‘न्यूज’ आणि यू-ट्यूबर्सचे ‘व्ह्यूज’; मोदी समर्थक अन् मोदी विरोधकांचा नवा 'आवाज'
By अमेय गोगटे | Published: June 8, 2024 09:22 AM2024-06-08T09:22:23+5:302024-06-08T09:22:55+5:30
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचे कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक अशा दोन्हीकडे काही यू-ट्युबर्स प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले.
- अमेय गोगटे
(संपादक, लोकमत डिजिटल)
‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये वकिलाची भूमिका करणारा पंकज त्रिपाठी म्हणतो, “कोर्टात दोन्ही बाजूंचे वकील एकेक गोष्ट सांगत असतात. ज्याची गोष्ट कोर्टाला पटते, तो जिंकतो.” हे वाक्य बऱ्याच अंशी निवडणुकांनाही लागू पडतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ‘नरेटिव्ह’ची चर्चा सुरू आहे, ते ‘नरेटिव्ह’ म्हणजे एक प्रकारची गोष्टच आहे की!
प्रत्येक निवडणूक काही विशिष्ट मुद्द्यांवर लढवली जाते. २०१४ मध्ये विकासाचा मुद्दा होता. २०१९ ची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर झाली, तर २०२४ मध्ये ‘चार सौ पार’ विरुद्ध ‘संविधान बचाव’ अशी लढाई रंगली. आपला मुद्दा विविध स्तरांतील जनतेपर्यंत-मतदारांपर्यंत प्रभावीपणे नेणं, त्यांना पटवून सांगणं आणि त्यांचं ‘मन’ आणि ‘मत’ जिंकणं हे सोपं काम नाही. गेली काही वर्षं यात सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतोय. या वेळच्या निवडणुकीतही या माध्यमाचा ‘इम्पॅक्ट’ जाणवला. काही यू-ट्युबर्सचे व्हिडीओ प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले.
क्रिकेट आणि राजकारण हे आपल्याकडचे चर्चेसाठीचे ‘ऑल टाइम हिट’ विषय. त्यात, मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी सरकारचे कट्टर विरोधक, असे दोन गट पडल्यापासून तर सोशल मीडियावर ‘वर्ड वॉर’च रंगतंय. या दोन गटांसाठी, त्यांना पटणाऱ्या विचारधारांवर ठासून बोलणारे यू-ट्यूबवरचे ‘कंटेन्ट क्रिएटर’ म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइडच बनलेत. दिवसभरातल्या घडामोडींच्या ‘न्यूज’ देणारी बरीच माध्यमं आहेत, पण ‘व्ह्यूज’साठी यू-ट्यूबर्सना मोठी पसंती मिळताना दिसते. त्यात जो ‘समविचारी’ असेल, तो निवडता येत असल्याने अधिक जवळचाही वाटतो.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांत ध्रुव राठीच्या व्हिडीओंची बरीच चर्चा झाली. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष्य केलं. या व्हिडीओंना काही तासांत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले. मोदी विरोधकांनी ते व्हायरल करून मोदी समर्थकांना डिवचलं. रविशकुमार यांच्या सरकारविरोधातील अनेक व्हिडीओंनी खळबळ उडवून दिली. दुसऱ्या गटासाठी - म्हणजे मोदी समर्थकांसाठी गौरव ठाकूर, सुशांत सिन्हा, द चाणक्य डायलॉग्स हे यू-ट्यूब चॅनल ‘आधारस्तंभ’ ठरले. महाराष्ट्राचा विचार करायचा तर, ‘निर्भय बनो’ चळवळीतील मंडळी मोदींविरोधात मैदानात उतरली असताना भाऊ तोरसेकर यांचा प्रतिपक्ष, आकार डीजी ९, ॲनलायझर या यूट्यूब चॅनलवरील चर्चा ऐकून मोदी समर्थकांना वाद-प्रतिवादासाठी खाद्य मिळत होतं.
निवडणुकीच्या काळात आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पर्यायी माध्यम खूप वेगाने वर येत असल्याचं आता नेतेमंडळींच्याही लक्षात आलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेला डिजिटल क्रिएटर्सचा सन्मान, अनेक नेत्यांनी ‘कर्ली टेल्स’ या यू-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती, महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी इन्फ्लूएनसर्सचा केलेला वापर आणि निवडणूक काळात राजकीय मतं मांडणाऱ्या चॅनलवरील व्हिडीओंचे व्ह्यूज पाहता, पुढील निवडणुकांमध्ये या माध्यमाला ‘अच्छे दिन’ नक्कीच येऊ शकतात.
गोष्ट ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. हे डिजिटल क्रिएटर उत्तम ‘स्टोरी टेलर’ आहेत. त्यामुळे ते सांगतात ती गोष्ट आपल्याला खिळवून ठेवते. फक्त ती गोष्ट ऐकून झाल्यावर, एक सुजाण नागरिक म्हणून आपण स्वतः ‘मोरल ऑफ द स्टोरी’चा सारासार विचार करायला हवा.