लोकसभेच्या प्रचारात सभ्यतेचेच वावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:52 AM2019-05-07T06:52:06+5:302019-05-07T06:55:04+5:30
विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे.
१९५२ पासून कधी नव्हे तेवढी आपल्या निवडणूक प्रचाराने खालची पातळी २०१९ च्या निवडणुकीत गाठली आहे. देशात याआधीही अनेक चुरशीच्या निवडणुका झाल्या. १९६७ व १९७७ या दोन निवडणुका कमालीच्या टोकदार व हिंसक पातळीवरच्या म्हणता येतील अशा झाल्या. पण पुढारी, माध्यमे, सोशल मीडिया, प्रचारक आणि पक्षांचे कार्यकर्ते यांनी या वेळी प्रचाराची जी नीच व हीन पातळी गाठली तेवढी याआधी ती दुसऱ्या कोणत्याही निवडणुकीत देशाला पाहावी लागली नाही. सुब्रह्मण्यम स्वामी या माणसाच्या जिभेला हाड नाही. ते वाजपेयींपासून जेटलींपर्यंतच्या साऱ्यांना शिवीगाळ करीत आले. अशा माणसाने राहुल गांधींच्या जन्माचे दाखले मागणे व प्रियांकाच्या धर्मश्रद्धेविषयी प्रश्न विचारणे स्वाभाविक मानले पाहिजे.
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे हे माझ्या शापाने मेल्याचे सांगणे, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्र कळत नाही असे एखाद्या सडकछाप पुढाºयाने म्हणणे, नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या संबंधांची नको तशी चर्चा करणे हा सारा अशाच वाचाळ प्रचाराचा भाग म्हणता येईल. पण तो तसा नाही. यातल्या काहींना घाणेरडी वक्तव्ये करत प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. राहुल आणि सोनिया यांना शिवीगाळ करणे हे त्यांच्या पक्षालाही धर्मकर्तव्यासारखे वाटणारे आहे. मात्र याहून वाईट प्रकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा ऐन मतदानाच्या क्षणापर्यंत वापर करणे हा आहे.
झारखंड, केरळ व बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशांचा ससेमिरा लावणे, त्यांच्या सहकाºयांना अटक करणे, रॉबर्ट वाड्राविरुद्ध पोलीस कारवाई करणे, स्टॅलीन आणि द्रमुकच्या पुढा-यांवर छापे घालणे हा सारा या दुष्टाव्याचा पुरावा आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोसून सोडलेल्या ट्रोल्सकडून पुढा-यांवर लैंगिक आरोप करणे, स्त्रियांविरुद्ध बेशरम विनोद करणे यासारखे प्रकार याआधी आपल्या निवडणुकीत कधी झाले नाहीत. मोदी व त्यांचे सरकार यावर टीका करणा-यांबाबत तर या माध्यमांनी सारे तारतम्यच गुंडाळून ठेवले आहे. त्यांना दिल्या जाणा-या शिव्या आपण कधी सडकेवरही ऐकल्या नसतात. या व अशा भाषेचा वापर प्रत्यक्ष मोदी, शहा, गिरीराज, योगी इत्यादींनी तर केला; पण ज्यामुळे प्रचाराची व लोकशाहीची शान आणखी डागाळेल अशी भाषा सुमित्रा महाजन, आदित्यनाथ, स्मृती इराणी यांनीही वापरली. येत्या काळात आपले राजकारण जास्तीचे हिंस्र, अश्लील व हीन पातळीवर जाणार असल्याचीच ही लक्षणे आहेत. याला आळा घालू शकणा-या निवडणूक आयोगालाही नखे वा दात नाहीत आणि त्याला पुरेशी क्षमताही पुरविलेली नाही हेही या काळात दिसले.
आझम खान व जया प्रदा यांचा संघर्ष, दानवे व खैरे यांची खडाखडी, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांनी पश्चिम बंगालमध्ये तसेच आप व काँग्रेस यांनी दिल्लीत एकमेकांवर केलेली चिखलफेक किंवा प्रादेशिक पुढाºयांनी गल्लीतल्या पोरांनी एकमेकांना ऐकवावी अशी केलेली शिवीगाळ हे प्रकारही या काळात फार झालेत. ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला पोलीस आर्थिक अन्वेषण विभाग, गुप्तहेर खाते, विकत घेतलेली माध्यमे या साºयाच गोष्टी वापरता येतात. विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे. एखाद्याची जातकुळी वा आई-बहीण उद्धारणे ही गोष्ट आता अनेकांना नेहमीची वाटू लागली आहे.
सोशल मीडियावर येणारे ‘संदेश’ आणि त्यावरची विधाने पाहिली की आपण आपल्याच सभ्य देशात राहत आहोत की नाही हा प्रश्न साºयांना पडावा. राजकारण हे धर्मक्षेत्र आहे आणि त्यातली स्पर्धा धर्माच्या सुसंस्कृत पातळीवर लढविली पाहिजे, असे गांधी आणि विनोबा म्हणत. ही माणसे आजचा काळ पाहायला जिवंत नाहीत हे त्यांचे भाग्य वा आपले दुर्दैव मानले पाहिजे. राजकारणाला सभ्यतेचे व सुसंस्कृतपणाचे वळण देण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत नसतील तर ते काम जनतेनेच आता हाती घेतले पाहिजे.