सत्तेपुढचे लोटांगण

By admin | Published: August 18, 2015 09:41 PM2015-08-18T21:41:22+5:302015-08-18T21:41:22+5:30

नरेंद्र जाधवांचा नुसता तडफडाट सुरू आहे. योजना आयोगावरील त्यांचे पद त्या आयोगासह इतिहासजमा झाल्यापासून त्यांच्या वाट्याला राजकीय व प्रशासकीय बेकारी आली आहे

Lottangan of power | सत्तेपुढचे लोटांगण

सत्तेपुढचे लोटांगण

Next

नरेंद्र जाधवांचा नुसता तडफडाट सुरू आहे. योजना आयोगावरील त्यांचे पद त्या आयोगासह इतिहासजमा झाल्यापासून त्यांच्या वाट्याला राजकीय व प्रशासकीय बेकारी आली आहे. या अभावकाळातले एक काम म्हणून त्यांनी देशाला घटना समजावून सांगण्याच्या खटाटोपासाठी दूरचित्रवाहिनीवर एका चर्चासत्राची आखणी केली. मात्र त्यामुळे आपल्या हाती फारसे काही लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट रा.स्व. संघाशीच संधान जुळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रथम ‘संघ व आंबेडकरी जनता यांच्यातील दुवा होण्याची क्षमता आपल्यात असल्याची व तशी आपली तयारी असल्याची’ बातमी त्यांनी वर्तमानपत्रांना दिली. डॉ. मनमोहनसिंगांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आपली त्यांच्याशी अतिशय जवळीक आहे, असे दाखविणाऱ्या जाधवांचा हा उफराटा प्रवास अर्थातच अनेकांच्या अचंब्याचा विषय झाला. मनमोहनसिंगांविषयीची तेव्हाची त्यांची ओढ अशी की भेटेल त्याच्याशी बोलताना ‘मनमोहनसिंग मला आपला मुलगा मानतात’ असे ते सांगत. पुढे जाऊन ‘पंतप्रधानांना दोन्ही मुलीच असल्यामुळे ते आपल्याकडे या आत्मीयतेने पाहतात’ असेही ते म्हणत. आता मनमोहनसिंग पंतप्रधान नाहीत आणि योजना आयोगही अस्तित्वात नाही. त्यामुळे डॉ. सिंग आणि काँग्रेस यांच्याविषयीची जाधवांची माया आटली आहे. तशी ती कमी व्हायला त्या पक्षाने डॉ. मुणगेकर यांना राज्यसभेचे सदस्यत्व दिले तेव्हाच सुरूवात झाली होती. ते कोरडेपण आता पूर्ण झाले आहे. या स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आपल्या चार पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हातून परवा दिल्लीत केले. त्यावेळच्या आपल्या भाषणात भागवत यांनी आपला आब राखत आंबेडकर आणि संघ यांच्यात राष्ट्रभक्ती हा महत्त्वाचा दुवा होता हे कोणालाही आवडेल व मान्य होईल असे विधान केले. जाधवांनी मात्र त्याहीपुढे जाऊन डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांच्या भूमिका समानच असल्याचे सांगून टाकले. जाधव स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवितात. आंबेडकरवादी असणारा वा आंबेडकरांविषयीची माहिती असणारा कोणताही माणूस आंबेडकर आणि हेडगेवारांना असे एका पातळीवर आणणार नाही वा त्यांना समविचारीही म्हणणार नाही. बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीविषयी कुणाचेही दुमत नाही. पण बाबासाहेब केवळ तेवढ्यावर थांबणारे नव्हते. जातीनिर्मूलन, सामाजिक समता, आर्थिक जवळीक अशा साऱ्या बाबींचा ते दलितोद्धारासह पाठपुरावा करीत होते. ते घटनेचे शिल्पकार होते आणि आपल्या हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश करणारे धर्माभ्यासक होते. संघाला भारताची राज्यघटनाच मान्य नाही. ज्या हिंदू कोड बिलाचा बाबासाहेबांनी आग्रह धरला व ज्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या बिलाला कडवा विरोध करणाऱ्यांत संघ आघाडीवर होता. सामाजिक समता (समरसता नव्हे), आर्थिक समता आणि बौद्ध धर्माचे महात्म्य यातील कोणत्या गोष्टी संघाला मान्य आहेत? असे असतानाही हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्या हेडगेवारांना जाधवांनी आंबेडकरांच्या सोबत आणून बसविण्याचे धारिष्ट्य केले असेल तर त्यात त्यांची विद्वत्ता अधिक की लाचारी मोठी? काय वाटेल ते करा आणि माझी बेकारी दूर करा, त्यासाठी सारा आंबेडकरी समाज आणि विचार मी तुमच्या दावणीला आणून बांधायला सिद्ध आहे अशी जाधवांची संघाविषयीची ताजी भूमिका आहे व तिचे तसे असणे आंबेडकरी जनतेला चांगले ठाऊक आहे. आपल्या स्वार्थासाठी आपल्या श्रद्धास्थानाला येथवर आणण्याची जाधवांची किमयाही थक्क करणारी आहे. माणसे पदासाठी व सन्मानासाठी केवढा लाळघोटेपणा करायला तयार होतात आणि त्यासाठी आपल्या वैचारिक भूमिकांवर कलमे बांधायला कशी तयार होतात याचा याहून मोठा व हास्यास्पद नमुना दुसरा सापडायचा नाही. ‘मला मंत्री करा आणि तुमच्यासोबत ठेवा’ असे म्हणणारे दुसरे एक आंबेडकरी नेते रामदास आठवले महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांनी पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपा अशी सगळी भ्रमंती केली आहे. नरेंद्र जाधव हे अभ्यासू म्हणून आणि स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणविणारे म्हणून साऱ्यांच्या परिचयाचे आहेत. राजकारणी पुढाऱ्यांना जमते तशी लाचारी व पदलोलुपता त्यांच्यात नसावी असेच त्यांच्या अनेक चाहत्यांचे आजवरचे मत होते. त्यांना ते आता बदलावे लागणार आणि नरेंद्र जाधव संघात नसले तरी भाजपात आणि भाजपात नसले तरी सरकारात कधी जातात याची वाट पाहावी लागणार. उच्च पदाची उपलब्धी अगोदर चाखल्यानंतर पाण्याबाहेरचा मासळीचा तडफडाट वाट्याला येणे ही तशी कोणावरही येऊ नये अशी दयनीय स्थिती आहे. ती जाधवांसारख्या लेखक व अभ्यासक मानल्या जाणाऱ्या आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येणे ही त्यांच्या चाहत्यांना दु:खी करणारी बाब आहे. संघासाठी ती
एक उपलब्धी असली तरी जाधवांसाठी मात्र ते लोटांगण आहे. आपल्या सन्मानाबाबत व प्रतिष्ठेबाबत सावध असणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लोकांच्या नजरेतून उतरू देऊ नये ही साधी बाब जाधवांसारख्या तज्ज्ञ म्हणविणाऱ्या माणसाला कळत नसेल तर ते एक दुर्दैवच म्हटले पाहिजे.

Web Title: Lottangan of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.