हरवलेली कौशल्ये

By admin | Published: February 4, 2017 04:35 AM2017-02-04T04:35:34+5:302017-02-04T04:35:34+5:30

काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या

Lucky Skills | हरवलेली कौशल्ये

हरवलेली कौशल्ये

Next

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या आणि वेताच्या सुबक वस्तू बनविणाऱ्या बुरुडांच्या घरांचा उल्लेख आला. कथा वाचतानाच ‘वहाणा’ कथेत चपलांचा कारखाना निघाल्याने ज्याची स्वप्ने हरवतात अशा दादाजी चांभाराची व्यथा जाणवली. श्रीधर शनवारे यांच्या ‘बहुरूपी’ कवितेतील अनेक नकला वठवणाऱ्या लोककलावंतांची आठवण झाली. लोकसंस्कृतीमधील अनेक धूसर आठवणी जाग्या झाल्या. कालौघात हरवत जाणारे त्यांचे कौशल्य आठवले.
याच काळात नात्यातील ज्या घरी वंशपरंपरेने गोंधळाची रीत आवर्जून पार पाडली जाते, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. नवरात्रात अंबा, दुर्गा यांच्या अवतारकथा ते कुशलतेने सादर करत होते. संबळ, तुणतुणे यांच्या तालावर लयबद्ध नृत्य करीत सप्तशृंगीदेवीची आराधना सुरू होती. अंगात लांब झगा, गळ्यात मण्यांच्या माळा, पगडीसारखी भरजरी टोपी घालून मध्यम वयाचे ते गोंधळी तल्लीन होऊन गात होते. वंशपरंपरेने चालत आलेला हा वारसा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होतो असे समजले. ज्याची छबी तुकारामांवरच्या मालिकेतून पाहिली तो ‘दान पावलं’ म्हणून गात लोकांना सूर्योदयाची वर्दी देणारा वासुदेव काही वर्षांपूर्वी नाशिकला अवचित बघायला मिळाला. आज काळाच्या ओघात मागे पडलेल्या कला आणि व्यवसाय मनात तरळायला लागले. खूप वर्षांपूर्वी दिवाळीच्या तयारीला लागलेल्या गृहिणी अन्न कळकेल, खराब होईल या भीतीने कल्हई उडालेल्या पितळेच्या जड पातेल्या, ताटं, झाकण्या वेगळ्या काढून ठेवत. कल्हईवाला अगदी बिनतारी संदेश पाठवल्यासारखा त्या सुमारास येई. कोल्हाटी आणि माकडवालेही याच सुमारास येत. मुलांच्या घोळक्याच्या साक्षीने, मुलांची दिलखुलास दाद घेत त्यांचे भांड्यांना कल्हई करण्याचे काम चालायचे. तन् ... तन्... असा तारेचा मंजूळ आवाज आला की पिंजारी दादांच्या मागे मागे मुलांचा घोळका असे. आमच्या आजोळी कापसाच्या खोलीत त्यांचे कापूस पिंजण्याचे काम चालायचे. त्याचे कसब पाहण्यासारखे असायचे.
झबल्यासारख्या कुडत्यावर रंगीबेरंगी कापडाचे तुकडे आणि आरसे यांचे सुरेख भरतकाम करणाऱ्या स्त्रिया फण्या, माळा विकताना क्वचित दिसत. इरावतीबाई कर्वेंनी त्यांचा लमाणी आणि वंजारी म्हणून उल्लेख ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात केला आहे. कधी टोपलीभर बांगड्या घेऊन कासार यायचा. या साऱ्यांच्या आठवणी धूसर झाल्या कारण या परंपरा शहरात तरी खंडित झाल्या. परंपरेतून संस्कृतीचा लवचिक प्रवाह वाहत असतो. ‘पोटापुरते देई। मागणे लई नाही’ असे जगणारे आणि घरपोच सेवा आणि मनोरंजन देणारे ते परस्परावलंबी सहजीवन आज आपल्या विविधांगी संस्कृतीतून हरवले आहे.

Web Title: Lucky Skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.