‘भूषण’चा खो खो

By admin | Published: August 17, 2015 11:12 PM2015-08-17T23:12:04+5:302015-08-17T23:12:04+5:30

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते.

Lost Bhushan's lost | ‘भूषण’चा खो खो

‘भूषण’चा खो खो

Next

शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते. सरकारच्या निर्णयाला सर्वात आधी कडाडून आणि आगजाळ विरोध केला राष्ट्रवादीचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी. त्या समयी त्यांचे शीर्षस्थ नेते शरद पवार यांनीही आव्हाडांची कड घेतली होती. पण परवा त्याच पक्षाचे उप-शीर्षस्थ नेते अजित पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडताना, आव्हाडांचे मत हे त्यांचे व्यक्तिगत मत असून त्या मताशी पक्षाचा काहीही संबंध नाही असे जाहीर करुन टाकले. पण केवळ तिथेच न थांबता, पुरस्कार राज्य सरकार देत असल्याने, तो कोणाला द्यायचा वा कोणाला नाकारायचा, याचा अधिकार पूर्णपणे सरकारचा असल्याचे सांगून किमान त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या बाजूने या वादावर पडदा टाकला. पण आता अजित पवारांनी सोडून दिलेला मुद्दा हाती धरुन काही साहित्यिक आणि समाजसेवक यांनी पुरंदरेंना जाहीर केलेला पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी करुन खो खोचा खेळ पुढे नेला आहे. याचा अर्थ सरकारने असे पुरस्कार देण्याला आणि तथाकथित मान्यवरांनी त्यांचा स्वीकार करायला यांची काही हरकत नाही, असे दिसते. त्यांनी जर सरकारी पुरस्कारांचे थोतांडच बंद करुन टाका, अशी मागणी केली असती तर बात निराळी होती. कारण मुळात पूर्वीच्या काळात सरंजामदारांनी विविध कलांमधील कलावंतांना पुरस्कृत वा उपकृत करुन आपल्या पदरी बाळगण्याची जी पद्धत होती, तीच पद्धत म्हणजे तो सरंजामशाही वृत्तीचा अंश सरकारी पुरस्कारांमध्ये उतरलेला असतो आणि लोकशाहीत ते बसत नाही, यासाठी पुरस्कारच नकोत, अशी टोकेरी भूमिका घेणारेही काही साहित्यिक, कलावंत आणि समाजसेवक आहेत. परिणामी या श्रेणीतील लोक ना पुरस्कार मिळविण्याच्या भानगडीत पडत ना त्यासाठी कोणाची हाँजी हाँजी करत. सरकार कोणतेही असो आणि कोणाचेही असो, ओशाळेपण प्रदान करताना, आपला आणि परका हा भेदभाव होतच असतो. केवळ पुरस्कारच कशाला, विविध सरकारी समित्या आणि अगदी कुलगुरुपदापर्यंच्या प्रतिष्ठित पदांपर्यंत हा आपपरभाव होतच असतो आणि ‘तळे राखील, तोच पाणी चाखील’ असा तात्त्विक मलामादेखील दिला जातो. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी राज्यातल्या विविध क्षेत्रातील लोकाना रातोरात लक्षाधीश करुन टाकले होते. ‘पवारांचा रमणा’ असे यथार्थ नामाभिधान त्यास प्रदानही केले गेले होते. अत्यंत घाऊक पद्धतीने दिल्या गेलेल्या त्या ‘पुरस्कारां’बाबत मात्र कुणी ब्रदेखील उच्चारला नव्हता. भूमिका वस्तुनिष्ठ असावी, व्यक्तिनिष्ठ नव्हे!

Web Title: Lost Bhushan's lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.