देव ते देश, राम ते राष्ट्र...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 07:24 AM2024-01-23T07:24:39+5:302024-01-23T07:25:03+5:30
बालरूपातील प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. त्यांचा पाचशे वर्षांचा वनवास, गेल्या काही दशकांमधील तंबूतील निवास संपला.
बालरूपातील प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. त्यांचा पाचशे वर्षांचा वनवास, गेल्या काही दशकांमधील तंबूतील निवास संपला. धीरगंभीर, भावुक वातावरणात प्राणप्रतिष्ठा झाली. हजारो निमंत्रितांनी प्रत्यक्ष मंदिराच्या प्रांगणात, तर कोटी कोटी रामभक्तांनी दूरचित्रवाहिनीवर हा अलौकिक सोहळा भक्तिभावाने अनुभवला. याचि देही याचि डोळा हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आल्याने लाखो, कोट्यवधी कृतकृत्य झाले. केवळ रामलल्लांना त्यांचे जन्मस्थान मिळाले किंवा भव्यदिव्य मंदिर, अद्भुत गर्भगृह उभे राहिले, एवढाच या ऐतिहासिक सोहळ्याचा अर्थ नाही.
यानिमित्ताने भारतीय इतिहासातील प्रदीर्घ अशा प्रार्थनास्थळाच्या वादाची सुखद अशी अखेर झाली आहे. हा सुखद क्षण आठवणींच्या कुपीत जतन करून ठेवताना याचेदेखील अवश्य स्मरण ठेवायला हवे, की हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्मीयांना त्यांच्या प्रार्थनेसाठी स्वतंत्र जागा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे हे शक्य झाले. झालेच तर ही बाबदेखील आठवणीत असायला हवी, की तीन-साडेतीन दशकांपूर्वीचा हिंसक वाद व प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अल्पसंख्याकांनी मनाचा मोठेपणा दाखवून तो निवाडा स्वीकारला. इतिहासातील चुका पाठीवर टाकून या समाजालाही पुढे जायचे होते. भविष्यकाळ खुणावत होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने त्यांना ती संधी लाभली. असो. या प्रश्नाच्या खपल्या काढण्यात आता अर्थ नाही. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पुढे काय, हा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. प्रभू श्रीराम आले, आता रामराज्य कधी येईल, हा त्याचा उपप्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या साेहळ्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नांची बहुतेक उत्तरे देशवासीयांना दिली आहेत. कोणत्याही राष्ट्राला भविष्यातील वाटचालीसाठी, प्रगतीची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी, विविध क्षेत्रामधील कामगिरीसाठी काही प्रेरणा आवश्यक असतात. सोमवारच्या सोहळ्यात भारतीयांना ती प्रेरणा प्रभू श्रीरामांच्या रूपाने उपलब्ध झाली आहे आणि तीच देशाला दृष्टी, दिशा देईल, भविष्याचे दिग्दर्शन करील. देशाचे भविष्य अधिक सुंदर असेल, देश विश्वगुरू बनेल, असा दुर्दम्य आत्मविश्वास दोघांनी व्यक्त केला. विशेषत: पंतप्रधानांनी राम मंदिराच्या पुढचे पाऊल म्हणून देशवासीयांना एक समर्थ, सक्षम, भव्यदिव्य भारताच्या निर्मितीसाठी झटण्याचे आवाहन केले. प्रभू श्रीराम हे राष्ट्रचेतनेचे प्रतीक आहे. तोच भारताची आस्था, आधार, विचार, विधान, चेतना व चिंतन आहे, असे सांगून पंतप्रधानांनी ‘देव ते देश’ आणि ‘राम ते राष्ट्र’ अशी संकल्पना देशासमोर ठेवली.
अर्थात, पंतप्रधानांनी म्हटल्यानुसार, अयोध्येतील मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा हा नव्या कालचक्राचा उद्गम आहे की नाही हे काळच सांगेल. कारण, केवळ श्रद्धा हा नव्या युगातील प्रगतीचा आधार असू शकेल असे नाही. मुळात राष्ट्र म्हणजे नेमके कोण आणि प्रगतीची व्याख्या काय, ती नेमकी कोणाची, अशा इतरही अनेक पैलूंचा विचार करायला हवा. एखादे राष्ट्र आपल्या व्यवस्थेचा मूलमंत्र विसरले, इतिहासात अधिकाधिक गुरफटत गेले, वर्तमानाचा विसर पडला किंवा पाडला गेला आणि भविष्याचा वेध घेता आला नाही की वर्तमानातील प्रश्न जटिल होतात. भविष्याची दिशा गवसत नाही. भारतासारख्या प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्रात हे टाळायचे असेल तर प्रसंग उत्सवाचा असो की वातावरण उत्साहाचे असो; राज्यघटनेचे, तिच्या मूल्यांचे, तिने निर्देशित केलेल्या कर्तव्याचे सतत स्मरण करायला हवे. आपली राज्यघटना बहुसंख्याकवादाच्या पलीकडे व्यक्तीचे स्वातंत्र्य, तसेच समता व बंधुतेच्या तत्त्वावर आधारलेली आहे. ती धर्म, जाती, प्रांत, भाषा, लिंग अशा भेदांपलीकडे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देते.
विज्ञानवादी दृष्टिकोन हे प्रत्येक नागरिकाचे आणि सरकारचेही कर्तव्य असल्याचे ती सांगते. ते बजावताना श्रद्धांच्या पलीकडे जायला हवे. ज्ञानलालसा, अज्ञाताचा शोध घेण्याची असोशी हे भविष्यातील वाटचालीचे मूलमंत्र असतील. ते जपताना विद्वेषाला, विखाराला थारा असू नये. समाजाने अधिक व्यापक विचार करावा, समाज सहिष्णू असावा. शेवटच्या माणसाच्या सुखी जीवनाचा म्हणजेच अंत्योदयाचा विचार जपला जावा. आशा-आकांक्षा व स्वप्नांना जिद्दीचे पंख लाभावेत. केवळ माणूसच नव्हे तर प्रत्येक जीव सुखी व्हावा. त्याच्या दु:खाचे निवारण व्हावे आणि हे सर्व प्रजासत्ताक लोकशाहीच्या चौकटीत व्हावे, अशी स्वप्नवत व्यवस्था म्हणजेच रामराज्य आणि अयोध्येतून देशाच्या काेनाकोपऱ्यात झिरपणारी राष्ट्रचेतना!