लोकमत 'वसंतोत्सव'... महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 06:24 PM2018-03-20T18:24:07+5:302018-03-20T18:24:07+5:30
योग्य माणसाला योग्य ठिकाणी ठेवून योग्य काम करवून घेणे, हे वसंतरावांनी आपले धोरण ठरविले.
>> रवीन्द्र वासुदेव गाडगीळ
थोर लोक द्रष्टे असतात, याची प्रचिती पूर्वीपासूनच प्रत्ययास येत असते. भविष्यात घडणाऱ्या घटनेचे ज्ञान द्रष्ट्या पुरुषांना असते किंवा ते बोलून गेलेल्या गोष्टी त्यांच्या अलौकिक प्रभावामुळे घडून येतात.
महाराष्ट्रातील विदर्भात यवतमाळ जिल्हात पुसद तालुक्यात ‘गहुळी’ या गावात वसंतरावांचा १ जुलै १९१३ रोजी जन्म झाला. ते वंजारी जमातीतले मूळचे बंजारा हे राजस्थानातील क्षत्रीय होत. वंज म्हणजे वाणिज्य (व्यापार) जमात. नंतर व्यापार करतात करता स्थायिक झाली. त्यांचा मुखिया म्हणजे ‘नाईक’ म्हणून वसंतराव नाईक (नायक). अमरावती, नागपूर मधून शिक्षण. बी.ए., एल. एल.बी. झाले. पुसदला (१९४०) वकिली सुरू, परंतु वकिलीत मन रमेना. समाजसेवेची व राष्ट्रसेवेची ओढ स्वस्थ बसू देईना. शेतकऱ्यांच्या व मजूरांच्या सुखातच देशाचे व समाजाचे सुख आहे हे त्यांना पटले. कारण सावकारी पाशातून शेतकरी कधीच मुक्त होत नव्हता. त्यामुळे शेती व शेतकरी यांचा विकास खुंटत होता. त्यात हे आदिवासी, शेतकरी व शेतमजूर अज्ञानी, अशिक्षित व व्यसनाधीन. आपल्या समाजाला ते समजावत, ‘धार्मिक अंधश्रद्धा सोडा, शिक्षण घेऊन शहाणे व्हा. जुनाट व निषिद्ध रूढीपरंपरा, आचार-उच्चार-विचार पद्धती दूर करा. ज्यामुळे अधोगती होते ते संपूर्णपणे व्यर्ज करा. समाजाची सर्वांगीण सुधारणा व प्रगती करण्याकडे प्रत्येकाने लक्ष घाला.’ समाजाला पटले. समाज सुधारू लागला. त्यांच्याकडे आपोआपच नेतेपद चालून आले. ग्रामसुधार कार्यक्रमाला त्यांनी उत्तेजन दिले. त्यात सहभागी झाले. श्रमदानाचे महत्त्व पटवले. साक्षरता मोहीम राबवली. १९४६ मध्ये पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. वकिली जोरात चालू होती. राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्र वाढू लागले. १९४१ वत्सलाबाईंशी विवाह झाला. पूर्वीच्या घाटे कॉलेजमध्येच ओळखीचे रूपांतर प्रेमविवाहात झाले. समान गुण व शील जेव्हा प्रेम विवाहात जाऊन मिळतात तेव्हा तो प्रवाह इतका जोमदार बनतो की त्याला कोणताही विरोध, बंधने लागू होत नाहीत. कारण दोन जिवांचे खरे प्रेम लहान मोठ्या कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना जुमानत नाही. त्यांचे पूर्ण सहकार्य वसंतरावांना लाभले. १९५२ मध्ये सार्वजनिक पहिल्या निवडणुकीत आमदार म्हणून वसंतराव निवडून आले. जुन्या मध्यप्रदेशचे राजस्व उपमंत्री म्हणून निवड झाली. नागपूर येथे ते द्विभाषिक प्रांताचे मंत्री म्हणून राहत होते. १९५८ मध्ये चीन व जपान दौरा केला. १९६४ युगोस्लोव्हाकिया, युरोप दौरा केला. भारत पाकिस्तान युद्धात राज्यनागरिक संरक्षण समिती स्थापन केली. जवानांना भेटी, देणग्या, आर्थिक मदत, कर्जे देऊन त्यांच्या कुटुंबीयांची अडचण दूर केली. अशी अनेक कार्य केली. १९४२ मध्ये म. गांधींच्या भाषणाचा प्रभाव पडून ‘खादी’ चा वापर आयुष्यभर केला. काँग्रेस पक्षात सक्रिय सहभाग सुरू केला.
