प्रभू येशूने त्यांचा विवेक जागवावा..
By admin | Published: December 24, 2015 11:40 PM2015-12-24T23:40:38+5:302015-12-24T23:40:38+5:30
‘जोवर तुमच्याजवळ एखादी देखणी स्त्री आहे तोवर तुम्ही तुमच्या टीकाकारांची पर्वा करण्याचे कारण नाही’, हे असभ्य व अश्लील उद््गार आहेत डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेतील
‘जोवर तुमच्याजवळ एखादी देखणी स्त्री आहे तोवर तुम्ही तुमच्या टीकाकारांची पर्वा करण्याचे कारण नाही’, हे असभ्य व अश्लील उद््गार आहेत डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीच्या अध्यक्षीय उमेदवाराचे. मुसलमान, मेक्सिकन, कृष्णवर्णी अमेरिकन आणि स्त्रिया यांच्याविषयी बेधडक, बेफाट आणि बेफाम विधाने करणाऱ्या या ट्रम्पने आपल्या पक्षाएवढेच देशालाही संकोचात टाकले आहे. मात्र त्याच्या या वक्तव्यांनीच त्याची लोकप्रियता वाढवून त्याला त्याच्या पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आघाडीचे स्थान मिळवून दिले आहे. त्याच्या नंतरच्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला त्याच्या निम्म्याएवढीही लोकप्रियता मिळविता आलेली नाही. ‘अमेरिकेत मुसलमानांना प्रवेश नको’ असे म्हणून त्याने निम्मे जग आपल्या विरोधात उभे केले आहे. ‘या देशात मेक्सिकन लोकांचा प्रवेश रोखण्यासाठी या दोन देशांच्या दरम्यान दोन हजार मैल लांबीची उंचच उंच आणि अनुल्लंघ्य भिंत मी बांधीन’ असे म्हणून बर्लिनची भिंत बांधणाऱ्या स्टॅलिनची आठवण त्याने जगाला करून दिली आहे. तिकडे ‘माझी मुलाखत घेताना एका वाहिनीवरील स्त्रीच्या डोळ््यातून रक्त वाहू लागले होते’ असे बेफाम विधान त्याने केले. असभ्य, अर्वाच्य व अश्लील बोलणाऱ्या धर्मांध आणि एकाधिकारवादी पुढाऱ्यांना महाराष्ट्रात व भारतातच लोकप्रियता मिळते असे नाही. मुसोलिनीला ती इटलीत मिळाली. हिटलरला जर्मनीत, स्टॅलिनला रशियात, कॅस्ट्रोला क्युबात आणि माओला ती चीनमध्ये मिळाली. त्यांच्या तशा व्यक्तिमत्त्वावर लुब्ध झालेले विद्वान आणि प्रतिभावंतही जगात कमी नव्हते व नाहीत. अशा माणसांच्या मागे व्यक्तीच वेड्या होऊन धावत नाहीत. विली ब्रँड म्हणाले, अशा माणसांच्या मागे वेडसरासारखे जाणारे समाजही असतात. हिटलरच्या मागे गेलेल्या जर्मनांविषयी ब्रँड ते म्हणाले होते. या साऱ्या अश्लीलोत्तमांना मागे टाकील असा आकर्षक नमुना ट्रम्पच्या रुपाने आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाकडे मागायला सज्ज झाला आहे आणि त्या देशाचे व जगाचे नशीबच फाटके असेल तर तो उद्या अमेरिकेचा अध्यक्षही होऊ शकणार आहे. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलीन, माओ आणि जगभरचे सगळे धर्मांध व वर्णांध लोक एकत्र केले तर एक ट्रम्प तयार होईल अशी त्याची आताची ख्याती आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या आघाडीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन त्याच्याविषयी म्हणाल्या, याचे नाव सांगून इसिससारख्या संघटना आपल्या दलात धर्मांध तरुणांची भरती करू लागल्या आहेत. दूरचित्रवाहिन्यांवर त्याच्या मुलाखती घ्यायला स्त्रियाच नव्हे तर पुरुष पत्रकारही बिचकू लागले आहेत. ट्रम्प हा अमेरिकेतील सर्वाधिक धनाढ्यांपैकी एक असलेला बांधकाम व्यवसायातला तज्ज्ञ आहे. स्त्रिया, मेक्सिकन, मुसलमान व कृष्णवर्णीय या साऱ्यांवर त्याचा राग आहे. ‘कृष्णवर्णीय आळशी असतात. त्यांच्यामुळे देशाची प्रगती मंदावते’ असे म्हणणारा हा उमेदवार ‘मेक्सिकनांनी अमेरिकेत गुन्हेगारी आणल्याचे’ सांगणारा आहे. स्त्रिया या जन्मजात भित्र्या व दुबळ््या असतात असे उघडपणे सांगणारा ट्रम्प ‘ओबामांना मध्य आशियातला संघर्ष समजलाच नाही’ अशी टीका करतो. त्याला आवरणे त्याच्या पक्षाला अवघड झाले आहे तर डेमोक्रॅटिक पक्षाला त्याची धास्ती वाटू लागली आहे. हिटलर व मुसोलिनीही निवडणुकीच्याच मार्गाने हुकूमशहा बनले होते. अमेरिका ही जगातली सर्वात मोठी अण्वस्त्र शक्ती आहे. अध्यक्ष या नात्याने त्या शक्तीची कळ उद्या या ट्रम्पच्या हाती आली तर ते जगावरचे मोठे संकट ठरणार आहे. रिपब्लिकन पक्षाला वॉशिंग्टन, जेफरसन आणि लिंकन यासारख्या उदारमतवादी नेत्यांचा इतिहास आहे. जगातल्या बहुसंख्य लोकशाह्यांना अमेरिकेचे पाठबळही लाभले आहे. या स्थितीत ट्रम्पची वाढती लोकप्रियता ही नेमकी कशाची प्रतिक्रिया आहे याचाच अभ्यास आता होऊ लागला आहे. उदारमतवाद, शांतता व समतेची भलावण यांच्यावर रागावणाऱ्यांचाही एक वर्ग समाजात असतो. शिवाय प्रेमाएवढीच सूडाची भावनाही शक्तीशाली असते. आपण जगाला सहाय्य करतो, लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले तरुण प्राणार्पण करतात आणि शांततेचे रक्षणही आपल्यामुळे होते. तरीही आपल्याला सारे शिव्याच देतात या जाणीवेतून ही प्रतिक्रिया अमेरिकेत उभी राहिली असेल काय आणि ट्रम्प हा त्या लाटेवर स्वार झालेला उमेदवार असेल काय, याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. तशाही धर्मांधांच्या व वर्णवर्चस्ववाद्यांच्या टोळीबाज संघटना दक्षिण व मध्य आशियात आणि द. अमेरिकेत आता बलशाली आहेत. अशा धोक्याची जाणीव झालेल्या साऱ्यांनीच आपल्यातील अतिरेक्यांची दखल अधिक गंभीरपणे घेण्याची आता गरज आहे. झालेच तर प्रभू येशूच्या आजच्या जन्मदिनी त्याने रिपब्लिकन पक्षाएवढाच अमेरिकी मतदारांचा विवेक येत्या निवडणुकीपर्यंत जागता ठेवावा अशी प्रार्थना करणेही आवश्यक आहे.