आधी वंदू तूज मोरया - पंचमहाशक्ती श्रीगणेश !
By दा. कृ. सोमण | Published: September 2, 2017 07:00 AM2017-09-02T07:00:00+5:302017-09-02T07:00:00+5:30
यावर्षी मंगळवारी २९ऑगस्ट रोजी मुंबई आणि परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाली, तेव्हा आपण या निसर्गावर किती अवलंबून आहोत याची साक्ष सर्वाना पटली.
यावर्षी मंगळवारी २९ऑगस्ट रोजी मुंबई आणि परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाली, तेव्हा आपण या निसर्गावर किती अवलंबून आहोत याची साक्ष सर्वाना पटली. प्राचीन काळी मूर्तीपूजा नव्हती. त्याचवेळी पृथ्वी, आप म्हणजे पाणी,तेज म्हणजे सूर्य - अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीनाच ईश्वर असे मानले जात होते. या पंचमहाशक्तींची अवकृपा झाली की आपले जीवन दु:खी होते हे प्राचीन कालीही मानवाच्या लक्षात आले होते. म्हणून या पंचमहाशक्तींची सदैव कृपा रहावी यासाठी यज्ञ करून त्यांची प्रार्थना केली जात असे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे सुख - दु:ख या पंचमहाशक्तींवरच अवलंबून आहे . श्रीगणपती अथर्वशीर्षामध्ये म्हटले आहे--
" त्वंभूमिरापोऽनलोऽनिलो नभ: "
"पृथ्वी, पाणी,अग्नि,वारा आणि आकाश ही पंचतत्वे तूच आहेस. "असे म्हटले आहे. निसर्गातील या पंचमहाशक्तींमध्ये साक्षात् श्रीगणेश आहे. या निसर्गाची उपासना म्हणजेच श्रीगणेशउपासना होय. या पंचमहाशक्तींची साक्षात्कारी गणेशरूपे म्हणून ओळख करून घेऊया.
(१) पृथ्वी
पृथ्वी ही पंचमहाशक्तींमधील पहिली शक्ती आहे. प्रथ् म्हणजे विस्तार पावणे . यावरून पृथ्वी हा शब्द तयार झाला आहे. 'प्रथमे विस्तारं याति इति' यावरून ' जी विस्तार पावते ती पृथ्वी ' अशी तिची व्याख्या केलेली आहे. ऋग्वेदात पृथ्वीची प्रार्थना "स्योना पृथ्वी भवा नृक्षरा निवेशनी । यच्छा: न: शर्म सप्रथ: ।।" अशी केलेली आहे.
"-- हे पृथिवी, तू आम्हाला प्रसन्न हो. तुझ्यापासून कोणालाच उपसर्ग पोचत नाही. तू आपल्या पृष्ठभागावर सर्वांचाच समावेश करतेस. तर तू आम्हास सौख्यातिशय प्राप्त करून दे."
अथर्ववेदात पृथ्वीचे धनदात्री , दानकर्त्री आणि देवस्वरूप असे वर्णन केलेले आहे. अथर्ववण ऋषीनी भूमीला मातृत्व व देवत्त्व प्रदान करून स्वत:ला तिचा पुत्र म्हटले आहे. या निमित्ताने आता पृथ्वीची वैज्ञानिक माहिती पाहूया.
पृथ्वी आपल्या सूर्यमालेतील तिसर्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वी सुमारे ४.५४ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. पृथ्वी जेंव्हा सूर्यापासून दूर असते तेव्हा ती १५ कोटी २० लक्ष ९७ हजार ७०१ कि.मी. असते. आणि ज्यावेळी ती सूर्यापासून जवळ असते त्यावेळी ती १४ कोटी ७० लक्ष ९८ हजार ७४ कि.मी. अंतरावर असते. पृथ्वी ३६५.२५६३६६ दिवसात सूर्याभोवती सेकंदास २९.७८३ कि.मी. या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वी स्वत:भोवती २३ तास ५६ मिनिटे ४.०९८ एव्हढ्या कालावधीत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीवर जेव्हा मोठे भूकंप होतात, किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होतात तेव्हा खूप हानी होत असते.
पृथ्वीवरील मानव निर्मित प्रदूषण खूप वाढत आहे, ते टाळलेच पाहिजे. पर्यावरणाबाबत आपण सर्वानी जास्त लक्ष दिले पाहिजे. तीच खरी गणेशउपासना होईल. आपण पृथ्वीची काळजी घेतली तरच पृथ्वी आपली काळजी घेईल.
(२) पाणी ( आप )
' आप ' ही एक वैदिक देवता आहे. ऋग्वेदात ' आप ' या देवतेबद्दल चार सूक्ते आहेत. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली असे ऋग्वेदात म्हटले आहे. पृथ्वीचा ७१ टक्के पृष्ठभाग हा सागराने व्यापला आहे. संस्कृतमध्ये पाण्याला ' जल ' असे म्हटले आहे. " जलति जीवयति लोकानिति " म्हणजे लोकांना जे जगवते ते जल होय. द्रवत्त्व हा जलाचा स्वाभाविक गुण आहे. जलदान हे अन्नदानाहून श्रेष्ठ आहे असे म्हटलेले आहे. ग्लोबल वार्मिंग म्हणजे वैश्विक उष्णतामान वाढीमुळे हिमशिखरावरील बर्फ वितळत असते. त्यामुळे सागराच्या पाण्याची उंची दर शंभर वर्षात एका मीटरने वाढत असते. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. भारतात लहान मोठ्या अशा सुमारे दोन हजार नद्या आहेत.
