कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज-- रविवार विशेष --जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:44 PM2018-04-21T22:44:16+5:302018-04-21T22:44:16+5:30
निपाणीच्या देवचंद कॉलेजमध्ये भूगोल विषय शिकविणारे प्रा. सुभाष जोशी लौकिक अर्थाने लोकनेते वाटतच नव्हते.
वसंत भोसले -
निपाणीच्या देवचंद कॉलेजमध्ये भूगोल विषय शिकविणारे प्रा. सुभाष जोशी लौकिक अर्थाने लोकनेते वाटतच नव्हते. शिक्षकीपेशा करणारा हा मध्यमवर्गीय माणूस तंबाखू कामगार महिलांना न्याय मिळवून देणारा नेता झाला, शेतकरी नेता झाला, आमदार झाला आणि एक एकरही शेती नसताना साखर कारखान्याचा अध्यक्षही झाला. थक्क करणारी वाटचाल...!
निपाणी शहरातील बेळगाव वेशीवर मोठमोठ्या तंबाखूच्या वखारी आहेत. त्यापैकी एका वखारीच्या भिंतीवर १९७८च्या दरम्यान एक घोषणा चुण्याने मोठ्या अक्षरात लिहिलेली होती. ‘आठ तास काम, पाच रुपये दाम’ अशी ती घोषणा होती. जवळपास ३० वर्षे तरी ती घोषणा पुसली गेली नव्हती. निपाणीतील तंबाखू वखारीत काम करणाºया सुमारे वीस हजार महिला कामगारांची ती मागणी होती आणि त्यांना आवाज देणारा नवोदित कामगार नेता प्रा. सुभाष जोशी !
या दरम्यान, देवचंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. निपाणीत राहत असल्याने सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत तंबाखू वखारीतून बाहेर पडणाऱ्या हजारो महिला अंगावरील साड्या झाडतच त्या गावाकडे निघायच्या. त्याचा खाट उठायचा. अख्ख्या शहरात तंबाखूचा वास येत असायचा. निपाणी शहराच्या चारी बाजूने असलेल्या छोट्या-छोट्या गावांतील या महिला वखारीत तंबाखू निवडण्याचे काम करण्यासाठी सकाळी यायच्या. घरी जाण्याच्या त्यांच्या वेळा काही ठरलेल्या नव्हत्या. कामाचे दामही ठरलेले नव्हते. कामाचे तासही ठरलेले नव्हते. तंबाखूच्या खाटाने वखारीच्या परिसरातही उभे राहता यायचे नाही. या महिला मात्र तंबाखू खातही नव्हत्या आणि पितही नव्हत्या. मात्र, त्या धुरळ््याने माखलेल्या वखारीत किमान बारा ते चौदा तास काम करायच्या. त्यांना दीड-दोन रुपये मिळायचे. रात्रपाळी केली म्हणून आणखीन एखादा रुपया जादा मिळायचा. काम आटोपून हातात सायकलचा टायर पेटवून (दिव्याप्रमाणे) त्या अंधुकशा प्रकाशाच्या वाटेने त्या मध्यरात्री घरी पोहोचायच्या. त्यांना आवाज दिला. प्रा. सुभाष जोशी या मध्यमवर्गीय माणसाने !
अत्यंत तोलासामा प्रकृती! निपाणी शहराच्या मध्यवर्ती भागातील दत्त मंदिराजवळ जोशी गल्लीत राहणारे जोशी कुटुंब! वडील शिक्षक. मात्र, राष्ट्रीय चळवळीत उतरुन घराकडे दुर्लक्षच केले होते. एक एकर जमीन नाही. आईला भावंडं नव्हती, ती मिळालेली जमीन कसणाºयांनाच देऊन टाकलेली. पत्नी सुनीता जोशी आणि दोन लहान मुलांसह राहणारे टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब! सासरे उपद्व्यापी होते. सर्वोदयी चळवळीत काम करीत होते. जे काही करायचे ते समाजासाठी हा वारसा तेवढा होता. त्याचाच परिणाम हा अत्यंत हाडकुळा माणूस समोर उपस्थित असलेल्या दहा हजार महिला कामगारांसमोर खणखणीत आवाजात माईकविना भाषणे करायचा.
