माढा गेम प्लॅन' गाफिल पवार काका-पुतण्याच्या अंगलट !
By राजा माने | Published: March 19, 2019 10:00 PM2019-03-19T22:00:58+5:302019-03-19T22:37:37+5:30
फडणवीसांच्या व्यूहरचनेने भरले नवे रंग
विश्लेषण : राजा माने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिळखिळे करण्यासाठी मांडलेला डाव एक एक मोहरा टिपत आहे.या सरीपाटावर मांडलेल्या डावातील भूमिका चांद्रकांतदादा पाटील,गिरीश महाजन,सुभाष देशमुख या शिलेदारांनी नियोजनाबरहुकूम वठविल्या आणि साखरपट्ट्यातील दिग्गज राजकीय घराण्यातील अनेक मोहरे भाजप गोटात येवून विसावले.अगदि छत्रपती संभाजीराजे, महाडिक, विनय कोरेपासून सदाभाऊ खोत यांच्या सारख्या नावांची गुंफण या मालिकेत लिलया केली.ती करताना अनेक जिल्हा परिषदा आणि महापालिका कधीखिश्यात टाकल्या तेही विरोधकांना कळू दिले नाही.शरद पवारांसह सर्वच राष्ट्रवादी व कॉंग्रेसजन गटातटाच्या अस्मितेची धुणी धुण्यातच रममाण राहिले.ताज्या मालिकेत डॉ.सुजयच्यारुपाने विखे-पाटील तर रणजितसिंह यांच्यारुपाने मोहिते-पाटील या घराण्याची नावे गुंफली गेली."माढा गेमप्लॅन " पवार काका-पुतण्यांच्या अंगलट आला आणि फडणवीसांनी गुंफलेल्या मालिकेत होळीच्या पूर्वसंध्येला नवे रंग भरले.
'कात्रजचा घाट दाखविणे' आणि 'पायात साप सोडणे', या म्हणी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय आहेत. त्या म्हणींशी इमान राखण्याचे काम सर्वच पक्षांचे नेते थोड्याफार फरकाने पार पाडत आले. साखरपट्ट्यात तर या कामाला सदैव प्राधान्य दिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही या म्हणींचा अंमल पुरेपूर केला. २०१४ नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीतही काळानुरूप व्यूहरचना न बदल्यामुळे त्यांचे अनेक राजकीय डाव विस्कटल्याचे अनुभव येत आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही त्याच मार्गाने निघाल्याने 'माढा गेम प्लॅन' अंगलट आला आणि विजयसिंह मोहिते-पाटील घराणे भाजपच्या पंक्तीला जाऊन बसले !
काय होता 'माढा गेम प्लॅन'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांच्यासोबत राहिलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शक्त प्रदर्शन करून प्रभाव गट तयार केला. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादीमध्ये 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून २००९ साली मोहिते-पाटलांना ब्रेक लावण्यासाठी स्वत: शरद पवारच लोकसभेच्या मैदानात उतरले. प्रकरण एवढ्यावर न थांबता, आपला पारंपरिक माळशिरस हा मतदारसंघ राखीव झाल्याने माढा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागणाऱ्या मोहिते-पाटलांना पंढरपूर मतदार संघात उभे करून पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोहिते-पाटील यांच्या विरोधात 'तरुणतूर्क' नेत्यांची फळी तयार करण्यात आली. तरुणतुर्कांचे नेतृत्व अजित पवारांचे विश्वासू शिलेदार संजय शिंदे यांच्याकडे आले. जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधकांची मजबूत फळी तयार करण्यात शिंदे यशस्वी झाले. २०१४ साली देखील मोहिते पाटलांच्या उमेदवारीला पवारांच मानणाऱ्या नेत्यांनी विरोध केला. पण शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा कसाबसा पराभव करत मोहिते-पाटील तरले. हा इतिहास घेऊन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही मोहिते-पाटलांच्या विरोधात 'माढा गेम प्लॅन' तयार करण्यात आला. त्या प्लॅनचाच पहिला भाग म्हणून निवृत्ती सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना मोहिते-पाटलांसाठीचा पर्यांयी उमेदवार म्हणून वर्ष दीड वर्ष मतदार संघात फिरविण्यात आले. एव्हाना राष्ट्रवादीचा दुसरा गट हा भाजपसह इतर विरोधी पक्षात फक्त विसावलाच नाही, तर त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. ते गट गृहित धरून शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर २००९ प्रमाणे स्वत: उभे राहण्याचा निर्णय पवारांनी घेतला. पुलवामा हल्ला आणि बालकोट एअरस्ट्राईकनंतर पवारांना उभे राहण्याचा निर्णय फिरवावा लागला.
माढा गेम प्लॅनचा अंदाज दोन वर्षांपूर्वीच मोहिते-पाटलांना आला होता. त्यामुळे खासदार विजय सिंह मोहिते-पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सतत संपर्कात राहिले. त्याचवेळी फडणवीसांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या खांद्यावर मोहिते-पाटील विरोधक आणि भाजपच्या कुंपणावर असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना हाताळण्याची जबाबदारी सोपविली. दादांनीही जिल्ह्यातील सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोयीने वापरून भाजप आघाडी मजबूत केली. त्यातही भाजपमधील मोहिते-पाटील गट सुभाष देशमुखांकडे तर संजय शिंदे गट विजयकुमार देशमुखांकडे अशा उभ्या फळ्या तयार झाल्या. तरी भाजप आघाडीने जिल्हा परिषद महापालिका आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या रुपाने विधान परिषद जिंकण्यात घवघवीत यश मिळविले. या सर्व घटनांकडे पक्ष म्हणून पवार काका-पुतण्याने गांभीर्याने पाहिल्याचे कधीच दिसले नाही. त्याचाच परिणाम आज शरद पवारांच्या लाडक्या जिल्ह्यात उमेदवाराचा अक्षरश: शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)