Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 10:06 AM2024-06-08T10:06:50+5:302024-06-08T10:19:31+5:30

Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते?

Lok Sabha Election Result 2024: Will Raj Thackeray regret it? | Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या किंवा अगदी एकुलती एक जागा मिळवणारे महाराष्ट्रातील नेते, नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत... आणि मुंबईतील शिवतीर्थावरून गर्जना करणारे व पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा आयोजित करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठे आहेत? आपल्या ‘शिवतीर्थ’ या पंचतारांकित बहुमजली निवासस्थानाच्या गॅलरीत उभे आहेत की, टीव्हीच्या पडद्यावर सोहळे पाहत शीतपेयांचा आस्वाद घेत आहेत?

राज यांच्या पक्षाचा अजित पवारांसारखा एकुलता एक खासदार जरी निवडून आला असता तरी आज ते एनडीएच्या व्यासपीठावर दिसले असते. क्षेत्र नोकरीचे असो, व्यवसाय किंवा राजकारणाचे असो; मेंदूपेक्षा मनाच्या लहरीने निर्णय घेतले की अवस्था राज ठाकरे यांच्यासारखी होते. राज यांनी २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या नाहीत. मात्र २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’चा भोंगा लावून त्यांनी मोदी-शाह यांची ठाकरी शैलीत यथेच्छ धुलाई केली. 

२०२४ मध्ये मात्र त्याच मोदींच्या मांडीला मांडी लावून तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याकरिता जनतेला आर्जवं केली. या उद्योगाला लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणतात.  राज यांनी लोकसभेच्या दोन-पाच जागा पदरात पाडून घेतल्या असत्या तर त्यांच्या आवाहनाला काही बळ लाभले असते. ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी राज यांची अवस्था होती. पाच वर्षांपूर्वी यांनी मोदी-शाहना दूषणे का दिली व आज ते त्यांची भलामण का करताहेत, याचे कुठलेही तार्किक उत्तर मिळाले नाही. 

­ठाण्याचे ठाणेदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाणे मुंबईत वाजेल की नाही, याची खात्री नसल्याने भाजपने राज यांना सोबत घेतले आणि ‘एक ठाकरे द्या मज आणुनि’ या उणिवेची पूर्तता केली. मात्र नगाला नग दिला म्हणून काम साधतेच, असे नाही. मुंबईत व्हायचे तेच झाले. उद्धव ठाकरे यांना मुंबईकरांनी भरभरून मते दिली. शिंदे यांचे रवींद्र वायकर हे बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने ४८ मतांनी विजयी झाले. याला जर शिंदे यांची ताकद व राज यांचा करिष्मा म्हणायचे असेल तर हास्यास्पद आहे. याचा अर्थ ठाकरे, शिवसेना, धनुष्यबाण हे सगळे सोबत असतानाही भाजपला मुंबईकरांनी चपराक दिली. 

राज हे व्यंगचित्रकार आहेत, ते कानसेन आहेत, दृष्ट लागेल असा कार्यक्रम कसा आयोजित करावा याचा वस्तुपाठ आहेत, त्यांच्या वक्तव्यात पंच असतो... असे कित्येक गुण त्यांच्याकडे आहेत. पण सातत्याचा, चिकाटीचा प्रचंड अभावही आहे. त्यांच्या पक्षातील काही नेते हा खरंतर त्यांच्या मित्रमंडळींचा गोतावळा आहे. त्यामुळे मग त्यांना गोळा करायचे, काव्य-शास्त्र-विनोदावर गप्पा छाटत बसायचे हे नेहमीचे! लता मंगेशकर, आशाताई, बाबासाहेब पुरंदरे वगैरे त्यांचे वीक पॉइंट. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या स्मृतीरंजनात रमायचे. रात्री उशिरापर्यंत क्लासिक चित्रपट पाहायचे, असा राजेशाही दिनक्रम राज यांनी वर्षानुवर्षे नित्यनेमाने जपला. वयाची ऐंशी वर्षे उलटलेले शरद पवार त्यांचा पक्ष पुतण्याने विस्कटून टाकल्यावर रोज गल्लीबोळात जातात, भाषणे करतात आणि पुतण्याचे मनसुबे उधळवून लावतात; ही चिकाटी राज यांच्याकडे नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी ४० वर्षांपूर्वी जे जे केले त्या त्या गोष्टी आज थोड्याफार फरकाने तशाच करण्याचा राज यांचा अट्टाहास हाही अनाकलनीय आहे. पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी झेंड्यात निळा व हिरवा रंग समाविष्ट करून आपला पक्ष  ही  शिवसेनेची कार्बन कॉपी नसेल, असे संकेत दिले होते. कारण बाळासाहेब ठाकरे असताना हिंदुत्वाचा मुद्याच अग्रक्रमावर असलेल्या मनसे कडे मतदार कशाला येईल? मात्र पुढे त्यांनी ध्वज बदलला, भूमिकांत धरसोड वृत्तीचा अक्षरश: पाऊस पाडला.

‘मला आपल्याशी बोलायचे आहे,’ असे फलक लावून सभा आयोजित केली. स्वत: निवडणूक लढविण्याची घोषणा केली आणि माघार घेतली. उत्तर भारतीय भेळपुरी विक्रेते, फेरीवाले यांना कधी चोपून काढले तर कधी उत्तर भारतीयांच्या गळाभेटी घेतल्या. देशात हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या नरेंद्र मोदींचा जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचीच टिमकी वाजवणाऱ्या दुसऱ्या प्रादेशिक नेत्याला जनता कशाला स्वीकारेल? - हा खरेतर  अगदी साधा सवाल आहे.

- उद्धव यांनी हे नेमके हेरले. त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. नितीशकुमारांसारखे भाजपच्या वळचणीला राहून ते जे देतील त्यात समाधान मानायचे किंवा महाराष्ट्रात ज्यांना मोदींना मत द्यायचे नाही त्यांना आपणच मोदींशी दोन हात करू शकतो, असा संदेश द्यायचा. उद्धव यांनी दुसरा मार्ग पत्करला. अपेक्षेनुसार भाजपने त्यांचा पक्ष फोडला, पक्षाचे नाव, चिन्ह सारे काढून घेतले. उद्धव यांनी शिवसेनेलाच मानणारा हिंदू, मुस्लिम व दलित मतदारांचे मन जिंकून नवी व्होटबँक निर्माण करून महाराष्ट्रात भाजपला हादरा दिला.

आपल्या पक्षाच्या झेंड्यात निळा व हिरवा रंग सामील करणाऱ्या राज यांनी आपली स्पर्धा हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत असल्याने त्याचवेळी अशी वेगळी व्होटबँक बांधली असती तर आज राज यांना उद्धव यांची नाकेबंदी करता आली असती.  उद्धव यांचे संघटनकौशल्य आणि राज यांची वक्तृत्वशैली हे उत्तम रसायन होते. परंतु, भाऊबंदकीचा शाप लाभल्याने या दोघांची ‘टाळी’ वाजली नाही. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ‘नकली’ असल्याची शेरेबाजी शिवाजी पार्कवर भाजपचे नेते करीत होते आणि समोर बसलेले मनसैनिक त्यावर टाळ्या, शिट्या वाजवत होते, याचे वैषम्य राज यांना वाटले नाही हेही मुंबईकरांना रुचले नाही.

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यावर ‘व्होट कटवा’ नेता असा स्टॅम्प बसावा हेही दुर्दैवी आहे. कधी राज हे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘फलदायी’ ठरले तर कधी ते शरद पवार यांनी लिहिलेले स्क्रिप्ट वाचत असल्याची शेरेबाजी केली गेली. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत खोक्यांची भाषा लोकप्रिय झाल्याने ‘मोदींचा प्रचार करताना किती खोके घेतले,’ अशा शेलक्या शब्दांत विचारणा केली गेली. राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते?

Web Title: Lok Sabha Election Result 2024: Will Raj Thackeray regret it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.