समग्र सृष्टीतील चैतन्याची प्रचीती देणारे, ते चैतन्य आज लोपले; त्याला कृतज्ञ नमस्कार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:23 AM2022-02-07T09:23:32+5:302022-02-07T09:27:56+5:30
संगीतकाराची प्रतिभा जिथवर जाईल तिथवर सहज पोचणारा निसर्गदत्त नितळ मधुर आवाज ही लताबाईंना मिळालेली ईश्वरी देणगी होती; पण या माधुर्याच्याही पलीकडे या आवाजात काही वेगळे होते. समग्र सृष्टीतील चैतन्याची प्रचीती देणारे, ते चैतन्य आज लोपले. त्याला कृतज्ञ नमस्कार.
गेल्या शतकाने भीषण नरसंहार घडविणारी महायुद्धे बघितली, आयुष्य होरपळून काढणारे दुष्काळ, उन्हाळे-पावसाळे सोसले आणि प्लेगपासून कोरोनापर्यंतच्या महामारींशी हिरिरीने दोन हात केले. चढत्या वळणावर जाणारी माणसामधील सत्तापिपासा व युद्धखोरी आणि त्यासाठी गुंडाळून ठेवले जात असलेले सगळे नैतिक संकेत, मूल्य याचा हे शतक एक मूक असहाय साक्षीदार होत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट : लता मंगेशकर यांच्या स्वरातील निखळ निर्मळ गोडवा. महायुद्ध आणि महामारी याच्या डोळ्याला डोळा भिडवत गेली आठ दशके माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक वेदनेवर आपल्या स्वरांची गर्द गार सावली धरून उभ्या या स्वराची नोंद जेव्हा या शतकाच्या नावापुढे केली जाईल तेव्हा होणाऱ्या सुख-दुःखाच्या हिशोबात आनंदाची बाजू कदाचित किंचित वरचढच होईल ! मराठी माणसाच्या भावजीवनात ज्या काही नावांना जिव्हाळ्याचे स्थान आहे त्यात लताबाईंचे नाव अग्रस्थानी, कारण मराठी कवितेपासून सहसा दूर असणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी त्यांनी या कवितांची सुरेल गाणी करून ती त्यांच्या जगण्याचा एक अपरिहार्य भाग बनविली. ३६ भारतीय आणि काही परदेशी भाषांमध्ये गायलेली ४० हजारांहून अधिक गाणी, सर्वाधिक गीते रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून नोंदविले गेलेले विक्रम, कित्येक राष्ट्रीय सन्मान, डी लिट, लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार आणि मग भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी सन्मान हे सगळे वैभव वाट्याला येत असताना जिवंतपणे दंतकथा होण्याचे भाग्य लताबाईंना लाभले.
लताबाई आणि एम. एस. सुब्बलक्ष्मी या आपल्या देशातील अशा दोघी स्त्रिया ज्यांनी त्यांच्या क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व मोडून काढत आपले निर्विवाद स्थान निर्माण करीत त्या क्षेत्राचा पुरुषी चेहरा बदलला. संगीतातील नित्य नवे प्रवाह, त्याचा माग काढत स्वतःला अजमावून बघण्यासाठी या क्षेत्रात रोज येणारे तरुण कलाकार, बदलत्या जागतिक संगीतातील घडामोडी आणि रसिकांच्या नव्या पिढ्यांची बदलती रुची आणि अपेक्षा, या अशा कित्येक गोष्टींची ऊठबस असलेल्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाय रोवून टिकून राहणे हेच आव्हान असते. मग, स्वतःचे अढळपद निर्माण करणे ही तर अशक्य अशीच बाब ! सतत फणा काढून उभा असलेला अतिशय काटेरी असा छुपा पुरुषी अहंकार आणि कोणतीही किंमत देऊन नाव मिळविण्याच्या अपेक्षेने आलेले व त्यासाठी पाठीमागून वार करण्यास मागे-पुढे न बघणारे हितशत्रू यांच्यापासून स्वतःला दूर ठेवावे लागते. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर हे सगळे लताबाई शिकत गेल्या, स्वतःला शहाणे करीत गेल्या. अर्थात, त्यांच्यापुढे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. अगदी कोवळ्या वयात, तेराव्या वर्षापासून आयुष्यातील आव्हानांना सामोरे जावे जाण्याची वेळ आल्यामुळे असेल; पण या क्षेत्रात टिकून राहण्याचा त्यांचा निर्धार हे त्यांचे बळ होते. डोळ्यात रंगभूमीबद्दलची अनेक स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची क्षमता असलेले यशस्वी अभिनेते आणि गायक असलेले दीनानाथ मंगेशकर यांचा ४१ व्या वर्षी झालेला अकाली मृत्यू हा संगीत रंगभूमीसाठी एक धक्का होता; पण त्यांच्या पाच कोवळ्या मुलांसाठी दुःखाचा हा भार न पेलणारा होता. सगळ्यात थोरली असे जिला वयाच्या हिशोबाने म्हणता आले असते ती लता तेव्हा फक्त तेरा वर्षांची होती.
