनंद याच्या नावाची घोषणा केली होती; पण ऐन लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मायावतींनी त्याला थेट बेदखलच केले. कधीकाळी गळ्यातील ताईत असलेल्या सतीशचंद्र मिश्रा यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देऊनही प्रचारापासून अलिप्तच ठेवले.
निवडणूक निकालांनंतरही मायावतींचे अनाकलनीय वागणे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार देऊनही मुस्लिमांची मते मिळाली नाहीत, म्हणून यापुढे त्यांना फारच काळजीपूर्वक उमेदवारी देऊ, अशी धक्कादायक पोस्ट त्यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी समाजमाध्यमांवर केली. गत लोकसभा निवडणुकीत सप-बसप युतीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या १५ जागांपैकी दहा जागा एकट्या बसपला मिळाल्या होत्या. तरीही मायावतींनी युती तोडण्याची घोषणा केली. ती युती कायम राहिली असती तर गत कामगिरीच्या बळावर बसपला जागा वाटपात सन्मानजनक वाटा मिळू शकला असता आणि पक्षाचे काही खासदार तरी नक्कीच निवडून आले असते. यावेळीही काँग्रेसने बसपला इंडिया आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला; पण मायावतींनी त्या प्रस्तावालाही ठाम नकार दिला.
इंडिया आघाडीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतल्याने बसप ही भारतीय जनता पक्षाची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपाला बळ मिळाले आणि बसपचा परंपरागत जाटव मतदारही पक्षापासून दूर गेला. परिणामी पक्षाने केवळ जागाच गमावल्या नाहीत, तर मतांच्या टक्केवारीतही पक्ष लक्षणीयरीत्या माघारला. वस्तुतः उत्तर प्रदेशात बसपची हक्काची अशी किमान २० टक्के मते आहेत; पण यावेळी त्याच्या अर्धीही पक्षाला मिळू शकली नाहीत. त्याचा थेट लाभ सप-कॉंग्रेस युती आणि चंद्रशेखर आजाद यांना मिळाला आहे. आजाद लोकसभेत पोहचले आहेत, तर सप आणि कॉंग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय भर पडली आहे. बसपची हक्काची दलित मते त्यांच्याकडे वळल्याचा त्यासाठी मोठा हातभार लागला. पोकळी ही गोष्ट केवळ ब्रह्मांडातच असते. इतर कोठेही पोकळी निर्माण झाली, तरी ती अल्पावधीतच भरून निघत असते. बसपला तो अनुभव लोकसभा निवडणुकीत आला आहे. त्यापासून धडा न घेतल्यास मायावतींच्या राजकीय शेवटास सुरुवात होऊ शकते.