लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदींच्या या विजयाची सात कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:28 AM2019-05-24T04:28:31+5:302019-05-24T04:30:08+5:30
टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.
- बरखा दत्त
((ज्येष्ठ पत्रकार )
याही वेळी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असे मला नेहमीच वाटत होते व मी तसे वारंवार लिहिलेही होते. पण सन २०१४ मध्ये झाले तसेच झाले व इतर सर्व पत्रकारांप्रमाणे मलाही या विजयाचे स्वरूप एवढे मोठे असेल व मोदींना लोकांमध्ये एवढा मोठा सुप्त पाठिंबा आहे, याची मलाही कल्पना आली नव्हती.
निवडणुकीच्या काळात मी ज्यांचे मत अजमावले त्यापैकी बहुतांश मतदारांचा प्रश्न ठरलेला होता : (मोदींशिवाय) दुसरे आहे कोण? म्हणून मी थट्टेने या निवडणुकीला ‘लेकिन और है कौन’ निवडणूक म्हणायचे. पण खरे तर ही ‘आयेगा तो मोदीही’ निवडणूक होती. मोदींना मतदारांनी अत्यंत स्फूर्तीने दिलेली पसंती होती.
मोदींच्या या देदीप्यमान विजयामागे मला जी कारणे दिसतात त्यापैकी काही अशी :
- देशाचे नेतृत्व खंबीर व सतत नजरेसमोर असायला हवे, अशी देशाच्या जनतेला मोठी आस आहे. देशासाठी कोणताही धोका पत्करायला तयार असलेला नेता अशी मोदींची प्रतिमा आधीपासून होती. बालाकोट हवाई हल्ल्यांनी त्यास बळकटी दिली, एवढेच.
- भाजपने ‘तुकडे तुकडे गँग’ असे म्हणून विरोधकांची संभावना करणे व आपल्याच देशाच्या नागरिकांना देशद्रोही म्हणणे हे विखारी होते. पण स्पर्धेतील इतर पक्ष याला स्वत:चा कोणताही पर्याय देऊ शकले नाहीत.
- टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. खरं तर कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून जातीपातींच्या पलीकडे जाणारे नेतृत्व म्हणून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.
- राजकीय हिंदुत्व हे आता एक वास्तव म्हणून स्वीकारावेच लागेल. हे फक्त बंगालमध्येच नव्हे तर पश्चिम व उत्तर भारताच्या फार मोठ्या पट्ट्यात हे दिसून आले. परिणामकारक संवाद यंत्रणेने राष्ट्रवाद व हिंदुत्वाची अशी काही सांगड घातली गेली की, बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटू लागले. याचे भांडवल करायला भाजप बसलीच होती.
- आर्थिक आघाडीवर पाहिले तर रोजगार, जीडीपी वाढीच्या मोजणीवरून झालेला वाद, जीएसटी लागू करताना सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि नोटाबंदी यावरून बरीच टीका होऊनही सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांनी या नाराजीवर मात केली.
- दिल्लीच्या प्रस्थापित सत्ता वर्तुळात बाहेरून आलेल्या मोदींना अनेकांनी स्वीकारले नव्हते. त्याची चर्चाही बरीच झाली. तुम्ही म्हणाल, याचा मतांशी काही संबंध नाही. लोक अगदी याच शब्दात बोलत नसले तरी त्यांच्या मनातील भावनाही याचा विरोध करणाऱ्या होत्या, हे नाकारून चालणार नाही.
- मोदींच्या यशाच्या चढत्या आलेखाचा आढावा काँग्रेसचे अपयश व त्यांच्या नेत्यांच्या बेफिकीर वृत्तीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. एकाच घराण्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्या पक्षाला संघटना बांधणीत अडचणी येणे ठरलेलेच आहे. जेव्हा असे घराणेबाज नेतृत्वही पक्षाला यश मिळवून देऊ शकत नाही तेव्हा काँग्रेसने खरे तर आपल्या अस्तित्वासंबंधीच काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. अन्यथा, काँग्रेस जिवंत ठेवण्यात तरी काय अर्थ आहे, हा योगेंद्र यादव यांनी विचारलेला प्रश्न सार्थच म्हणावा लागेल.