निपाणी शहरावर तंबाखू व्यापाऱ्यांचे प्रचंड वर्चस्व! राजकारणापासून सर्वच क्षेत्रात त्यांची दादागिरी असायची. या महिला कामगार एकत्रित येऊन मालकांना आव्हान देतात म्हणताच प्रा. सुभाष जोशी यांच्याशी बोलणेही अनेकांनी बंद केले. ज्या कॉलेजमध्ये ते भूगोल शिकवायचे ते देवचंद कॉलेज तंबाखू व्यापाऱ्यांच्या आश्रयाखालीच चालायचे. तेथील काही अपवाद वगळता कोणी प्राध्यापकही त्यांना पाठिंबा देत नव्हते. स्टाफ रूममध्ये आले तर या उगवत्या कामगार नेत्यांबरोबर बोलणेही टाळत होते. त्यांच्याशी कोणी बोलतो, काय बोलतो याची बित्तंबातमी तंबाखू वखार मालकांपर्यंत पोहोचत असे. अशा वातावरणाची फिकीर न करता हा हडकुळा प्राध्यापक चालतच घरी यायचा. कोणी मारेकरी घालतील याची तमा बाळगत नसायचा. अनेकवेळा तसा प्रयत्न झाला. त्यातून कामगार महिला अधिकच संघटित झाल्या. हा सर्व प्रवास आम्ही विद्यार्थी पाहत होतो. निपाणीच्या नेहरू चौकात होणाºया हजारो महिलांच्या जाहीर सभा पाहण्याची आणि ऐकण्याची मेजवानी वाटायची. त्या महिला कामगारांच्या व्यथा ऐकून मन उद्विग्न व्हायचे. आठ तासांच्या कामाला किमान पाच रुपये दाम द्या, ही मागणी अवाजवी नव्हती. जादा कामाला दुप्पट पगार देण्याचा कायदा होता, कामगारांना भविष्यनिर्वाह निधीचा कायदा होता, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कायदे होते, पण कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी व्हायची नाही. अशा असंघटित महिलांना आवाज मिळाला प्रा. सुभाष जोशी यांचा! सीमाभागातील एक झुंजार कामगार नेता म्हणून त्यांचा उदय झाला. त्यांचे नेतृत्व सर्व महिलांनी एकमुखाने स्वीकारले. ही त्यांची पहिली पायरी होती. लौकिक अर्थाने हा माणूस कामगारांचा नेता होण्याजोगा नव्हता. मात्र, अफाट धैर्य, धाडस, संघटन कौशल्य आणि अभ्यास करायची तयारी या जोरावर त्यांनी आपले नेतृत्व घडविले. रस्त्यावर हल्ले होण्याचे प्रकार झाले. घरावर दगडफेक झाली. फोनवर धमक्या देण्याचे प्रकार झाले. नोकरीवरून काढून टाकण्याचे धोरण स्वीकारून झाले. कशाचीही तमा न बाळगता या प्राध्यापक माणसाने धडाडीने महिला कामगारांना संघटित करण्यास स्वत:ला वाहून घेतले.
जवळपास वीस हजार महिला कामगारांची संघटना उभी राहिली. त्यांना कार्यालय चालवायला जागा कोण देणार ? स्वत:च्या घराच्या पुढील छोट्या दोन खोल्यातच कार्यालय थाटलं. शेकडो कामगार महिला आपल्या समस्या घेऊन या कार्यालयात दररोज यायच्या. बसायला जागा नसायची. आपली तक्रार, दु:ख, वेदनांना वाट करून द्यायच्या. त्यांच्या त्या तक्रारी मनापासून ऐकून घेऊ न धीर देत असलेले प्रा. सुभाष जोशी आम्ही अनेक वर्षे पाहत होतो. आठ तास काम, पाच रुपये दाम, ही मागणी मान्यच करावी लागली. नेतृत्व दमदार होते आणि कामगारांचा पाठिंबा भक्कम होता. कारण त्यांना विश्वास होता. संघटित झाल्यावर महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडू लागल्या. त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, घेऊन त्या यायच्या. एका खोलीत संघटनेतर्फे दवाखाना सुरू करण्यात आला. अंधश्रद्धा दूर करणारे कार्यक्रम घेण्यात येऊ लागले. वैचारिक जडणघडण करण्यासाठी शिबिरे घेण्यात येऊ लागली. अनेक महिला कामगार आणि त्यांची मुले युनियनचे कार्यकर्ते बनले. हे सर्व परिवर्तन करणारा हा कामगार नेता देश पातळीपर्यंत नाव कमावून गेला. किमान वेतनापासून बोनस आणि भविष्यनिर्वाह निधी ते बेघरांना घरे आदी सोयी- सवलती महिलांना मिळू लागल्या.
तंबाखू महिला कामगारांची पिळवणूक चालू होती. तसेच तंबाखू उत्पादक शेतकºयांनाही दाम मिळत नव्हता. १९८०च्या दरम्यान महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळीचा झंझावात सुरूझाला होता. कामगार महिलांना न्याय मिळवून देणाºया सुभाष जोशी यांना शेतकºयांनी साकडे घातले. त्यांच्या छोट्या-छोट्या सभा सुरू झाल्या. शेकडोंनी शेतकरी जमू लागले. तंबाखूला योग्य दाम मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. एका प्राध्यापकाचे कामगार नेता ते शेतकरी नेता हे संक्रमण सुरू झाले होते. स्वत:ची एक एकरही जमीन नसणारा हा प्राध्यापक म्हणून पाहता पाहता शेतकºयांचा मसिहा झाला. शरद जोशी यांनाही निमंत्रित करण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाला व्यापक राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आले. १४ मार्च १९८१ रोजी सुमारे पन्नास हजार शेतकरी शरद जोशी आणि सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगलोर महामार्गावर उतरले. सलग चोवीस दिवस आंदोलन चालले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, गोळीबार झाला. बारा शेतकºयांना हौतात्म्य आले. नेत्यांना अटक झाली. गुलबर्गा येथील मध्यवर्ती कारागृहात त्यांची एक महिना रवानगी झाली. या आंदोलनानंतरही सीमाभागातील शेतकºयांनी प्रा. सुभाष जोशी यांना कायमच शेतकरी नेता मानले. आपल्या
मागण्यासाठी नेहमीच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले.
