एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका

By विजय दर्डा | Published: February 14, 2022 05:50 AM2022-02-14T05:50:15+5:302022-02-14T05:51:14+5:30

सगळीकडच्या भिंती रक्ताने रंगवण्याच्या गोष्टी आजवर होत आल्या, उद्याही होतील; पण त्यापासून वाचण्याचा रस्ता एकच आहे: प्रेम...

Love each other; But first learn to love yourself | एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका

एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका

Next

विजय दर्डा 

प्रेमाची ही गोष्ट सुरु करण्याच्या आधी मी जगातील सात आश्चर्यांबद्दल बोलू इच्छितो. २००७मध्ये जेव्हा सात आश्चर्यांसाठी अखेरच्या फेरीत सर्वेक्षण झाले, तेव्हा त्यात ताजमहाल पहिला आला. निर्मितीच्या दृष्टीने पाहिले असता चीनच्या भिंतीपेक्षा ताजमहालाची निर्मिती अधिक कठीण होती, असे नक्कीच म्हणता येणार नाही. ताजमहालपेक्षा चीनची भिंत बांधायला अधिक कष्ट पडले असतील, हे तर उघडच आहे. सध्या जी २१,१९६ किलोमीटरची भिंत आहे, ती बांधायला दोन हजार वर्ष लागली. अत्यंत कठीण काम होते ते. न जाणे किती शासक आले आणि गेले... काम सुरुच राहिले!

या तुलनेत ताजमहाल बांधायला केवळ २२ वर्षे लागली. मग लोकप्रियतेच्या सर्वेक्षणात चीनच्या भिंतीपेक्षा ताजमहालला अधिक मते का मिळाली? त्याचे कारण प्रेम! ताजमहालच्या सौंदर्यात प्रेम गुंफलेले आहे आणि चिनी भिंतीच्या पायात युद्धाचे डावपेच गाडलेले आहेत. युद्ध कोणालाही नकोसे असते आणि प्रेमरंगात सगळ्यांनाच न्हाऊन निघायचे असते. प्रेमामुळे ही सृष्टी रसदार झाली आहे. जीवनातील आनंदाचे क्षणही प्रेमामुळेच येतात. प्रेमाची रसधारा जिथे वाहू लागते तिथले सगळे रंग पालटून जातात. 

ख्यातनाम कवी अभिषेक कुमार लिहितात...
‘‘गुल खिले मन में गुलशन खिले 
आप जबसे हमे हो मिले,
आपसे महका आंगन मेरा
भूल बैठे सभी हम मिले.
सर पे छाया अजब सा नशा  
सारी दुनिया बदल सी गई,
प्रेम का पुष्प जबसे खिला 
सारी दुनिया बदल सी गई...’’

ज्यांनी एकेकाळी हरिवंशराय बच्चन आणि नंतर गोपालदास नीरज किंवा साहीर लुधियानवी यांना तरुणांचे सरताज केले; ती सगळी  प्रेमाचीच तर गाणी होती! त्या दोघांच्या गोष्टीत प्रेमाचे अंकुर बहरलेले होते; म्हणून त्या बहरानेच तर अमृता प्रीतम आणि साहीर यांना अमर केले. पण हेही खरेच, की काळ सतत कूस बदलत असतो. तशी ती त्याने बदलली आणि प्रेम शरीराच्या मोहपाशात बंदीवान होत गेले.. अडकत गेले. प्रेमाची नदी अविरत वाहते आहे हे तर खरेच; पण त्या खळाळत्या प्रवाहात शरीरमोहाची महाकाय जाळी पसरली गेलेली दिसतात आणि त्या जाळ्यात अडकून तिथेच डुंबत राहणे म्हणजेच प्रेम; ही  प्रेमाची नवी, तरुण व्याख्या आकाराला आली आहे.

प्रेमाची सर्वोच्च अनुभूती घेण्याचा एक मार्ग शरीर आहे, हे मान्य; पण खऱ्या प्रेमात शरीराला जागा नाही. दोन तरुण शरीर-मनांचे मीलन म्हणजे प्रेम ही प्रेमाची फारच त्रोटक व्याख्या झाली. इतक्या छोट्या अवकाशात प्रेमाला कसे बांधून घालता येऊ शकेल? निदा फाजली आपल्या मुलीवरल्या प्रेमाबद्दल किंवा मुनव्वर राणा आपल्या आईवरल्या प्रेमाबद्दल बोलतात तेव्हा नैसर्गिक प्रेमाचीच तर गोष्ट चाललेली असते! हे असे प्रेम हाच आपला नैसर्गिक जीवनरस असतो, असला पाहिजे.

