महाअधिवक्ते चार...
By admin | Published: June 13, 2017 05:14 AM2017-06-13T05:14:34+5:302017-06-13T05:14:34+5:30
राज्यात भाजपा सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र या अडीच वर्षांच्या कालावधीत चार महाअधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाअधिवक्ता हे पद घटनात्मक
राज्यात भाजपा सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र या अडीच वर्षांच्या कालावधीत चार महाअधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाअधिवक्ता हे पद घटनात्मक असूनही भाजपा सरकारच्या काळात हे पद भरण्यासाठी काही लोकांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. भाजपा सत्तेत आल्यानंतर काही महिने हे पद रिक्त राहिले. हे पद भरावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर नागपूरचे ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली. गोवंश हत्याबंदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीत सरकारची बाजू मांडताना वादग्रस्त विधान केल्याने मनोहर यांनी महाअधिवक्ता पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सरकारने महाअधिवक्ता पद काही महिने रिक्तच ठेवले. पुन्हा काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दरडावल्यानंतर ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. परंतु, अणे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते असल्याने शिवसेनेने भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली. अणे यांच्या नियुक्तीवरून शिवसेना-भाजपामध्ये चांगलेच राजकारण तापले. त्यामुळे अणे यांनी राजीनामा देणे पसंद केले. त्यानंतरही राज्य सरकारचे डोळे काही उघडले नाहीत. काही महिने कारभार तसाच हाकत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सरकारची बाजू मांडणारे रोहित देव यांच्या डोक्यावर हा काटेरी मुकुट घालण्यात आला. काहीच दिवसांपूर्वी देव यांची न्यायाधीशपदी वर्णी लागल्याने पहिल्यांदा सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता तत्काळ ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची महाअधिवक्तापदी वर्णी लावली. आशुतोष कुंभकोणी यांनी आघाडी सरकारच्या काळात सहाय्यक महाअधिवक्ता म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही नियुक्त करण्यात आली. मात्र काही कारणास्तव त्यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा देत स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. भाजपा सरकारच्या काळात त्यांनी अनेकवेळा मोठ्या प्रकरणांत सरकारची बाजू न्यायालयापुढे ताकदीने मांडली आहे आणि त्यात त्यांना यशही आले आहे. मात्र भाजपा सरकारच्या काळात ‘महाअधिवक्ता’ नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे कुंभकोणी यांच्यापुढेही अनेक आव्हाने येतील. आता ते हे पद कशाप्रकारे पेलतात? हे पाहावे लागेल. तसेच भाजपाच्या काळात काहीना काही कारणामुळे महाअधिवक्ता पदाला लागलेले ग्रहण दूर करण्यात कुंभकोणी यांना यश येते का? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.