प्राध्यापकाचा कामगार नेता, कामगार नेता ते शेतकरी नेता अशी वाटचाल करणाºया प्रा. जोशी यांनी निवडणूकही लढविली. समाजवादी चळवळीच्या मुशीतून आलेले असल्याने साहजिकच त्यांचा कल जनता पक्ष किंवा जनता दलाकडे होता. १९८९ मध्ये त्यांनी दुसºयांदा विधानसभेची निवडणूक लढविली आणि कामगार शेतकºयांच्या पाठबळावर आमदारही झाले. सलग दहा वर्षे त्यांनी निपाणीचे प्रतिनिधित्व कर्नाटक विधानसभेत केले. (१९८९-१९९९) साध्या मध्यमर्गीय या प्राध्यापकाचे कामगारांशी संबंध येण्याचा प्रश्न नव्हता, पण तो कामगार नेता झाला. शेतीशी संबंध नव्हता, पण शेतकरी नेता झाला. समाज सुधारणांच्या चळवळी करणारा हा धडपडणारा कार्यकर्ता मुख्य प्रवाही राजकारणात आला आणि आमदारही झाला.
आता एक वेगळाच आणि चौथा टप्पाही त्यांनी पार पाडला. निपाणी परिसरातील मुख्य राजकीय प्रवाहात आल्यावर दहा वर्षे आमदार झाल्यावर प्रत्येक राजकीय घडामोडींशी त्यांचा संबंध येऊ लागला. निपाणी नगरपालिकेची निवडणूक असो, बाजार समितीची निवडणूक असो की निपाणीच्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे राजकारण असो. त्यात त्यांनी भाग घेतला. केवळ घेतला नाही तर त्यात यशस्वीही झाले. त्यांचे अनेक छोटे-छोटे कार्यकर्ते नगरसेवक झाले. नगराध्यक्ष झाले. सूनबाई नगराध्यक्ष झाल्या. प्रा. सुभाष जोशी म्हणजे निपाणी या सीमाभागातील एक राजकीय ताकद शक्ती झाली. स्वत:ची एक एकरही जमीन नाही. ऊस लावण्याचा प्रश्न नाही. मात्र, ते हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे बिगर उत्पादक सभासद झाले. या गटातून निवडणूक लढविली आणि साखर कारखान्याचे संचालक झाले. पुढे राजकारणातील हेलकाव्यात बाजूला गेले असले तरी एक मोठा निर्णायक गट त्यांच्या रूपाने निपाणी परिसरात आहे. हालसिद्धनाथ साखर कारखान्यावर निर्विवाद सत्ता ही आहे. कामगार नेता, शेतकरी नेता, आमदार, आता साखर कारखान्याचा चेअरमनही झाला.
प्रा. सुभाष जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी कोणी पाहिले असते तर यातील ते काही बनतील असे कधीही वाटले नव्हते. ना आर्थिक पाठबळ, ना जाती-पातीचे बळ, ना मुख्य प्रवाहातील राजकीय भूमिका, ना शेती, ना शेतकरी, ना कामगार, पण या सर्व क्षेत्रात. कष्टकरी जनतेचा हा बुलंद आवाज कायम खणखणीतच राहिला. आज ते पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहेत. मात्र, त्या आवाजात फरक नाही. कर्नाटक शासनाने आता त्यांना सहकारातील उत्तम कामगिरीबद्दल सहकार रत्न पुरस्काराने गौरविले आहे.
हा सर्व प्रवास करताना महाराष्ट्रातील सर्व परिवर्तन चळवळीशी त्यांचे सक्रिय संबंध कायम होते. हुंडाबळी, अंधश्रद्धा, महिला सबलीकरण, जात-पात विरोधी आंदोलन, विज्ञान चळवळ, आदींचा त्यात समावेश आहे. जॉर्ज फर्नांडिस, प्रा. मधु दंडवते, शरद जोशी, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, एस. एम. जोशी, निळू फुले, बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य अशा असंख्य दिग्गज नेत्यांशी त्यांचा थेट संबंध आला. या सर्व नेत्यांनी जोशी गल्लीतील कामगार संघटनेच्या कार्यालयात कष्टकऱ्यांशी हितगुज साधले आहे. शेतकरी आणि कामगारांच्या सभा घेतल्या. त्यांना बळ दिले, पाठिंबा दिला. त्यातूनच सीमाभागातील हा कष्टकºयांचा आवाज नेहमीच गर्जत राहिला! अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा!