दोन्ही ठाकरेंकडे उरला नुसताच 'रिमोट'; एकाचा 'कंट्रोल' मोदींकडे, एकाचा पवारांकडे!
By संदीप प्रधान | Published: May 25, 2019 01:05 PM2019-05-25T13:05:04+5:302019-05-25T13:24:37+5:30
'पवार' आडनावाला झालेला पराभवाचा स्पर्श पाहता हळूहळू पवार यांची ही क्षमता क्षीण होण्याची शक्यता अधिक आहे.
एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठली व्यक्ती सत्ताधारी किंवा विरोधी बाकावर बसणार, कुणाची सरशी किंवा आपटी होणार, कुणाला कायमचे घरी बसावे लागणार, याचे निर्णय शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे घेत होते. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण या दोन व्यक्तींभोवती फिरत असायचे. शरद पवार हे आजही आपली ती क्षमता टिकवून आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका, 'पवार' आडनावाला झालेला पराभवाचा स्पर्श पाहता हळूहळू पवार यांची ही क्षमता क्षीण होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता व त्याच्या कक्षेत मुख्यमंत्रीच नव्हे, तर केंद्रातील सरकारमधील भाजपचे नेतेही होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून मागून घेऊन शिवसेनेने राम कापसे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचे राजकारण थांबवले होते, तर केंद्रात मंत्री असताना कुठल्याही कामाकरिता तीन अर्ज मागणाऱ्या राम नाईक यांना जेव्हा अभिनेता गोविंदाने अडचणीत आणले, तेव्हा त्यांच्या प्रचाराकरिता सभा घेण्याची विनंती नाईक यांनी करताच ठाकरे यांनी अर्जाच्या तीन प्रती आणल्या आहेत का, असा उपरोधिक टोला लगावत नाईक यांच्या पराभवाचा अप्रत्यक्षपणे बंदोबस्त केला. भाजपचे प्रमोद महाजन हेही ठाकरे यांच्या शब्दाबाहेर नव्हते आणि बहुतांश भाजप नेत्यांना विजयाकरिता ठाकरे यांच्या करिष्म्याची गरज असायची. त्यामुळे बाळासाहेबांनी आपल्याकरिता प्रचारसभा घ्यावी, याकरिता अनेक भाजप नेत्यांची धडपड सुरू असायची.
बाळासाहेब ठाकरे यांचा तो वारसा त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे व पुतणे राज ठाकरे हे चालवतात. मात्र, आता शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाकरिता नरेंद्र मोदी यांचा करिष्मा लागल्याचे चित्र दिसले. ठाणे शहर हे शिवसेनेचा वर्षानुवर्षांचा बालेकिल्ला. शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली सत्ता ठाण्याने दिली. या ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचारफेऱ्यांमध्ये शिवसैनिक, 'अब की बार मोदी सरकार'... असा जयजयकार करत होते. मोदींचे फोटो लावून शिवसेनेने ठाण्यात भरभक्कम मताधिक्य घेतले. गेली चार वर्षे शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी-शहा यांना लाखोली वाहत होती. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने कोलांटउडी मारून युती केली. हा निर्णय शिवसेनेला लाभदायक ठरला, हे निकालाने स्पष्ट झाले आहे. मात्र, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे आडनावाच्या व्यक्तीला आपल्या रिमोट कंट्रोलच्या रेंजमध्ये आणून पूर्णपणे जखडून ठेवले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दुसऱ्या शब्दांत आता यापुढे ठाकरे यांना सत्ताधारी बाकावरील मित्रपक्ष या नात्याने मोदी सरकारच्या सुरात सूर मिसळावा लागेल. कारण, मोदींच्या करिष्म्याची शिवसेना लाभार्थी आहे. पुन्हा जर 'चौकीदार चोर है'च्या घोषणा शिवसेना देऊ लागली, तर ते भाजप खपवून घेणार नाही, इतके पाशवी बहुमत त्या पक्षाला लोकांनी दिले आहे.
दुसरे ठाकरे हे अर्थात राज हे आहेत. त्यांना आपली मुलाखत घ्यायला बोलावून शरद पवार यांनी फासे टाकले. राज यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर पवार यांनी राज यांना महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या आघाडीत स्थान दिले जाण्याच्या चर्चा सुरू करून दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील विकास पाहण्याकरिता स्टेट गेस्ट म्हणून लाल पायघड्यांवरून गेलेले राज यांना कट्टर मोदीविरोधकाची भूमिका घेण्यास भाग पाडण्याची किमया पवार यांनी केली. त्यामुळे देशाच्या राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांना हद्दपार करण्याचे आवाहन राज यांनी केले. त्याचा त्यांना व विरोधी पक्षांना किती लाभ झाला, हा भाग अलाहिदा. पण, ठाकरे आडनावाच्या दुसऱ्या व्यक्तीला पवार यांनी आपल्या रिमोट कंट्रोलच्या रेंजमध्ये आणून विरोधी बाकावर बसायला भाग पाडले. हे ठाकरेसुद्धा आता इतके जखडले गेले आहेत की, त्यांना जोपर्यंत मोदी सत्तेवर आहेत, तोपर्यंत विरोधी बाक सोडणे जवळपास अशक्य आहे. आता लागलीच दोनतीन वर्षांत जर ते मोदीचालिसा गाऊ लागले, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह येईल. त्यामुळे मनात असो किंवा नसो, ठाकरे यांना पवार यांचा हात हातात घेऊन बसावे लागेल.
एकेकाळी महाराष्ट्रात कुणी कुठे बसायचे, हे ठरवणारे 'ठाकरे' यांना आता मोदी-फडणवीस किंवा पवार यांच्या रिमोट कंट्रोलच्या तालावर नाचावे लागणार, हा काळाने उगवलेला सूडच म्हणावा लागेल.