आपल्याकडील स्थानिक संस्था कर्तबगारीच्या, यशाच्या दृष्टीने आदर्श संस्था ठरत नाहीत. वशिलेबाजी, संकुचित दृष्टिकोन, वैयक्तिक व जातीय स्वार्थ सत्ताधारी लोकांच्या मनात असल्यामुळे स्थानिक संस्थांची व्हावी तशी प्रगती न होणे, काम कठीण व कठोर आहे अशी जबाबदारी घेणारी व्यक्ती लोकप्रिय राहणे शक्य नसते. वसंतरावांनी त्यावेळेस नगरपालिकेत निःपक्षपाती राहून नोकऱ्या दिल्या. कोण कोणाचा आहे, हे न पाहता कोण किती योग्य आहे व कोणत्या संस्थेला, जनतेला त्याचा कितपत उपयोग योग्य होणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिले. योग्य माणसाला योग्य ठिकाणी ठेवून योग्य काम करवून घेणे, हे त्यांनी आपले धोरण ठरविले. त्यामुळे ती एक आदर्श नगरपालिका बनली. पक्षांतराहून त्यांनी पक्षातील मतभेद मिटविण्याचा कसून प्रयत्न केला. पक्षात व गटात राहूनच पक्षाचे बळ वाढू शकते हे त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनात बिंबविले. प्रामाणिक हेतू व उत्कट इच्छा असणाऱ्यांना असाध्य काहीच नाही. १९५१ मध्ये भूदान चळवळीला पाठिंबा दिला. हजारो एकराचे भूदान मिळवून दिले. त्याग, उद्योग, विद्वत्ता व राष्ट्रीयत्वाची ओतप्रोत भावना ज्या व्यक्तीत आहे ती व्यक्ती कोणाच्या मनाचा ठाव घेणार नाही? वसंतरावांनी आपला शब्द खर्च केला. त्यांच्या शब्दाला मान मिळाला. भूदान यशस्वी झाले.
१९५६ रोजी मा. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून निवड झाली. १९५७ ला कृषिमंत्री झाले. दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यात ते निवडून आले. मुंबई प्रांताचे कृषिमंत्री झाल्यावर दौरा काढून त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे हित कशात आहे हे सांगून जागृत केले. त्यांच्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव करून दिली. जास्त पिके काढणे ही एक लढाई आहे. ही लढाई जिंकलात तर शेतकऱ्यांचे दारिद्र्य, रोगराई व अज्ञान नाहीसे झालेच असे समजा. काळाची पावले ओळखून शेतकऱ्याने पुढील पिढीसाठी, सुख समृद्धीसाठी द्वितीय पंचवार्षिक योजना सफल करण्यासाठी त्याग व परिश्रम केलेच पाहिजेत हे पटविले. त्यासाठी त्यांनी रस्तेबांधणी व दुरुस्तीचे कार्य जोमाने सुरू केले. नवीन विहिरी खोदून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली. पंपींगसेटसाठी कर्ज योजना आखल्या. विहीरींसाठी कर्जाची सोय केली. विजेचे पंप दिले. नवीन तलाव (पाझर) खोदण्यात आले. धरणे बांधली, काही दुरुस्तही केली. ग्रामदान योजनेंतर्गत जनतेकडून पैसा जमा करून शेतीकडे मदत म्हणून वळविला. परस्पर सहकार्यासाठी सहकारी संस्था निर्माण केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला. अतिरिक्त अन्नधान्य साठविण्यासाठी शासकीय व खासगी गोदाम बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाजारभाव बांधून दिल्याने शेतकरीराजा आनंदी व सुखी झाला (दुर्दैव असे की, त्याच हरित भरित विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे कृषीसंपन्न देशासाठी लज्जास्पद आहे.)
