मधुबाला
By Admin | Published: March 7, 2016 09:21 PM2016-03-07T21:21:42+5:302016-03-07T21:21:42+5:30
तुझ्या पतीला आता परमेश्वरच वाचवू शकेल’, डॉक्टरांनी मधुबालाला सांगितले तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळले. कोमात असलेल्या रामबाबूला जगवण्याचे महिनाभरापासूनचे सारे प्रयत्न संपले.
‘तुझ्या पतीला आता परमेश्वरच वाचवू शकेल’, डॉक्टरांनी मधुबालाला सांगितले तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळले. कोमात असलेल्या रामबाबूला जगवण्याचे महिनाभरापासूनचे सारे प्रयत्न संपले. डॉक्टरांनी आशा सोडली, उपचारासाठी पैसे संपले आणि नातेवाईकांनीही पाठ फिरवली. मधुबाला निराश्रित, पण तिचा धीर सुटत नव्हता. आयुष्यभराची कमाई पतीच्या उपचारात गेली. पदरात काहीच उरले नव्हते. गळ््यातले मंगळसूत्र तेवढे होते. शेवटी तिने तेही विकून टाकले. पतीच्या निष्प्राणगत देहाला घेऊन ती एकटीच नागपूरला आली. एका खासगी रुग्णालयात त्याला भरती केले. त्याचे अवयव हळूहळू निकामी होऊ लागले होते. तब्येत खालावत होती. डॉक्टर म्हणाले, ‘काहीच सांगू शकत नाही, पण प्रयत्न करू’ तिचे मन मात्र सांगत होते, तो नक्की परत येईन’ त्याच्यावर उपचार सुरू झाले खरे, पण दुसऱ्याच दिवशी होते नव्हते ते पैसे संपले. इथे ओळखीचे कुणीच नाही, मदत कुणाला मागणार? मधुबालाची तगमग सुरू झाली.
रुग्णालयात नातेवाईकाला भेटायला आलेल्या आनंद रहाटे नावाच्या एका भल्या माणसाला तिची तगमग जाणवली. रहाटे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी आहेत. ते अनुसूचित जाती-जमाती कर्मचारी संघटनेचे महासचिवही आहेत. त्यांनी संघटना आणि बँकेच्या माध्यमातून तिला तातडीने तीन लाख रुपये मिळवून दिले. मात्र उपचाराचा खर्च दहा लाखांच्या घरात होता. रहाटे पुन्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला भेटले. उर्वरित पैसे जमा करण्यासाठी मुदत मागितली. मधुबालाला घेऊन ते लोकमत कार्यालयात आले. ‘लोकमत’ ने मदतीचे आवाहन केले अन् सहृदय माणसांचे असंख्य हात पुढे आले. एका वृद्ध महिलेने महिन्याची पेन्शन मधुबालाच्या पदरात टाकली. श्रीमंतांचे अनुभव मात्र वाईट होते. डॉ. जस्मीन भोयर यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळू लागले. हळूहळू रामबाबू उपचारांना प्रतिसाद देऊ लागला. ५१ दिवस तो कोमात होता. रहाटे आणि त्यांचे सहकारी रोज रुग्णालयात जायचे. तसे त्यांचे त्याच्याशी कुठलेही नाते नाही. रामबाबू जबलपूरचा. एका बँकेत सफाई कामगार. बँकेतून घरी परतताना अपघात झाला आणि तो कोमात गेला. जबलपुरात महिनाभर उपचार झाले. घरच्यांनीही आशा सोडली होती, पण मधुबाला त्याच्या श्वासांना घट्ट बिलगून होती. रुग्णालयात ती झोपत नव्हती. फरशीवर दिवसभर बसून राहायची. चुकून डोळा लागला आणि काही विपरीत घडले तर! कुठल्याही क्षणी पतीला गाठू पाहणाऱ्या मृत्यूवर तिचा असा पहारा सुरू होता. एके दिवशी रामबाबूने डोळे उघडले. दीर्घ निद्रेतून त्याला जाग आली होती. त्याचा तो पुनर्जन्मच. मधुबाला शेजारीच होती. तो बोलू शकत नव्हता. तिचे हात हातात घेतले आणि अश्रूंनी तेवढा व्यक्त झाला.
ही गोष्ट आहे मधुबाला नावाच्या एका पत्नीच्या पतीवरील निस्सीम प्रेमाची. सावित्री ही भारतीय संस्कृतीच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. सावित्रीच्या तेजामुळे यमराजही सत्यवानाचे प्राण हरण करू शकला नाही, अशी दंतकथा आहे. पण मृत्यूच्या दारात असलेल्या पतीसाठी एकाकी झुंज देणारी ही मधुबाला सावित्रीचे खरे रूप आहे. ही ‘सत्यकथा’ त्या पुराणकथेपेक्षा अधिक प्रेरणा देणारी आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनाच्या कोपऱ्यात एक मधुबाला असते. तिच्या सौंदर्याचे शिल्प त्याच्या अंतरंगात घडत असते. ती आपल्या आयुष्यात यावी आणि आपले जगणे सुंदर व्हावे असे त्याला मनापासून वाटते. रामबाबूच्या आयुष्यात मधुबालाचे स्थान चिरंतन आहे. त्यांच्यातील नाते दिखावू सौंदर्याच्या पलीकडचे आहे, म्हणूनच ते अमर्त्यही आहे. दोघांचेही श्वास एकमेकात गुंतलेले आहेत. त्याच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमामुळेच ती त्याला परत आणू शकली. रामबाबूची मधुबाला सौंदर्याचे मूर्तिमंत रूप आहे. ते शक्तीचे प्रतीक आहे. पतीला सुखरूप परत घेऊन जाताना तिने रुग्णालयाचा निरोप घेतला तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. आपण आभासालाच सत्य मानून आणि समजून चालणारी माणसे. ही मधुबाला आपल्याहून वेगळी. म्हणूनच तिच्या प्रेमाची गोष्ट ‘हे जग सुंदर आहे’ असे सांगणारी आहे.
- गजानन जानभोर