आई-वडिलांचे आपल्या मुलांवर जेवढे प्रेम असते, त्यापेक्षा प्रेम नावाचे काही असू शकेल का? भगवान महावीर, गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक महात्म्यांनी जगाला प्रेमाची शक्ती समजावण्याचा प्रयत्न केला आहे; पण त्या रोपाला जगाने पुरेसे पाणी कधी घातलेच नाही. उलट प्रेमाला शरीरात कोंडून आपण सुरुंगच तयार करत गेलो. प्रेम ही तर सृष्टीची देणगी आहे. आपण माणसेच त्याला मर्यादा घालतो. नावे देतो. खरेतर प्रेमाला मुक्त वाहू दिले पाहिजे. प्रेम असे मुक्त वाहत राहील, हरेक नात्याला या प्रेमाचा स्पर्श होईल, तर अवघे जग किती सुंदर होऊन जाईल याचा कधी विचार केलात का? प्रत्येक जण एकमेकाशी प्रेमाने बांधला गेला, तर ईर्षा संपून जाईल, द्वेष उरणार नाही... सगळीकडे फक्त माणुसकी असेल. अशा सुंदर जगासाठी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते..
प्यार किसी को करना लेकीन 
कह कर उसे बताना क्या
गुण का ग्राहक बनना लेकीन 
गा कर उसे सुनाना क्या
ले लेना सुगंध सुमनोंकी 
तोड उन्हे मुर्झाना क्या
प्रेम हार पहनना लेकीन 
प्रेम पाश फैलाना क्या... !

- परंतु आजच्या जगात या अशा प्रेमासाठी जागा उरलीच आहे कोठे? जीवनातून प्रेम कापरासारखे उडून चालले आहे, ते बाजारू होऊ पाहते आहे. आधुनिकतेच्या ओघात कुटुंबे दुभंगत आहेत; कारण त्यांना घट्ट बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा कमजोर होतो आहे. कुटुंबच एकसंध राहणार नसतील, तर मग सशक्त समाजाची अपेक्षा कशी करता येईल? आणि समाज असा खंडित, दुभंगलेला असेल तर मग देश तरी कसा वाचेल? हल्ली बऱ्याचदा मला वाटते की हा काळच प्रेमाचा शत्रू झाला आहे. भिन्न जातीधर्माच्या दोन तरुण-तरुणीने एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली तर समाजाचे स्वयंभू राखणदार काठ्या घेऊन धावतात. कुटुंबीयच जिवावर उठतात. जाती-धर्माच्या खोट्या प्रतिष्ठेपायी या कोवळ्या जोडप्यांचे खून पडतात. प्रेम गीते लिहिणारे गोपालदास नीरज यांनी खूप आधी हे ओळखले होते. त्यांनी लिहिले आहे

आज की रात तुझे आखिरी खत लिख दू
कौन जाने ये दिया सुबह तक जले न जले. 
बम बारूद के इस दौर मे मालूम नहीं
ऐसी रंगीन हवा फिर कभी चले न चले...!

अशा काळात आजच्या व्हॅलेंटाईन डेला एक प्रार्थना करूया.. एकमेकांवर प्रेम तर कराच; पण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका.  जीवन सुंदर करते ते प्रेमच! द्वेषाच्या ज्वाळा शमवून आपण प्रेमाची रुजवण करू,  तेव्हा हे जग आनंदाने बहरून येईल. सगळीकडच्या भिंती रक्ताने रंगवण्याच्या गोष्टी इतिहासात होत आल्या, आज होतात, उद्याही होतील; पण त्यापासून वाचण्याचा रस्ता एकच : प्रेम.. ! लढाया, झगडे आणि जगातल्या युद्धांवर उपाय एकच :  प्रेम ! कबीर दास म्हणून गेलेच आहेत... ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय! आजच्या प्रेम दिवसाच्या शुभेच्छा...!

vijaydarda@lokmat.com
(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

 

Web Title: Love each other; But first learn to love yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.