लहानपणी कुंदनलाल सैगल यांचा ‘चंडीदास’ नावाचा चित्रपट बघत असताना मोठेपणी त्यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघणारी दीनानाथांची ही थोरली मुलगी. त्यांच्या निधनानंतर आईसह चौघा भावंडांच्या आयुष्याचे उजाड वाळवंट होऊ नये म्हणून आपले थोरलेपण निभवण्यासाठी या स्वप्नाच्या आणि घराच्या बाहेर पडली, तेव्हा तिच्याकडे एकच फार मौल्यवान गोष्ट होती, वडिलांनी लहानपणी शिकविलेल्या काही बंदिशी आणि दिलेले संगीताचे धडे. शिक्षण जेमतेमच, त्यामुळे घर चालविण्यासाठी गाणे म्हणणे किंवा चित्रपटात मिळेल ते काम करणे हे दोनच पर्याय समोर होते. त्याच्या आधी वसंत जोगळेकर यांच्या ‘किती हसाल’ नावाच्या सिनेमासाठी त्यांनी लताचे एक गाणे ध्वनिमुद्रित केले होते; पण आपल्या मुलीने चित्रपटात गाणे दीनानाथांना फारसे मंजूर नसल्याने ते गाणे त्या चित्रपटातून वगळण्यात आले.
दीनानाथांच्या मृत्यूनंतर या कुटुंबाच्या मागे उभे राहिले ते दीनानाथ यांचे स्नेही मास्टर विनायक. यांनी छोट्या लताला चित्रपटात किरकोळ भूमिका मिळवून दिल्या. अभिनयाकडून पार्श्वगायनाकडे वळताना मुंबईत भेंडी बाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खां यांच्याकडून लताचे शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण सुरू झाले. मास्टर दीनानाथ यांच्या मुलीच्या गळ्यातील स्वरावर संगीतकार गुलाम हैदर यांचा फार विश्वास होता, म्हणूनच ते तिला घेऊन एका निर्मात्याकडे गेले. लताला त्यांनी त्यांच्या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी द्यावी ही त्यांची विनंती त्या निर्मात्याने साफ फेटाळून लावली. त्या मुलीचा आवाज ‘फार पातळ’ असल्याचे त्याचे म्हणणे होते! आणि ‘पातळ आवाजाच्या’ या मुलीचा सामना त्यावेळी कोणाशी होता? त्या दिवसांवर अंमल होता तो शमशाद बेगमच्या मादक आवाजातील ‘कजरा मुहब्बतवा’ आणि मल्लिका ए तरन्नुम नूरजहाने गायलेल्या ‘जवां है मोहोब्बत’ या गाण्यांचा. त्या मिठ्ठास गोडीवर तडका मारण्यासाठी शमशाद बेगम यांचा बुरखा आणि प्रत्येक गाण्याची त्यांना मोजावी लागणारी भरभक्कम बिदागी याचे खरे-खोटे रंगतदार किस्से चघळले जात होतेच. या दोघींच्या जोडीला अमिराबाई कर्नाटकी आणि ‘मेरा सुंदर सपना बित गया’ म्हणून उसासे टाकणारी गीता दत्त होतीच. अशा वेळी तेरा-चौदा वयातील आवाजाची कोवळीक घेऊन आलेल्या या मुलीला कोण विचारणार? पण या मुलीच्या भाग्यात तेव्हा ‘महल’ नावाचे एक अविश्वसनीय असे वळण सटवाईने लिहिलेले होते. ४९ साली आलेल्या या सिनेमाने आपल्या पोतडीत आणलेल्या दोन अद्भुत गोष्टी आजही त्या पिढीच्या रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यात (पुन्हा) दिसलेले मधुबाला नावाच्या सौंदर्यवतीचे निर्मळ आरसपानी सौंदर्य आणि लताच्या कोवळ्या आवाजातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे! या गाण्याने निव्वळ इतिहासच घडविला नाही, तर त्यानंतर लता मंगेशकर नावाची गायिका संगीतकारांना ‘दिसू’ लागली.