पंचमहाशक्तीमधील आप म्हणजे पाणी हा साक्षात श्रीगणेशच आहे. जलप्रदूषण टाळणे म्हणजेच श्रीगणेश उपासना आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील शेती ही मोठ्याप्रमाणात पावसावर अवलंबून असते. नद्यांचे जसे जतन व्हायला पाहिजे तसे ते होत नाही. म्हणून गणेश मूर्तींचे विसर्जन हे नदीत न करता कृत्रिम तलावात, हौदात करावयास हवे. गणेश चतुर्थीस पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगितलेले आहे. म्हणून गणेशमूर्ती ही लहान आणि मातीचीच पाहिजे . निर्माल्य पाण्यात टाकण्यापेक्षा त्यांवर पाणी शिंपडून त्याचे विसर्जन करावे. नंतर ते खत तयार करण्यासाठी वापरावे. जमिनीतील पाणी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवले पाहिजे. आपण जलप्रदूषण केले नाही तर ती मोठी गणेशउपासना होईल.
(३) तेज-अग्नी -सूर्य
तेज ही पंचमहाशक्तीमधील महत्त्वाची शक्ती आहे. हे गणेशाचे एक रूप आहे. अग्नी ही वैदिक देवता आहे. वेदांमध्ये अग्नीची विविध रूपे वर्णन केलेली आहेत. मानवाचे कल्याण करण्याची शक्ती अग्नीमध्ये आहे. अग्नी हा ईश्वर आणि मानव यांच्यामधील जोडणार दुवा आहे. माणसाच्या मनांत अग्नीविषयी दोन भावना असतात. अग्नीमुळे जे लाभ होतात त्याबद्दल कृतज्ञता वाटते. आणि त्याच्या विनाशक शक्तीची भीतीही वाटत असते. अग्नीला अर्पण केलेले द्रव्य अधिक पवित्र होऊन देवांना पोहोचते अशा समजुतीमुळेच यज्ञसंस्था उदय पावली.सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे.हे वेदकालातही भारतीयांना माहीत होते.
आता सूर्याविषयी काही वैज्ञानिक माहिती पाहूया ! सूर्य पृथ्वीपासून सरासरी १४ कोटी ९६ लक्ष किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला. सूर्यावर हायड्रोजन आहे. त्याचे हिलीयममध्ये रूपांतर होत असते. म्हणूनच आपणास ऊर्जा मिळत असते. सूर्याच्या पृष्ठभागावर ५५०० अंश सेल्सियस तापमान आहे. सूर्य आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून २४ हजार ते २६ हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. तो २२.५ ते २५ कोटी वर्षात एका सेकंदास २५१ किलोमीटर या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तेजामध्ये श्रीगणेशाचे रूप दिसते. सौर ऊर्जेचे महत्व आता सर्वाना पटले आहे. सूर्यपूजा म्हणजेच गणेशपूजा आहे.
(४) वायू
वायू ही पंचमहाभूतातील एक साक्षात्कारी महाशक्ती आहे. वायू ही वैदिक देवता आहे. वायूची उत्पत्ती ही विश्वपुरुषाच्या श्वासातून झाली आहे असे ऋग्वेदात म्हटले आहे. पर्जन्याचे आगमन वायूंमुळे होते असेही ऋग्वेदात म्हटले आहे. " रूपरहित: स्पर्शवान वायु: " म्हणजे ज्याला रूप नाही पण स्पर्श आहे तो वायू होय. योगदर्शनात वायूची दहा रूपे सांगितलेली आहेत. प्राण,अपान,समान,व्यान,उदान,नाग,कूर्म,कृकल,देवदत्त आणि धनंजय अशी ती दहा रूपे आहेत.सण उत्सव साजरे करताना वायूप्दूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. कारखान्यांमधून होणारे वायुप्रदूषणही आपण टाळले पाहिजे. वायूप्रदूषण होणार नाही याची काळजी आपण घेतली तर ती एक गणेश उपासनाच होईल.
(५) आकाश
वेदांमध्ये आकाशाबद्दलही सूक्ते आहेत आकाशातील नक्षत्रे म्हणजे देवांची मंदिरेच आहेत. अमर्याद 'आकाश ' हे गणेशाचे एक भव्य रूप आहे. आकाश हे अनंत आहे, ते सर्वव्यापी आहे. आकाश हा एक उघडलेला ग्रंथ आहे. इतर ग्रंथ प्रथम उघडून मगच त्याचे वाचन करता येते. परंतु आकाशाचा ग्रंथ तर सदैव उघडलेलाच आहे. फक्त नजर टाकायची आणि ग्रह, नक्षत्रे आणि हे अमर्याद विश्व यांची माहिती करून घ्यायची. आकाशाचे तापमान वजा २७० अंश आहे. १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून हे विश्व निर्माण झाले. त्याचवेळी वेळ- टाईम, वस्तू-मॅटर, आणि आकाश निर्माण झाले. कधी जर तुम्हाला दु:ख झाले किंवा नैराश्य आले तर तुम्ही काळोख्या रात्रीचे आकाश पहा. ग्रहनक्षत्र तारकांचे सुंदर दर्शन तुम्हाला होईल आकाश तुमचे दु:ख, तुमचे नैराश्य पळवून लावील. या भव्य आकाशाचे दर्शन म्हणजेच गणेश दर्शन होय.
या पंचमहाशक्ती म्हणजेच श्रीगणेश आहे. म्हणून त्यांची उपासना हीच श्रीगणेश उपासना आहे.
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com)