लोकमत आणि शरद पवार

By admin | Published: December 29, 2015 02:45 AM2015-12-29T02:45:41+5:302015-12-29T02:45:41+5:30

‘लोकमत’ला आजवर अनेक राष्ट्रीय व ख्यातनाम नेत्यांनी आणि समाजसेवकांनी भेटी दिल्या. त्या भेटींचा या वृत्तपत्राला मूल्याच्या संदर्भात लाभही झाला. मात्र या भेटींच्या मालिकेत

Lokmat and Sharad Pawar | लोकमत आणि शरद पवार

लोकमत आणि शरद पवार

Next

‘लोकमत’ला आजवर अनेक राष्ट्रीय व ख्यातनाम नेत्यांनी आणि समाजसेवकांनी भेटी दिल्या. त्या भेटींचा या वृत्तपत्राला मूल्याच्या संदर्भात लाभही झाला. मात्र या भेटींच्या मालिकेत सर्वात विलक्षण ठरावी अशी भेट शरद पवार यांची आहे. गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या सेवेत गढलेल्या या नेत्याचा ७५ वा वाढदिवस नुकताच राष्ट्रीय पातळीवर साजरा झाला. पंतप्रधान मोदींपासून सोनिया गांधींपर्यंतचे सारे नेते त्याला हजर होते. वयाची साडेसात दशके पूर्ण करतानाच पवारांनी कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरही केवळ आत्मविश्वासाच्या बळावर मात केली. राजकारणात अनेक आव्हाने पुढे आली, प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले आणि राजकीय वाटचालीतले सगळे चढउतारही त्यांच्या वाट्याला आले. या साऱ्यांना मागे टाकत व आपली लोकप्रियता कायम राखत पवारांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व सदैव ताठ, उंच आणि हसतमुख राखले. पवारांनी लोकमतला दिलेल्या भेटीचे विलक्षण महत्त्व त्यांच्या या वृत्तपत्राशी राहिलेल्या संबंधात आहे. पवारांवर ‘लोकमत’ने सर्वाधिक व टोकाची ठरावी अशी टीका अनेकवार केली. प्रसंगी त्यांचे मनापासून कौतुकही केले, मात्र त्यांच्यावरील टीकेचा मारा त्याहून नेहमीच मोठा राहिला. पवारांच्या मनाची थोरवी ही की ‘लोकमत’ परिवारातील कोणाच्याही भेटीत त्यांनी त्याविषयी कटुतेचा सूर कधी काढला नाही की आपल्या अधिकाराची जाणीव त्याला करून देण्याचा दर्पही कधी दाखविला नाही. त्यांच्या प्रत्येकच भेटीत ते कमालीचे दिलखुलास, मोकळे व मैत्र-भारलेलेच आढळले. त्यांच्यावर केलेल्या टीकेचा त्यांनी कधी उल्लेख केला नाही की प्रशंसेविषयी भलावणही केली नाही. राजकारणात अखंडपणे वावरणाऱ्या त्यांच्यासारख्या नेत्याला प्रत्येकच प्रश्नावर स्वत:च्या भूमिका घ्याव्या लागतात. त्या सगळ्याच साऱ्यांना आवडतात असे नाही. विशेषत: यशवंतराव चव्हाण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर असताना पवारांनी केलेला त्या पक्षाचा त्याग व पुलोद सरकारची आपल्या नेतृत्वात केलेली स्थापना अनेकांच्या विस्मयाला व रागाला कारण ठरली. त्यांच्याजवळ असणारी अनेक माणसे त्यामुळे दुरावली. नंतरच्या काळात त्यांनी राजीव गांधींशी केलेले मैत्र पुलोदवाल्यांच्या रोषाचा विषय झाले. सोनिया गांधींची साथ सोडताना त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही सोडले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन करून आपल्या मूळ पक्षाविरुद्ध बंड पुकारले. त्यावेळी साऱ्या देशातलाच काँग्रेसजन त्यांच्यावर रागावला होता. समाजवादी रुष्ट होते, कम्युनिस्ट दूर होते, शिवसेना विरोधात आणि संघ परिवार लांबवर होता. त्या स्थितीत आपल्या एकट्याच्या बळावर आणि संघटन कौशल्यावर त्यांनी आपला पक्ष उभा केला, तो वाढविला आणि त्यावेळी जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते त्यातला कोणीही त्यांच्यापासून पुढे कधी दूर गेला नाही. आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांशीच पवारांनी जिव्हाळ्याचे संबंध राखले असे नाही. त्यांच्या स्नेह्यात एसेम होते, बाळासाहेब ठाकरे होते, प्रमोद महाजन होते आणि त्यांच्यावर कठोर टीका करणाऱ्या मृणाल गोरेही होत्या. ‘लोकमत’ चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलालजी दर्डा यांच्याशी मतभेद असतानाही त्यांनी आत्मीयतेचे संबंध राखले होते. उद्योग, व्यवसाय, वृत्तमाध्यमे आणि समाजकारण याही क्षेत्रात त्यांच्या मित्रांचे मेळावे मोठे राहिले. क्रिकेटच्या क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी आल्पावधीतच त्या खेळाचे आयोजन करणाऱ्या आयसीसी या जागतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्याविषयीचा दुरावा मनात असणाऱ्यांनाही त्यांच्याविषयीची ओढ वाटत राहिली. ते चालत नाहीत पण त्यांच्यावाचूनही चालत नाही, अशांचा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आणि देशात होता आणि आहे. पवारांनी बारामती या त्यांच्या क्षेत्रात विकासाचा जो चमत्कार घडविला तो पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अरुण जेटलींपर्यंतची माणसे आली. ‘लोकमत’ला दिलेल्या भेटीच्यावेळी त्यांचे जे स्वरूप या परिवारातील संचालक, संपादक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले तेही असेच विलोभनीय होते. आपण ज्यांच्यावर टीका करतो तो हा नेता आपल्याशी एवढ्या जिव्हाळ्याने वा आत्मीयतेने बोलतो, आपल्या लहान-सहान प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आपल्याला प्रोत्साहन देतो आणि ‘लोकमत’ हा आपलाच परिवार आहे असे वागतो हे पाहता येणे हीच त्या साऱ्यांच्या मनावर त्यामुळे ठसलेली महत्त्वाची बाब ठरली. ही भेट एका माध्यमाला एका नेत्याने दिलेली भेट नव्हती, ज्या वृत्तपत्राने महाराष्ट्राला व देशाला लोकप्रतिनिधी मिळवून दिले त्याला दिलेल्या मान्यतेचीही ती नव्हती. आपल्याच परिवारातल्या एका मोठ्या माणसाने साऱ्यांना आत्मीयतेने भेटावे आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा असे त्या भेटीचे स्वरूप होते. राजकारण हा सदैव चालणारा वैराचा खेळ आहे. विनोबा म्हणायचे ‘राजकारण लढू नका, राजकारण खेळा’. पवारांची ‘लोकमत’ भेट हा मराठी राजकारणातल्या आत्मीयतेच्या खेळीचा व आपल्याच माणसाशी अधिक चांगली ओळख पटवून देण्या-घेण्याचा सोहळा ठरला. त्यासाठी पवारांचे आभार आणि त्यांचे व लोकमतचे संबंध असेच टीकात्मक जिव्हाळ्याचे राहावे ही सदिच्छा!

Web Title: Lokmat and Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.