या एका गाण्याने लताबाईंचे नशीब रातोरात बदलले नसेल; पण या आवाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे सिनेसृष्टीला नक्की जाणवले. या मुलीकडे असलेले समृद्ध सांगीतिक संचित, शास्त्रीय संगीताची तिच्याकडे असलेली बैठक आणि दृष्टिकोन, तीन मिनिटाच्या गाण्यासाठीसुद्धा ज्याची गरज असते असा मेहनतीने घडलेला गळा आणि वाट्याला आलेले प्रत्येकच गाणे उत्तम होण्यासाठी वाट्टेल तितके कष्ट करण्याची तयारी. यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या पुढील कित्येक पिढ्यांना पुरून उरेल असा हा यशाचा ‘मंगेशकर मंत्र’ लताबाईंनी आणि त्यांच्या बरोबरीने हृदयनाथ आणि आशा भोसले यांनीही आपल्या उदाहरणातून सिद्ध केला आहे. यशस्वी होण्यासाठी गॉडफादर किंवा ‘काहीही देण्याची (?)’ तयारी यापेक्षा गुणवत्ता आवश्यक असते हे आपल्या वावरातून आणि वर्तनातून अबोलपणे दाखवून दिले. लता मंगेशकर या नावाबरोबर ही हजारो गाणी, त्याचे संगीतकार, त्या गाण्यांच्या जन्माचे-यशाचे किस्से आणि कहाण्या, मंगेशकर मोनोपोली नावाचे गॉसिप आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर आपल्या कामगिरीने त्यांनी उमटविलेली अमीट मुद्रा अशा अनेक गोष्टींचे स्मरण सदैव होत राहील.
‘कृष्णाच्या मथुरेत विसरलेला पावा लताच्या गळ्यातून पुन्हा प्रकटला’ असे भालजी पेंढारकर म्हणाले, ते खरेच होते! दर्दी जाणकारांची श्रीमंत हवेली असो, वा मध्यरात्री निरव आभाळाखाली एकट्याच जागत बसलेल्या एखाद्या बेघर माणसाचे उलघाल होत असलेले काळीज, हरेकाच्या सुखदु:खाच्या क्षणी त्याला आधार देत कवेत घेणाऱ्या लताबाईंच्या स्वरांची सावली जगाच्या अंतापर्यंत कायम राहाणार असली, तरी त्या स्वरांची जन्मदात्री आपल्यामध्ये उरली नाही याने होणारी पोरकेपणाची भळभळती जखम कोट्यवधी लोकांच्या काळजावर आता कायमची कोरली गेली आहे. संगीतकाराची प्रतिभा जिथवर जाईल तिथवर सहज पोचणारा निसर्गदत्त नितळ मधुर आवाज ही लताबाईंना मिळालेली ईश्वरी देणगी होती; पण या माधुर्याच्याही पलीकडे या आवाजात काही वेगळे होते. समग्र सृष्टीतील चैतन्याची प्रचीती देणारे, ते चैतन्य आज लोपले. त्याला कृतज्ञ नमस्कार.