लोकमत संपादकीय : लाल-भगव्याचं मिश्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 05:13 AM2019-01-12T05:13:59+5:302019-01-12T05:15:55+5:30
मास्तरांना सोलापुरातून सलग दोन वेळा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
तीस हजार घरांच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच सोलापुरात येऊन गेले. त्यांचं भाषण म्हणजे ‘गाजरांचा ढीग’ असं सुशीलकुमार शिंदेंना वाटलं. मात्र, पार्क स्टेडियमच्या सभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचं ज्या पद्धतीनं कोडकौतुक झालं, ते तमाम भक्तांना बुचकळ्यात टाकणारं होतं. विशेष म्हणजे, या आडम मास्तरांनीही केलेला ‘मोदींचा जयघोष’ डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. मास्तरांनी मुख्यमंत्री फडणवीसांचाही केलेला नामजप आश्चर्यचकित करून टाकणारा होता. मास्तर म्हणजे कम्युनिस्ट चळवळीतली बुलंद तोफ. गेल्या पन्नास वर्षांपासून जातीयवाद्यांवर तुटून पडणारा पेटता गोळा. मास्तरांच्या तोंडून आजपर्यंत केवळ निखारेच बाहेर पडलेले; मात्र या सभेत त्यांनी मोदी-फडणवीस जोडीवर केवळ स्तुतिसुमनंच उधळली. पंधरा-वीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी गायिलेला मोदी पोवाडा ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांना क्षणभर वाटलं, मास्तर भाजपात आले की आपण सारे माकपात गेलोत? कारण, हे दोन्ही विचार म्हणजे विळा-भोपळा. या दोन्ही पक्षांचं नातं जणू साप-विंचवाचं; तरीही ज्या पद्धतीनं या दोघांनी एकमेकांना डोक्यावर घेतलं, ते पाहता सोलापुरातील राजकीय भविष्याची चुणूक जनतेला लागावी. मास्तर हे कामगारांचे नेते. विडी वळणाऱ्या महिला असो की कापड विणणारे कारागीर, दोन्हीही वर्ग वर्षानुवर्षे मास्तरांच्या पाठीशी राहिले. या कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वांत मोठी घरकूल योजना साकारण्याचं स्वप्न मास्तरांनी पाहिलं. गेल्या दशकात दहा हजार घरांचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र तीस हजार घरांची नवीन फाईल म्हणे आघाडी सरकारच्या काळात धूळखात पडली. २०१४ साली युती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फायलीवरची धूळ झटकली. त्यांच्यामुळेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ही कहाणी खुद्द मास्तरांनीच आपल्या भाषणात सांगितली.
मास्तरांना सोलापुरातून सलग दोन वेळा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१९ च्या निवडणुकीतही ते पुन्हा आपली ताकद अजमाविण्याच्या तयारीत असताना एकीकडं ‘भाजपाचं कौतुक’ अन् दुसरीकडं ‘काँग्रेसवर टीका’ करण्याची दुहेरी खेळी त्यांनी सभेत अवलंबली. कारण, या ठिकाणी मास्तरांचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसच. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्यानं मास्तरांनी नवी राजकीय समीकरणं जुळविली असली तरी लाल बावट्याच्या झेंड्याला भगवी किनार अधोरेखित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न. या नव्या विचित्र आघाडीचा फायदा विधानसभेला मास्तरांना होईल की लोकसभेला भाजपाच्या उमेदवाराला, हे काळच ठरवेल. मोदी-फडणवीस सरकारचं बोट धरल्याशिवाय नव्या घरांचा उंबरठा ओलांडता येणार नाही, हे ओळखून मास्तरांच्या वाणीत आलेली विनम्रता भाजपा नेत्यांच्या कानाला गुदगुल्या करणारी ठरली. त्यामुळे लाल बावट्याच्या घरकुलांसाठी वाट्टेल ते करण्याची भाषा भाजपा नेतेही बोलून गेले. ‘काँग्रेसमुक्त’ मोहिमेत जे-जे सामील होतील त्या-त्या सर्वांना पाहिजे ती ताकद देण्याची मोदी-फडणवीसांची भूमिका सोलापूरच्या शिवसैनिकांना मात्र बुचकळ्यात टाकणारी ठरली. हा मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा. या पट्ट्यात पूर्वी सेनेचा आमदार निवडून आलेला. गेल्या निवडणुकीत युतीची फाळणी झाल्यानंतर सेनेसोबत भाजपानंही इथं उमेदवार उभा केला होता. मात्र खरी लढत शेवटपर्यंत काँग्रेस, एमआयएम अन् सेनेतच झाली होती. भाजपा अन् माकपचे उमेदवार मतदानाच्या आकड्यात खूप दूरवर फेकले गेले होते. त्यामुळे २०१९ मध्ये लाल बावटा झेंड्याच्या साक्षीनं इथं ‘श्रीरामाचा’च गजर झाला पाहिजे, ही भाजपाची नवी व्यूहरचना काँग्रेसला घातक ठरेल की सेनेला, याचं उत्तर नऊ महिन्यांनंतर मिळेल. कदाचित याच भविष्याची नांदी ओळखून काँग्रेसच्या प्रणितींनी सोडलेला वाक्बाण भाजपा नेत्यांना लागला असावा. प्रणिती म्हणाल्या होत्या की, ‘पडलेल्या आमदारांच्या जीवावर पंतप्रधानांची सभा आयोजित केली गेलीय.’ त्यांनी एकाच वाक्याच्या दगडात दोन पक्षी मारले. याचं प्रत्यंतरही दुसºया दिवशी पार्क मैदानावर आलंच. कारण, मोदी भाषण करीत असताना समोरच्या पासष्ट हजार श्रोत्यांमध्ये बहुतांश डोकी लाल बावट्याची टोपी परिधान केलेलीच होती.
आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी राजकारणातील वैचारिक बैठकीच्या पलीकडं जाऊन भाजपासोबत जी नवी स्ट्रॅटेजी कम्युनिस्ट नेत्यानं वापरलीय, ती एखाद्या प्रोफेशनल उद्योजकाला शोभणारी ठरलीय.