प्रतिमेच्या प्रेमापोटी
By admin | Published: December 27, 2015 09:50 PM2015-12-27T21:50:17+5:302015-12-27T21:50:17+5:30
कलेच्या आणि विशेषत: नाटक आणि त्याहून अधिक म्हणजे सिनेमाच्या क्षेत्रामध्ये रंगमंच अथवा रुपेरी पडद्यावरील आपली उत्कट प्रतिमा तशीच राहावी आणि प्रत्यक्षातल्या प्रतिमेपायी तिला धक्का लागू नये
कलेच्या आणि विशेषत: नाटक आणि त्याहून अधिक म्हणजे सिनेमाच्या क्षेत्रामध्ये रंगमंच अथवा रुपेरी पडद्यावरील आपली उत्कट प्रतिमा तशीच राहावी आणि प्रत्यक्षातल्या प्रतिमेपायी तिला धक्का लागू नये याची जी विशेष खबरदारी पूर्वीच्या काळात घेतली जाई तशी ती हल्लीच्या पिढीकडून घेतली जात नाही व त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रजनीकांत! आता त्याचे अनुकरण करणारे अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीही समाजात वावरत असले तरी पूर्वीचा काळ प्रतिमा जपत राहण्याचाच होता. त्याच काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साधना शिवदासानी-नय्यर या साठच्या दशकातील हिन्दी सिने अभिनेत्रीच्या शुक्रवारच्या निधनाच्या जवळजवळ चार दशके आधीच तिची सिने कारकीर्द संपुष्टात आली होती. पण इतका प्रदीर्घकाळ तिने समाजातील आपला वावर जवळजवळ बंद करून टाकला होता. एक नितांत सुंदर आणि बोलक्या डोळ्यांची अभिनेत्री अशी जी काही आपली प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात ठसली आहे तिला तडा जाऊ नये म्हणूनच तिने हा कठोर संन्यास घेतला होता. सिनेमात टिकून राहायचे म्हणून मग आपल्या उतरणीस लागलेल्या वयाचा आणि सौंदर्याचा विचार करून बहिणीच्या, आईच्या किंवा आजीच्या भूमिका करीत राहण्याचा विचारही तिने केला नाही, असे तिच्याबाबत बोलले आणि लिहिले गेले आहे. पण मुळात साधनाची हिरॉॅईन होण्याची किंवा तिला तशी भूमिका दिली जाण्याची वेळ ज्या काळात टळली त्याकाळी चरित्र अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्या अभिनयाला वाव देणाऱ्या चित्रपटांचा काळच सुरू झालेला नव्हता. पुढील काळात केवळ चरित्र अभिनेत्यांच्या अभिनयावर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या चित्रपटांचा आणि दिग्दर्शकांचा काळ सुरू झाला. त्यामुळेच आजच्या पिढीच्या मनात जंजीर, शोले, डॉन या चित्रपटातील अमिताभ जितका घर करून बसला आहे तितकेच घर पा, पीकू किंवा भूतनाथने केले आहे.