निष्ठेचा मांडला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 09:05 PM2020-11-18T21:05:41+5:302020-11-18T21:05:52+5:30
मिलिंद कुलकर्णी भारतीय राजकारण हे निवडणूक केद्रित होऊ लागल्याने पक्षांतरे, राजीनामानाट्य, बंडखोरी अशा घटना कायम सुरु असतात. वर्षभर कोठे ...
मिलिंद कुलकर्णी
भारतीय राजकारण हे निवडणूक केद्रित होऊ लागल्याने पक्षांतरे, राजीनामानाट्य, बंडखोरी अशा घटना कायम सुरु असतात. वर्षभर कोठे ना कोठे निवडणुका होत असल्याने या घटनांमध्ये सातत्य असते आणि त्याची चर्चादेखील होत असते.
मध्य प्रदेश, गुजराथमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार पुन्हा निवडून आले. लोकशाही संकेतानुसार त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपकडून निवडून आले. पक्षांतरबंदी कायदा झाल्याने त्यांच्यापुढे हा एकमेव पर्याय होता. सत्ताधारी पक्षाची विधिमंडळातील स्थिती मजबूत करण्यासाठी हा सगळा खटाटोप झाला. दुसरीकडे महाराष्टÑात एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना पक्षचिन्हावर निवडून आलेला कोणीही समर्थक सोबत येणार नसल्याची घोषणा केली. शरीराने भाजपमध्ये आणि मनाने खडसेसोबत अशी स्थिती त्यांच्या समर्थकांची आहे. पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचण्यासाठी ही क्लृप्ती वापरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून धुळे - नंदुरबार जिल्ह्यातून विधानपरिषदेसाठी एक जागेची निवडणूक १ डिसेबर रोजी होत आहे. काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांनी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताना आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. पटेल हे आता भाजपचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने नंदुरबारचे जि.प.सदस्य अभिजित पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील हे शहाद्याचे भाजपकडून निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत.
राजकारणात सोयीस्कर भूमिका घेत निष्ठा कशी गुंडाळून ठेवली जाते, त्याची ही मासलेवाईक उदाहरणे म्हणायला हवी.
वर्षानुवर्षे एखाद्या पक्षात राहिल्यानंतर तो सोडण्याची वेळ येणे हा कोणत्याही नेता, कार्यकर्त्यासाठी कटू प्रसंग असतो. काही वेळा प्रलोभन, आमीष प्रभावशाली ठरते तर काही ठिकाणी अन्याय, घुसमट असते, त्यातून बाहेर पडण्यासाठी पक्षांतराचा निर्णय घेतला जातो. व्यक्तीसापेक्ष हा निर्णय असतो. कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होत असते. नेत्याच्या पाठोपाठ त्याचीही फरपट असते. नेत्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असल्याने कार्यकर्ते पक्षांतरदेखील करतात. त्यांच्या हाती काय पडते, हा मुद्दा आहेच. परवा एक कार्यकर्ता भेटला. उत्स्फूर्तपणे ‘जय श्रीराम’ म्हणाला. लगेच जीभ चावत त्याने ‘जय राष्टÑवादी’ची जोड दिली. चेहरा कसानुसा झालेला होता. त्याची मनस्थिती समजून घेता येईल. भाजपमध्ये नुकतेच आलेले ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील मध्य प्रदेशातील प्रचार सभेत ‘पंजा’ला मते द्या, असे चुकून बोलून गेलेच ना! वर्षानुवर्षाची सवय अशी लगेच जाईल, अशी अपेक्षा कशी करता येईल?
राजकीय व्यक्ती प्रत्येक प्रसंगातून संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. दोन शब्द, ओळींमध्ये दडलेला भावार्थ कळणे महत्त्वाचे असते. दिवाळीच्या निमित्ताने दोन नेत्यांची शुभेच्छा पत्रेदेखील सूचक आहेत. पहिले आहेत, राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले एकनाथ खडसे. दीपावलीचा एकच जागर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर हा संदेश देत त्यांनी कोरोना काळात खबरदारी घेण्याचा संदेश शुभेच्छा पत्रात दिला आहे. डॉक्टर, पोलीस, परिचारिका, सफाई कामगार हे कोरोना योध्दे आणि मास्कच्या आकारातील पणती असे समर्पक चित्र शुभेच्छा पत्रावर रेखाटले आहे. पक्षीय स्वरुप जाणीवपूर्वक टाळले असून पक्षचिन्ह देखील नाही. त्यामुळे स्नुषा रक्षा खडसे यांच्यासह संपूर्ण खडसे कुटुंबियांची नावे शुभेच्छुक म्हणून टाकली आहेत. पक्षीय स्वरुप न देता संपूर्ण पारिवारिक स्वरुपाचे शुभेच्छा पत्र तयार करुन खडसे यांनी सदासर्वकाळ राजकारण आवश्यक नसते, असा संदेश दिला आहे.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या शुभेच्छापत्रात उत्तमराव पाटील यांच्या छायाचित्रासह दिवाळी त्यागाची, समर्पपणाची अन् निष्ठेची...’ असा थेट संदेश देत जिल्ह्यातील ताज्या राजकीय घडामोडीवर मार्मिक टिपणी केली आहे. तसेच पक्षातील घडामोडींविषयी संघटनपातळीवर काय भूमिका आहे, ती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा जोरकस प्रयत्न केलेला आहे. त्यात म्हटले आहे की, खान्देशात १९५७ मध्ये उत्तमराव पाटील यांनी जनसंघाचा दिवा पहिल्या विजयाने प्रज्वलित करुन पाया रचियला. गेल्या ५० वर्षांत हजारो कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणाने जनादेश मिळवून भाजपाने त्यावर कळस चढविला. उत्तमराव हे भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष, माजी महसूल मंत्री, माजी विरोधी पक्षनेते असल्याचे ठळकपणे नमूद करुन पक्षासाठी कोणी खस्ता खाल्लया हे दर्शविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. राजकारणात या गोष्टींना महत्त्व असतेच, ते नाकारुन चालणार नाही. त्यातून काय संदेश, बोध घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.