दिसावे जनाचे, असावे मनाचे...

By admin | Published: January 31, 2017 05:04 AM2017-01-31T05:04:06+5:302017-01-31T05:04:06+5:30

पवार पद्मविभूषण झाले. त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली. गेली ५० वर्षे ते महाराष्ट्राचे राजकारण करीत आहेत म्हणजे ते त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. चार वेळच्या मुख्यमंत्रिपदासह

Looks like a man, it should be ... | दिसावे जनाचे, असावे मनाचे...

दिसावे जनाचे, असावे मनाचे...

Next

पवार पद्मविभूषण झाले. त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली. गेली ५० वर्षे ते महाराष्ट्राचे राजकारण करीत आहेत म्हणजे ते त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. चार वेळच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्रातील अनेक मंत्रिपदे व लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद या साऱ्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते लोकांशी बोलतात, त्यांचे ऐकून घेतात आणि त्यांच्यात मिसळतात. म्हटले तर साऱ्या महाराष्ट्राला आपला वाटावा असा हा माणूस आहे. मात्र तो आपल्याला पुरता समजला आहे असे छातीठोकपणे सांगण्याची क्षमता एकाही मराठी माणसाजवळ नाही. साऱ्यात असायचे आणि तरीही त्यांच्यात नसायचे असे वागणे ज्या थोड्या नेत्यांना साधते त्यात पवार एक आहेत. आपल्या जवळच्या माणसांनाही आपला मनसुबा कळू न देण्याचे व त्यांच्यासकट साऱ्या महाराष्ट्राला संभ्रमात व तिष्ठत ठेवायचे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. तरीही लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्यावर ज्यांनी कधीकाळी राग धरला तेही त्यांच्याविषयी मनात ममत्व राखतात आणि त्यांच्या पक्षाएवढेच त्यांना विरोध करणाऱ्या पक्षातही त्यांचे चाहते असतात ही त्यांना साधलेली किमया आहे. उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे यांचे ते काका असतात. त्या दोघांनी ज्यांच्याशी आता वैर धरले आहे त्या फडणवीसांचे ते तारणहार असतात. काँग्रेस पक्षाशी त्यांची भाऊबंदकी असते. पण त्या पक्षाशी त्यांना आघाडीही जुळविता येते. मोदी त्यांच्याकडे येतात आणि फारुख अब्दुल्लाही त्यांचे मित्र असतात. संघातली माणसे त्यांच्याविषयी कधी बोलत नाहीत, पण बोललीच तर तीही त्यांच्याविषयी बरेच बोलतील याची शक्यता मोठी आहे. कारण पवार केव्हा कुणाच्या कामी पडतील आणि कधी कोणाची साथ, निर्वैर राहून सोडतील याचा भरवसा नाही. त्यांनी यशवंतरावांचे नेतृत्व स्वीकारले, पुलोदचे नेतृत्व केले, काँग्रेसच्या मंत्रिमंडळातली मोठी पदे भूषविली आणि वाजपेयींनीही त्यांना महत्त्वाची स्थाने दिली. देशात कधीकाळी सर्वपक्षीय सरकार आलेच तर त्याचे नेतृत्व त्यांच्याचकडे यावे असे त्यांचे आजवरचे राजकीय व्यक्तिमत्त्व राहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांशी उघड पंगा घेतल्यानंतरचे व राज्यातील भाजपा-सेना युती तोडल्यानंतरचे पवारांचे वक्तव्य या संदर्भात बरेच काही सांगणारे व त्यांच्या काहीशा संशयास्पद व अविश्वसनीय आणि तरीही हव्याशा वाटाव्या अशा राजकारणाचे अधोरेखन करणारे आहे. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर फडणवीसांचे सरकार अल्पमतात येणार आहे. काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देण्याची जराही शक्यता नाही. या स्थितीत फडणवीसांना नव्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार हे उघड आहे. मात्र तसे त्यांना करावे लागणार नाही याची शक्यताही शरद पवार हीच आहे. फडणवीसांचे सरकार सत्तेवर येत असताना सेनेने बराच काळ खळखळ करून त्यांच्यापासून दूर राहण्याच्या व त्याच्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पवारांनी फडणवीसांना अभय देत ‘ते नसले तरी मी आहे’ असे म्हणून दिलासा दिला होता. परिणामी बहुमत नसतानाही फडणवीसांचे सरकार सत्तारूढ झाले आणि पवार त्याचे पाठीराखे बनले. सेनेच्या आताच्या दुराव्यामुळे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार व पवारांच्या बळावर फडणवीस सत्तेत टिकणार असेच साऱ्यांना वाटत आहे. मात्र फडणवीसांनाही तसा विश्वास वाटू दिला तर मग ते पवार कसले? त्यांनी साऱ्यांनाच संभ्रमात ठेवणारे व त्यांच्या प्रकृतीला साजेसेच वक्तव्य यासंदर्भात केले आहे. ‘या स्थितीत फडणवीसांना नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील अशी शक्यता आहे’ असे ज्या दमात त्यांनी सांगितले त्याच दमात ‘या स्थितीत त्यांना आम्ही पाठिंबा द्यायचा की नाही हे आमच्या पक्षात बसून ठरवू’, असेही म्हणून टाकले. परिणामी पवार मुक्त, सेना लोंबकळणारी आणि फडणवीस वाट पाहणारे. फडणवीसांना पाठिंबा देणाऱ्या अन्य बारक्या पक्षांची स्थिती तर आणखीच केविलवाणी. ही अवस्था काँग्रेससारख्या अखिल भारतीय पक्षालाही संभ्रमात टाकणारी व ताटकळत ठेवणारी आहे. राज्यातील शहाणी म्हणविणारी माध्यमे व त्यांचे संपादक यांनाही पवारांना नेमके काय हवे हे सांगता येणे अवघड करणारे हे राजकारण आहे. यशवंतरावांच्या काळापासून मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात सामील होईपर्यंत व पुढे मोदींच्या बारामतीला येण्यापासून तर मोदी सरकारने त्यांना दिलेल्या राष्ट्रीय सन्मानापर्यंतचे सारेच इतरांना गौडबंगाल वाटावे असे आहे. हा सारा पवारांच्या चर्येवरचे नित्याचे स्मित कायम ठेवणारा घटनाक्रम आहे. हे स्मित म्हटले तर प्रसन्न आणि म्हटले तर गूढ वाटावे असेही आहे. अशी किमया फक्त पवारांनाच जमते आणि त्यांना ते जमते हे ठाऊक असल्याने त्यांच्या जवळ असणारेही त्यांच्याबाबत सावध असतात. मात्र अशांची सावधानता हिरावून घेण्याचेही एक जास्तीचे कसब पवारांमध्ये आहे. तात्पर्य, ते साऱ्यांचे दिसतात पण फक्त स्वत:चे असतात. तरीही त्यांचे स्वत: असणेच एवढे व्यापक व मोठे की त्यातच आपणही समाविष्ट आहोत असे अनेकांना वाटत असते. असो, पवारांना सदिच्छा आणि फडणवीसांच्या भवितव्यालाही शुभेच्छा.

Web Title: Looks like a man, it should be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.