कापसाला योग्य भाव देऊन कापूस फेडरेशन स्थापन केले व जिनिंग फॅक्टरी, कॉटन प्रेस उघडण्यास शासकीय साहाय्य पुरविले. काही सहकारी तत्वावर फॅक्टरीज चालू केल्या. सहकारी दूध उत्पादक संस्था निर्माण करून शेतीला पूरक धंदा उघडून दिला. दूध विक्रीचा मोठा प्रश्न सुटला. शेती अवजारे, साधने, हायब्रीड बियाणे, खते, औषधे, संरक्षण, ट्रॅक्टर्स सहकारी तत्वावर देणाऱ्या संस्था, पतपेढ्या, सोसायट्या निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांनी आधुनिक शेतीचे बाळकडू दिले.
................
वसंत चरित्र
लेखकः रामबिहारी बैस, प्रा. दिनकर देशपांडे,
प्रस्तावनाः मा. यशवंतराव चव्हाण,
शेतीचा विकास हाच भारताच्या विकासाचा पाया आहे. ही वसंतरावांची मनोधारणा होती. स्वतः ते एक निष्णात व कार्यक्षम असे शेतकरी (कास्तकार) होते, म्हणूनच तर ते शेतकऱ्यांच्या जीवनाशी निकटचा संबंध ठेवून त्यांची सुखदुःखे जाणू शकले. महाराष्ट्रातील शेतीची एकूण परिस्थिती तेवढी अनुकूल नसतानासुद्धा अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी जे कार्य केले आहे त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले.
- यशवंतराव चव्हाण
जनता ही वाईट माणसाला ‘नेतृत्वपदी’ कधीच जास्त वेळ ठेवत नाही. नेता जर आदर्श राहिला नाही, तर जनता अशा नेत्याची गय करत नाही. नेता चुकू शकतो, परंतु योग्य नेत्याची निवड करण्यात जनता कधीच चुकत नाही. समाजाची, राष्ट्राची पर्यायाने देशाची सेवा इमानदारीने तन-मन-धनाने करीत राहिल्याने जनता पाठीमागे येते.
- लेखक – रामबिहारी बोस
यशवंतरावांसारख्या धुरंदर आणि आराजकारणपटुत्व असलेल्या व्यक्तींच्या सहवासात वसंतराव यांच्या जीवनातील काही काळ गेला. सह्याद्री, हिमालयाच्या रक्षणार्थ धावल्याबरोबर कणखर नेतृत्वाची भासणारी उणीव या वऱ्हाडी मातीनं आणि वऱ्हाडी वाणीनं भरून काढली. एका अस्थिर जमातीतील एक व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर तब्बल अकरा वर्षे सतत बसणे हे एक महद्आश्चर्य आहे. त्याच्या मागे त्यांचे सततचे श्रम, कष्ट, सहकार्य, औदार्य, सहिष्णुता, राष्ट्रप्रेम, पक्षनिष्ठा व देशसेवा हेच कारणीभूत होते. नैराश्यमय वातावरणात गरज असते अशा सामान्यातून असामान्यत्व घडविणाऱ्या जीवनचरित्राची. आज प्रत्येक व्यक्ती ही सुखासीन जीवन जगण्याच्या प्रवृत्तीने झपाटलेली दिसते व अल्प, स्वल्प कष्टात मोठे पद, मान, धन कसे प्राप्त होईल या विवंचनेत असते म्हणूनच आपली प्रगती कुठेतरी थांबल्या सारखी वाटते. ती कार्यरत व्हावी, प्रामाणिक आणि निकोप समाज या देशात बलशाली व्हावा या ध्येयाप्रत जाण्याची स्फूर्ती जरी या चरित्रापासून झाली तरी लेखक प्रकाशक धन्य होतील.
- प्रा. दिनकर देशपांडे
(क्रमशः)
ravigadgil12@gmail.com