लोकमत संपादकीय - महाभियोगाची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 01:41 AM2021-01-15T01:41:31+5:302021-01-15T01:42:19+5:30
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या तेथील सर्वोच्च न्यायालयानेही ट्रम्प यांचे दावे फेटाळले. तरीही व्हाइट हाउस सोडण्यास ट्रम्प तयार नव्हते
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांचा वाह्यातपणा आवरण्यासाठी महाभियोगाची लस टोचण्यात डेमोक्रॅटिक पक्षाला प्रतिनिधिगृहात यश मिळाले. लसीचा दुसरा डोस सिनेटमध्ये दिला जाईल. मात्र, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील प्रवाह पाहता तसे होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे महाभियोग चालवून ट्रम्प यांना शिक्षा होईलच याची खात्री अद्याप नाही. तरीही व्हाइट हाउस सोडताना महाभियोगाची थप्पड बसावी ही ट्रम्प यांची नाचक्की आहे व ती त्यांनी ओढवून घेतली. हट्ट, दुराग्रह, भ्रमिष्टपणा अशा दुर्गुणांची कमाल पातळी ट्रम्प यांनी ते अध्यक्ष असतानाच गाठली होती. त्यांची वंशवादी विचारसरणी, एककल्ली कारभार, कामात गंभीरतेचा अभाव, अभ्यासाची वानवा आणि हेकेखोरपणा याला अमेरिकी जनता कंटाळली आणि निवडणुकीत ट्रम्प यांना पराभूत केले. जनतेचा कौल हा आपला स्वभाव व धोरणांचा पराभव आहे हे मोकळेपणे मान्य करून नव्या राजवटीला मार्ग मोकळा करून देणे हा लोकशाहीचा समंजस अर्थ असतो. भारतासह जगातील बहुतेक सर्व लोकशाही राजवटीत हा समंजसपणा दाखविला गेला. अमेरिकेतही आजपर्यंत सत्तांतराला विरोध झाला नव्हता. निवडणूक निकालांवर कायदेशीर आक्षेप घेण्याचा मार्ग ट्रम्प यांच्यापुढे होता व हाती असलेले सर्व मार्ग त्यांनी वापरले. परंतु, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे त्यांना सिद्ध करता आले नाही.
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या तेथील सर्वोच्च न्यायालयानेही ट्रम्प यांचे दावे फेटाळले. तरीही व्हाइट हाउस सोडण्यास ट्रम्प तयार नव्हते. उलट बायडेन यांना विजयी घोषित करण्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होऊ नये म्हणून अमेरिकी संसदेवर चालून जा असे आदेश आडवळणाने ट्रम्प यांनी समर्थकांना दिले. हा आततायीपणा त्यांना भोवला. ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकी संसदेत केलेला मवालीपणा जगाने पाहिला आणि केवळ ट्रम्प यांचीच नव्हे, तर अमेरिकेची नाचक्की झाली. अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेवर ट्रम्प यांनी जे शेण फासले, ते पुसण्याची आवश्यकता होती. प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी याबाबत पुढाकार घेतला व महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव तातडीने दिला. प्रतिनिधिगृहाने त्याला मान्यता दिल्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत, मग ती व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष का असेना, असे या महाभियोगाच्या प्रस्तावाने दाखवून दिले, असे पेलोसी यांनी म्हटले आहे. ते खरे आहे. अमेरिकेत लोकशाही जिवंत असल्याचा हा पुरावा आहे व जगालाही त्यातून योग्य संदेश गेला. मात्र, यामुळे ट्रम्प यांचा निकाल लागला वा ट्रम्पीझमचा काटा मोडला असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. उलट ट्रम्पसमर्थक अधिक कडवे होत गेले तर आश्चर्य वाटू नये. महाभियोगाचा प्रस्ताव ठेवण्यामागे बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाचे दोन उद्देश दिसतात. रिपब्लिकन पक्षावरून ट्रम्प यांची पकड सैल करणे आणि ट्रम्प यांना पुढील अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मज्जाव करून रिपब्लिकन पक्षाची ट्रम्प यांच्या वंशवादी विचारांच्या विळख्यातून सुटका करणे. ट्रम्प यांच्या विरोधात दहा रिपब्लिकनांनी मतदान केले व चार तटस्थ राहिले हे पाहता ट्रम्प यांची पक्षावरील पकड सैल होत चालल्याचे दिसते. मात्र, पक्षातील बहुमत अद्याप ट्रम्प यांच्या बाजूने आहे. कारण ट्रम्प पराभूत झाले आहेत हे रिपब्लिकन पक्षाने मान्य केल्यानंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविणे ही रिपब्लिकन पक्षाची मानहानी आहे अशी अनेकांची भावना आहे. यामुळे रिपब्लिकनांचे बहुमत असलेल्या सिनेटमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मान्य होण्यात अनेक अडचणी येतील. सिनेटने शिक्कामोर्तब केल्याशिवाय ट्रम्प दोषी ठरत नाहीत. ट्रम्प दोषी ठरले तरी ट्रम्पीझम संपेल का याचीही शंका आहे.
अमेरिकेवरील आपली पकड सुटते आहे, अशी भावना असलेल्या अमेरिकनांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांचे मतपरिवर्तन हा कळीचा मुद्दा आहे आणि कायद्यापुढे सर्व समान, असल्या भाषेने मतपरिवर्तन न होता विरोधाची मते अधिक जहाल होत जातात. भारतात हिंदुत्ववादी विचारांबाबत असेच झाले. डेमोक्रॅट्सना याचा विचार करावा लागेल. महाभियोगाच्या लसीचा पहिला डोस टोचणे ठीक असले तरी ट्रम्प यांना हुतात्मा बनण्याची संधी मिळू नये. ट्रम्प आणखी वाह्यातपणा करीत नाहीत ना याकडे जरूर लक्ष द्यावे. मात्र, सिनेटमध्ये महाभियोगाची दुसरी लस टोचण्याची घाई न करता वंशवादी विचारसरणीचा जनतेमध्ये पराभव करण्याकडे डेमोक्रॅट्सनी अधिक लक्ष द्यावे. अमेरिकेला कोविडच्या मृत्युछायेतून बाहेर काढणे हे जास्त महत्त्वाचे आहे. लोकशाहीप्रमाणे आरोग्य राखण्यातही अमेरिका पुरती अपयशी ठरली आहे.