आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:12 AM2021-11-18T08:12:26+5:302021-11-18T08:13:09+5:30
अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे.
भारताला १९४७ मध्ये मिळाली ती भीक होती. २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले, अशा स्वरूपाच्या अभिनेत्री कंगना रानौतच्या बेताल बडबडीकडे साऱ्या शहाण्या माणसांनी दुर्लक्षच केले. समाजातील सोडा, तिचे दस्तुर सिनेमासृष्टीतील स्थान लक्षात घेता केवळ पद्मश्री मिळाली म्हणून तिच्या बोलण्याची दखल घ्यावी, असेही नव्हते. त्यामुळे बाईसाहेब आणखी चेकाळल्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाही आपला २०१४ च्या स्वातंत्र्याचा मुद्दा कसा योग्य होता हे पटविताना त्या महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाची खिल्ली उडवायला लागल्या आहेत. एक गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही, हे नट्टापट्टा करताना स्वत:चेच गाल रंगविणाऱ्यांनी, लेखक- दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार डायलॉग उच्चारणाऱ्यांनी देशाला सांगावे, यापेक्षा मोठा विनोद नाही. विक्रम गोखले नावाच्या मराठी नटाने कंगनाचा वेताळ खांद्यावर घेताना धीरगंभीर चेहऱ्याने काहीतरी तत्त्वज्ञान मांडतो आहोत, असा आव आणला व हे गोखले पितृस्थानी असल्याने ते काहीतरी विचार करूनच बोलले असतील, असे अवधूत गुप्ते नावाचे आणखी एक थोर वगैरे गायक, संगीतकार बोलले असले तरी ही सगळी मंडळी कुणाला खूश करण्यासाठी सत्य इतिहासाचे विडंबन करताहेत, हे साऱ्यांनाच माहिती आहे.
अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे. हे सारे पाहून एक प्रश्न वारंवार अनेकांना पडतो - तो म्हणजे स्वत: महात्मा गांधी हयात असते तर कंगना व मंडळींची वक्तव्ये आणि झालेच तर पुतळ्यावर गोळ्या झाडून जयंती साजरी करणाऱ्या किड्यांबद्दल गांधींची प्रतिक्रिया काय असती? ज्या महात्म्याने आयुष्यात टीकाकारांचा कधीच प्रतिवाद केला नाही, सावरकरांना कधी उत्तर दिले नाही, जिनांचे मुद्दे कधी खोडून काढत बसले नाहीत, इतकेच कशाला नथूराम गोडसेची गोळी आपल्या प्राणाचा वेध घेत असताना त्यालाही हात जोडले, ‘हे राम’ म्हणत जगाचा निरोप घेतला, त्या गांधींनी कंगना किंवा त्यासारख्या इतरांची साधी दखलही घेतली नसती. कुठे तो संपूर्ण सहस्त्रकातील थोर, जगाला वंद्य महात्मा अन् कुठे ही थिल्लर, वाह्यात व अदखलपात्र मंडळी. हे खरे आहे, की कंगना रानौत एकटी नाही. भारतीय जनमानसातील गांधींना मारण्याचा हा पहिला प्रयत्नही नाही. गांधींबद्दलच्या अशा कुचाळक्या, टिंगलटवाळी, कुजबुज, नको नको त्या विषयांवरचे विनोद यामागे पुन्हा पुन्हा त्यांच्या चारित्र्याची हत्या करणे हाच हेतू असतो.
देशात एक कंपू गेली शंभर वर्षे हेच करत आला आहे. सोबतच काही गंभीर मुद्यांवर बुद्धिभेद करून गांधींबद्दल द्वेष निर्माण करण्यात आला. त्याच द्वेषाची परिणती वृद्ध महात्म्याच्या हत्येत झाली. प्रत्यक्षात ज्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वाचा महात्मा गांधींनी आयुष्यभर पुरस्कार केला, ते तत्त्व दुबळ्यांचे नव्हतेच मुळी. अहिंसा बलवानांनाच शोभते, ही त्या तत्त्वाच्या अंगीकाराची आद्य अट होती. म्हणूनच ज्यांच्या साम्राज्यावर कधीकाळी सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश महासत्तेला अहिंसेपुढे नमते घ्यावे लागले. सतत सत्याची कास, हिंसेचा स्पर्श होताच दोन पावले मागे येण्याची तयारी यामुळे गांधींची नैतिक ताकद, अधिष्ठान हिमालयाहून अधिक उंचीचे होते. अहिंसेचे तत्त्व भगवान बुद्ध, भगवान महावीर अशा धर्मसंस्थापकांच्या मुशीतून भारतीय भूमीवर शेकडो वर्षे आधी तावून सुलाखून निघालेले होते. महात्मा गांधींनी आधी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात समकालीन संदर्भांसह त्याचा अवलंब केला. महासत्तेविरुद्ध थेट लढा दुबळ्या भारतीयांना पेलवणार नाही, रक्तपात होईल, पिढ्या नष्ट होतील, हे ओळखून त्यांनी अहिंसा, असहकार अशी आयुधे निवडली. जोडीला क्रांतिकारकही सक्रिय होते. या सगळ्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. या प्रक्रियेत अनेकजण ब्रिटिशधार्जिणे होतेच. हीच मंडळी कधी पंडित नेहरू, कधी महात्मा गांधींचे चारित्र्यहनन करीत आली. त्यासाठी कधी सरदार पटेल, कधी सुभाषबाबूंना खांद्यावर घेत आली. दरवेळी लोक संतापतात. परंतु लायकी नसणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रतिष्ठा वाढविणारे मात्र गप्प राहतात. वाह्यातपणा थांबविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. कंगनाच्या शापाने गांधी मरणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जे सुरू आहे ते मात्र नक्कीच उद्विग्न करणारे आहे.