लोणावळ्यात भरते मनाची व्यायामशाळा; 'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी?

By विजय बाविस्कर | Published: July 9, 2023 06:53 AM2023-07-09T06:53:00+5:302023-07-09T06:53:25+5:30

'स्व'च्या पलीकडे जाऊन इतरांशी असलेला आपला अविभाज्य संबंध दाखवणारा, मनाची मरगळ घालवून उमेद देणारा, देशभक्ती जागवणारा, कृतिप्रवण करणारा असा 'वंद्य वंदे मातरम्' हा पॅनोरामिक स्फूर्तिदायक कार्यक्रम हे देखील 'माइंड जिम'चे वैशिष्ट्य आहे.

Lonavala fills the gymnasium of the mind; Why 'Mind Training Zone'? | लोणावळ्यात भरते मनाची व्यायामशाळा; 'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी?

लोणावळ्यात भरते मनाची व्यायामशाळा; 'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी?

googlenewsNext

विजय बाविस्कर, समूह संपादक 

सर्व घटनांमागचा कार्यकारण भाव मानवी मनच आहे, हे उमगल्यापासून मानवाने मनाचा अभ्यास सुरू केला. त्यालाही हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र त्याचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण काही शे वर्षांपासून सुरू झाले. भारतीय संतांनीही मनाबद्दल भरपूर लिहून ठेवले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात- मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ॥ थोडक्यात मन ठीक, तर बाकी सर्व ठीक! समर्थ रामदासांनी 'मनाचे श्लोक' लिहून मनोवस्थांचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. ते सर्वांना लागू होते. विदेशी तत्त्ववेत्त्यांनीही मनाचा सखोल अभ्यास करून त्यावर विस्तृतपणे लिहिले आहे.

माइंड ओव्हर मॅटर'चा सिद्धांत चार्ल्स नाइल यांनी पहिल्यांदा म्हणजे १८६३ मध्ये मांडला. मन सर्वतोपरी आहे, असे हा सिद्धांत सांगतो. खरं तर 'द्वैत अद्वैत' चर्चा तेव्हापासूनच पुन्हा सुरू झाली असावी. 'चेतना श्रेष्ठ की भौतिक जग' यावर बराच सैद्धांतिक खल सुरू असतो. मात्र मनाचे महत्त्व कोणीही नाकारलेले नाही, हे वास्तव आहे. प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतो, 'The mind is everything, What you think, you become.' थोडक्यात काय तर 'मन' हा अत्यंत महत्त्वाचा, कळीचा विषय आहे. म्हणून त्यावर सातत्याने संशोधन सुरू आहे, सुरूच राहील. कारण म्हणतात ना, मनाचा तळ कधीच सापडत नसतो. त्यासाठी सुरू झाली मनाची मशागत, मनाच्या क्षमतांचा अभ्यास आणि क्षमता विस्तारण्यासाठी संशोधन.

लोणावळ्यात आपणाला मनाच्या संशोधनाचा पुढचा टप्पा पाहायला मिळतो. हनुमानाला जेव्हा सीताशोधासाठी उड्डाण करावे लागले, तेव्हा जांबुवंताने हनुमानाला, त्याच्या विसर पडलेल्या, उडण्याच्या शक्तीची जाणीव करून दिली होती. स्वतःच्या सुप्तसामर्थ्याची झालेली जाणीव त्याचा आत्मविश्वास जागवून गेली. ही झाली पुराण कथा. आता आपल्या क्षमतांची जाणीव होणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ध्यास लोणावळ्यातील एका संस्थेने, मनशक्ती प्रयोग केंद्राने घेतला आहे. आपल्या सुप्त क्षमतांचे अस्तित्व दृश्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळावे, त्या क्षमता विकासाच्या युक्त्या माणसाला मिळाव्यात, या अभिनव संकल्पनेतून मनशक्ती प्रयोग केंद्राने लोणावळ्याला निसर्गरम्य अशा एक एकर जागेत 'माइंड जिम' या तीन मजली प्रकल्पाची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केली आहे. माइंड ट्रेनिंग (प्रशिक्षण), माइंड एक्स्पीरियन्स (अनुभूती) आणि माइंड इन्स्पिरेशन (प्रेरणा) अशी तीन मजल्यांवर तीन दालने आहेत.

मनाला, मेंदूला तत्काळ अशी प्रतिक्रिया मिळाली, की पुन्हा योग्य मनःस्थिती निर्माण करायला तो शिकतो. या प्रशिक्षणाचा सविस्तर अहवाल लगेच मिळतो. त्यामुळे व्यक्तीला अनुभव येतो की, आपण ठरवू त्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकतो, स्थिर राहू शकतो. अशा तत्त्वावर आधारित मनाला प्रशिक्षण देणारे, विविध क्षमतांचा विकास करणारे अनेकविध उपक्रम अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने विकसित केले आहेत. मुलांना आणि मोठ्यांना खेळाच्या माध्यमातून आपल्या क्षमता वाढवण्यासाठी घरी वापरता येतील, असेही अनेक खेळ निर्माण केले: केले आहेत. याशिवाय 'मन अनुभूती कक्षा'त व्यक्तिमत्त्व, स्वभाव, ताण, भावना यांचा वेध घेणाऱ्या विविध चाचण्या, तसेच मनाला शिथिल, ताणरहित करण्याची प्रात्यक्षिके आणि मर्यादित समुपदेशन अशा सुविधा उपलब्ध आहेत.

'स्व'च्या पलीकडे जाऊन इतरांशी असलेला आपला अविभाज्य संबंध दाखवणारा, मनाची मरगळ घालवून उमेद देणारा, देशभक्ती जागवणारा, कृतिप्रवण करणारा असा 'वंद्य वंदे मातरम्' हा पॅनोरामिक स्फूर्तिदायक कार्यक्रम हे देखील 'माइंड जिम'चे वैशिष्ट्य आहे. 'माइंड जिम मध्ये मनाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे, सुप्त क्षमता जाणिवेचे आणि जागृतीचे काम होत आहे. आपल्या क्षमतांचा विकास करण्याचे तंत्र आणि प्रेरणा मुलांना मोठ्यांना त्यातून मिळत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांनी 'माइंड जिम' पाहिल्यावर उद्गार काढले की, मी ४२ देशांत फिरलो आहे; परंतु मनशक्तीसारखे 'माइंड जिम' मी पाहिलेले नाही. 'माइंड जिम' इज माइंड ब्लोइंग !

'माइंड ट्रेनिंग झोन' कशासाठी?

मूलतः चंचल, शक्तिमान असलेल्या मनाला आवश्यक कौशल्यप्राप्तीसाठी स्थिरतेची, शांतीची एकाग्रतेची सवय लावणे, हे यातील एक उपाय सूत्र आहे. मनःस्थितीचा परिणाम मेंदूतून सतत बाहेर पडणाऱ्या लहरींमध्ये दिसून येतो. मेंदू लहरींचे अल्फा, विटा, डेल्टा, थिटा यासारखे अनेक प्रकार आहेत. झोप, शांती, एकाग्रता, स्थिरता, सातत्य, तत्परता, चंचलता अशा मनःस्थितीची माहिती मेंदूलहरीतून मिळते. 'माइंड ट्रेनिंग झोनमध्ये व्यक्तीच्या डोक्याला हेडगियर लावून त्यांच्या मेंदूलहरींची माहिती ब्ल्यूटूथद्वारे यंत्राला मिळते. कार्य तत्परता, नवशिक्षणासाठी एकाग्रता यासाठी ज्या लहरी आवश्यक आहेत, त्या मेंदूतून बाहेर पडल्या तरच पुढे यंत्राच्या माध्यमातून एखादा खेळ सुरू होतो. पण मनःस्थिती अस्थिर झाली तर मात्र खेळ थांबतो.

Web Title: Lonavala fills the gymnasium of the mind; Why 'Mind Training Zone'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.