'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं!
By यदू जोशी | Published: April 3, 2019 05:31 PM2019-04-03T17:31:29+5:302019-04-03T17:36:50+5:30
किरीट सोमय्या यांनी मतदारसंघात संपर्क चांगला ठेवला खरा, पण मी म्हणेन तीच पूर्व दिशा या पद्धतीने ते वागत राहिले.
>> यदु जोशी
शिवसेनेने ज्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्या किरिट सोमय्यांचे ईशान्य मुंबईतून अखेर तिकीट कापले गेले. शिवसेनेच्या दबावाला भाजपाचे नेतृत्व बळी पडले आणि सोमय्यांसारख्या निष्ठावंताचा बळी गेला असे वरवर दिसत असले तरी ते एकमेव कारण नाही.
सोमय्या यांनी २०१४ पूर्वी भाजपा विरोधी पक्षात असताना काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता. एवढेच नव्हे तर काही घोटाळ्यांच्या निमित्ताने भाजपाच्या काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेले गुडविल सोमय्या यांनी गमावले. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ दिल्लीत वजन राखून असलेला भाजपाचा एकही नेता समोर आला नाही. विविध घोटाळ्यांबाबत सोमय्या यांनी त्यांची चार्टर्ड अकाऊन्टगिरी वापरली, त्याची आच भाजपाच्या काही नेत्यांपर्यंतही पोहोचत होती. पक्षाने काही घोटाळ्यांबाबत जी भूमिका ठरविली होती तिच्या विपर्यस्त भूमिका सोमय्या घेत राहिले. नंतरच्या काळात त्यांच्या हे लक्षात आले असावे म्हणून की काय त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण तोपर्यंत ते स्वपक्षीयांच्या 'बॅड बुक'मध्ये गेले होते आणि तिथून परतलेच नाहीत.
सोमय्या यांनी मतदारसंघात संपर्क चांगला ठेवला खरा, पण मी म्हणेन तीच पूर्व दिशा या पद्धतीने ते वागत राहिले. राज्य वा केंद्रातील भाजपाच्या नेत्यांशी त्यांनी संपर्क ठेवला नाही, ही बाबही त्यांच्या विरोधात गेली. शिवसेनेने सोमय्या यांच्या उमेदवारीला केलेला विरोध झुगारून सोमय्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उभे राहावेत अशी या दोघांची निकटता सोमय्या कधी साधूच शकले नाहीत. एखाद्या वेळी ते आपल्याच पक्षातील एखाद्या नेत्यावर उलटू शकतील ही स्वत:बाबतची साशंकता सोमय्या यांना दूर करता आली नाही. त्यांची उमेदवारी कापण्यामागचे हे प्रमुख कारण मानले पाहिजे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित घोटाळ्यांकडेही त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केला. विशिष्ट चौकशी यंत्रणेकडे त्याबाबतची माहिती पुरविण्यामागे सोमय्याच होते असा संशय त्यातून निर्माण झाला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामागे 'मातोश्री'चा हात असल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. तेव्हापासून ते शिवसेनेचे लक्ष्य बनले. पण फक्त शिवसेनेचा विरोध हेच सोमय्यांचा पत्ता कापला जाण्यामागचं कारण नाही. कारण, महाराष्ट्रातल्या चार मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना शिवसेनेचा विरोध होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात काय चित्र होतं, हे तर सगळ्यांनीच पाहिलं. परंतु, भाजपाने शिवसेनेची समजूत काढली आणि त्या जागांवर आपल्याला हवे तेच उमेदवार दिले. भाजपा सेनेपुढे झुकलं नाही. मग, इतर नेत्यांसाठी भाजपाने जे केलं, ते सोमय्यांच्या बाबतीत का झालं नाही, याचं आत्मपरीक्षण त्यांनीच केलेलं बरं. मतदारसंघातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनीही त्यांच्याबद्दल फारसा चांगला अभिप्राय दिला नव्हता, असंही कळतंय.
ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, किरीट सोमय्यांचा पत्ता कट https://t.co/bZpxaXTu6b
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 3, 2019
आज उमेदवारी मिळालेले मनोज कोटक हे भाजपाचे महापालिकेतील पक्षनेते आहेत. त्यांची प्रतिमा फार चांगली नसली तरी पक्षाचे निष्ठावंत आहेत. महापालिका शिक्षण सभापती असताना त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. सोमय्या यांच्या प्रमाणेच तेही गुजराती आहेत. महापालिकेत असल्याने त्यांचे शिवसेनेशी चांगले संबंध आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने, 'आंधळा मागतो...' असे त्यांचे झाले आहे. कारण, २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मुलुंडमधून सरदार तारासिंग यांच्या जागी भाजपाची उमेदवारी मागितली होती पण तारासिंग चांगलेच भडकले. त्यामुळे मनोज कोटक यांना भांडूप पश्चिममधून उभे करण्यात आले. तेथे त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांची एकदम लोकसभा उमेदवारीची लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्याशी त्यांचा सामना असेल.
भाजपा-काँग्रेस असा प्रवास करून भाजपात परतलेले प्रवीण छेडा, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, कोटक यांना संधी मिळाली. आता मुंबईतील तीन जागांवर भाजपाने एक मराठी (पूनम महाजन), एक दाक्षिणात्य (गोपाळ शेट्टी) आणि एक गुजराती (मनोज कोटक) असे संतुलन साधले आहे.