मधुस्मिता यांचा फिटनेस फंडा! साडी नेसून 'ती' इंग्लंडमध्ये ४२.५ किमी धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:25 AM2023-05-06T06:25:29+5:302023-05-06T06:25:59+5:30

भारतीय स्त्री आणि साडी यांचं नातं अतिशय अतूट असं आहे. साडी हा भारतीय स्त्रीसाठी जणू काही एक अलंकार आहे.

Madhusmita's Jena fitness funda! She ran 42.5 km in England wearing a saree | मधुस्मिता यांचा फिटनेस फंडा! साडी नेसून 'ती' इंग्लंडमध्ये ४२.५ किमी धावली

मधुस्मिता यांचा फिटनेस फंडा! साडी नेसून 'ती' इंग्लंडमध्ये ४२.५ किमी धावली

googlenewsNext

भारतीय स्त्री आणि साडी यांचं नातं अतिशय अतूट असं आहे. साडी हा भारतीय स्त्रीसाठी जणू काही एक अलंकार आहे. त्यामुळे कुठल्याही सण, समारंभाला महिलांकडून जशी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते, त्याप्रमाणेच साड्यांचीही खरेदी मोठ्या हौसेनं केली जाते. साडीचं जनकत्व आधी कित्येक वर्षे ग्रीकांना दिलं जात होतं. साडीचा जन्म ग्रीसमध्ये झाला असं मानलं जात होतं. कालांतरानं हे सिद्ध झालं की साडीचा जनक ग्रीस नव्हे, तर भारतच आहे. भारतातच साडीचा उगम झाला आहे. काहीही असलं तरी साडी हा भारतीय स्त्रियांसाठी जीव की प्राण. साडी नेसल्यावर त्यांचं सौंदर्य तर आणखी खुलतंच, पण स्त्रियांसाठी साडी हे एक आनंदनिधानही आहे. 

बऱ्याच देशांत असं मानलं जातं की साडी हा सुटसुटीत पोशाख नाही. साडी नेसून कामं भराभर करता येत नाहीत. कष्टाच्या कामांसाठीही साडी सोयीची नाही. भारतीय स्त्रिया मात्र त्याला अपवाद असाव्यात. कारण बहुतांश भारतीय स्त्रिया दिवसभराची आपली सारी कामं साडी नेसूनच तर करीत असतात. साडी नेसून काही गोष्टी करणं खरंच अवघड आहे. तरीही भारतीय स्त्रिया हे सारं कसं जमवतात, एवढी मोठी साडी अगदी काही मिनिटांत त्या कशा काय नेसू शकतात आणि त्यावर इतकी कामं कशी काय करू शकतात, याबाबत परकीय लोकांना फार आश्चर्यही वाटतं.याच आश्चर्याचं प्रतिबिंब अलीकडेच कौतुकातही उमटलं. 

घटना आहे मँचेस्टरची. काही दिवसांपूर्वीच मधुस्मिता जेना या ४१ वर्षीय भारतीय महिलेनं इंग्लंडच्या मँचेस्टर या शहरात ४२.५ किलोमीटर लांबीची पूर्ण लांबीची मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. फूल मॅरेथॉन पूर्ण करणं ही तोंडाची गोष्ट नाहीच, पण तरीही कोणी म्हणेल की त्यात काय विशेष? ही गोष्ट अवघड आहे, पण ती तितकी कठीणही नाही. कारण काही महिन्यांच्या सरावात तुम्ही मॅरेथॉन अंतर पूर्ण करू शकतात; पण मधुस्मिता यांचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी संबलपुरी साडी नेसून या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. नुसता भागच घेतला नाही, तर ही शर्यत पूर्णही केली, तीही अतिशय सहजपणे, हसत हसत, इतरांना प्रोत्साहन देत.. 

मँचेस्टरची ही मॅरेथॉन प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला होता; पण केवळ मीडियाच नव्हे, तर सर्वच स्पर्धक आणि ही स्पर्धा पाहणाऱ्या दर्शकांचं सारं लक्ष मधुस्मिता यांच्यावरच होतं. कारण या स्पर्धेत साडी नेसून धावणाऱ्या त्या एकमेव स्पर्धक होत्या. इंग्लंडच्या मीडियानं या घटनेला खूप प्रसिद्धी दिली. विविध माध्यमांत मधुस्मिता यांचे फोटो, व्हिडीओ झळकले. एवढंच नाही, सर्वसामान्यांनीही त्यांचे फोटो, व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकले. मधुस्मिता यांचे हे व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाले आणि जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.  

भारतात अशा प्रकारची घटना कदाचित फार नवलाईची नसेलही, कारण अनेक महिलांनी याआधी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये साडी नेसूनही आपलं नैपुण्य सिद्ध केलं आहे; पण इंग्लंडसारख्या परकीय देशांत ही खरंच खूप नवलाईची गोष्ट होती. मधुस्मिता या पेशाने शिक्षक आहेत; पण फिटनेसची त्यांना आवड आहे. याआधीही अनेक देशांमध्ये त्यांनी केवळ मॅरेथॉनच नाही, तर अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही भाग घेतला आहे आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत.अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा फूल मॅरेथॉन म्हणजे ४२ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या असतात. कमीत कमी अंतराची, सर्वांत लहान अल्ट्रा मॅरेथॉन किमान ५० किलोमीटरची असते. याशिवाय ८१ किलोमीटर, शंभर किलोमीटर, ३२१ किलोमीटर पर्यंतच्या अल्ट्रा मॅरेथॉन होतात. काही देशांत तर एक हजार मैल म्हणजे सुमारे १२०० किलोमीटर अंतराच्याही अल्ट्रा मॅरेथॉन होतात. 

मधुस्मिता म्हणतात, साडी नेसून इतकं मोठं अंतर धावणं सोपं नाहीच, पण ते फार कठीणही नाही. आपल्या भारतीय स्त्रिया यापेक्षा मोठी आव्हानं लीलया पेलू शकतात. मी हे करू शकले, कारण मीही भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये वाढले आहे. माझी आजी माझी प्रेरणा आहे. अनेक लोकांना वाटतं की साडी नेसून धावणं अवघड आहे; पण मी त्यांना खोटं ठरवू शकले, याचा मला अभिमान आहे. साडी मलाही फार आवडते आणि अगदी उन्हाळ्याच्या दिवसांतही मी साडीच नेसते.. 

मधुस्मिता यांचा फिटनेस फंडा! 
सोशल मीडिया आणि लोकांनीही मधुस्मिता यांचं कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही युजर्सनी सोशल मीडियावर मधुस्मिता यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. कारण आहे, अर्थातच फिटनेसविषयीचा त्यांचा आग्रह. त्या स्वत: तर फिट आहेतच, आपल्या बिझी शेड्यूलमध्येही त्या व्यायाम, खेळासाठी वेळ राखून ठेवतातच, पण इतरही अनेकांमध्येही त्यांनी फिटनेसची आवड निर्माण केली आहे.

Web Title: Madhusmita's Jena fitness funda! She ran 42.5 km in England wearing a saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.