Uttar Pradesh Election 2022 : "उत्तर प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार, हे नक्की!"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:42 AM2022-02-23T07:42:49+5:302022-02-23T07:43:43+5:30
मुलाखत, अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री आणि उत्तर प्रदेश निवडणूक रणनीतिकार उत्तर प्रदेशच्या इतिहासात सर्वाधिक रोजगार संधी योगी सरकारने दिल्या आहेत. या राज्यातले शेतकरीही आमच्यावर नाराज नाहीत, पाठिंबा आम्हालाच मिळेल!
शरद गुप्ता, वरिष्ठ संपादक,
लोकमत समूह
उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा बहुमत मिळेल काय?
जरूर मिळेल. पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील. मोदीजी, योगीजी यांनी केलेले काम पुढे नेण्यासाठी, विकासाचा वेग कमी होऊ नये म्हणून इथे पुन्हा कमळ फुलणार, हे निश्चित आहे.
योगी सरकारने उत्तर प्रदेशात कोणती कामे केली?
सरकारने २८ कोटी लसी मोफत टोचल्या. १५ कोटी लोकांना महिन्यातून दोनदा मोफत रेशन पुरवले. ४३ लाख लोकांना पक्की घरे बांधून दिली. दीड कोटी लोकांच्या घरात वीज जोडणी आणि चार एलईडी बल्ब दिले. १.८६ कोटी भगिनींना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मोफत दिला. तीन कोटी रोजगार उपलब्ध केले. कारण, उत्तर प्रदेशात चार लाख कोटींची गुंतवणूक आली आहे.
सरकार पुन्हा आले तर काय कराल?
१० लाख कोटींची गुंतवणूक आम्ही राज्यात आणू. घरटी किमान एकाला तरी रोजगार, स्वरोजगाराची संधी देऊ ‘’एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेंतर्गत आतापर्यंत १.४७ लाख कोटीची निर्यात झाली आहे. २५ लाख लोकांना रोजगार, स्वरोजगाराची संधी मिळाली. पुढच्या ५ वर्षांत रोजगार, निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य असेल. स्वयंपाकाच्या गॅसचे दोन सिलिंडर मोफत दिले जातील. हुशार विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दिली जाईल. तरुणांना दोन कोटी लॅपटॉप दिले जातील. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मोफत देऊ.
योजनांसाठी पैसा कोठून आणणार?
गेल्या ५ वर्षांत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था दुप्पट झाली आहे. आम्ही ती वाढवली आणि गुंतवणूक आणली.
निवडणूक आगामी पाच वर्षांच्या रोड मॅपवर लढविली जायला हवी, की ८० विरुद्ध २० आणि गजवा-ए-हिंद यासारख्या
विभाजनाच्या मुद्द्यावर?
प्रदेश अपराधमुक्त झाल्यावरच आम्ही इतके काही करू शकलो. लोक आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटू लागले. त्यामुळे गुंतवणूक आली.
सुरक्षा सर्वात मोठा मुद्दा आहे. तरीही भाजपा इतकी नकारात्मक प्रचारमोहीम का चालवत आहे?
आपण आमच्या नेत्यांची भाषणे तपासा. ९५ टक्के विकासाच्याच गोष्टी केलेल्या दिसतील. देशाला सुरक्षित कसे केले, हे राहिलेल्या वेळात सांगत आलो. मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, आजम खान, नाहीद हुसैन, युनूस खान यांच्यासारख्या गुन्हेगारांना आम्ही तुरुंगात पाठवत राहू. लोकांना हा विश्वास देत राहू की, ते सुरक्षित आहेत.
एकाच समुदायाच्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई, हा जाणूनबुजून धार्मिक आधारावर विभाजन करण्याचा प्रयत्न नाही का?
आम्ही कारवाई करताना गुन्हेगारांची जात किंवा धर्म पाहिलेला नाही. मुसलमान तरुणांवर लावलेला दहशतवादी असल्याचा आरोप काढून टाकण्याचा निर्णय अखिलेश यादव यांनी घेतला होता. अहमदाबादच्या बॉम्बस्फोट मालिकेचे धागेदोरे समाजवादी पक्षापर्यंत जात असल्याचे न्यायालयाला आढळले होते. आतंकी का अब्बुजान है समाजवादी का भाईजान, इसीलिये बंद है अखिलेश की जुबान!
या निवडणुकीत रोजगार, महागाई हे मुद्दे नाहीत का?
आकडेच साक्ष देतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात सर्वाधिक सरकारी नोकऱ्या योगीजींनी दिल्या आहेत. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांसाठी मुलाखतीही घेतल्या नाहीत. योग्यतेनुसार थेट नोकऱ्या दिल्या गेल्या. ३ कोटी लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.
या निवडणुकीवर शेतकरी आंदोलनाचा किती प्रभाव आहे?
अखिलेश यादव यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो कोटी रुपये थकविले होते. योगी आदित्यनाथ यांनी १.६० लाख कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले. यात मागच्या सरकारच्या काळातील थकबाकीचा समावेश आहे. शेतकरी आमच्यावर नाराज नाहीत.
दलितांची नाराजी आपले किती नुकसान करील?
‘सब का साथ, सब का प्रयास, सब का विकास
आणि सब का विश्वास’ या मूलमंत्रावर भाजप वाटचाल करत आहे. दलित व मागासवर्गीयांसाठी मोदी यांनी सर्वाधिक काम केले. जनतेने त्यांना देशाच्या सर्वोच्चस्थानी बसवले. कारण त्यांच्यात श्रेष्ठत्व आणि योग्यता पुरेपूर आहे. केवळ संधी देण्याचा अवकाश होता, ती आम्ही दिली.