वैश्विक मूल्यांची मांडणी करणारा महाकवी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:24 AM2018-07-13T00:24:51+5:302018-07-13T00:26:32+5:30
अलौकिक प्रतिभावंत कविकुलगुरू कालिदासाचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते.
- विजय बाविस्कर
आषाढातील पहिल्या दिवशी सर्जनशील निसर्गाने आसमंतात नवनिर्मितीची प्रक्रिया आरंभ केलेली असते. पावसाचे जे नवचैतन्य निसर्गात अवतरते, त्यातून कालिदासाच्या ‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ या ओळी ओठांवर रेंगाळू लागतात. या ओळींच्या रूपाने कालिदासाच्या स्मृती तनामनात ताज्या होत राहतात.
कालिदासाच्या साहित्यात निसर्गाला विशिष्ट स्थान आहे. त्याचे ऋतुसंहार काव्य म्हणजे तर निसर्गाचा जीवनपटच आहे. ‘मेघदूता’तील यक्षाची विरहभावना आकाशाच्या निळाईवर रंगरेषेसारखी उजळते, तर त्याच्या पत्नीच्या विरहमूर्तीला निसर्गछटांची सोनेरी किनार लाभते. ‘कुमारसंभव’ आणि ‘रघुवंश’मध्ये निसर्गातील चित्रणाबरोबर वसंतवैभवाचा उत्सवही ओसंडला आहे.
संस्कृत साहित्यात ‘कालिदास’ हा भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी मानला जातो. महाकवी, भावकवी व नाटककार या तिन्ही भूमिकांमधून तो समर्थपणे उभा राहतो. निसर्गात ॠतुचक्राचे माणसाच्या दैनंदिन जीवनावर आणि मनावरही पडसाद उमटतात. निसर्गाच्या ॠतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हे जाणणारा निसर्गसौंदर्याला, मानवी भावभावनेला व जगण्याच्या वास्तवाला शब्दसौंदर्याने फुलवणारा हा ‘महाकवी’ वैश्विक मूल्यांची मांडणी आपल्या रचनांमधून करतो. संस्कृत वाङ्मयाच्या या थोर नाटककारास जयदेव कवीने ‘कविकुलगुरू’ अशी पदवी दिली. बाण कवीने त्याच्या काव्याचे वर्णन ‘मधुररसाने थबथबलेली मंजिरीच’ असे केले आहे.
इतिहास, पुराणे, अद्वैतवेदान्त, ज्योतिषशास्त्र, वैद्यक, गणित, व्याकरण, अर्थशास्त्र, संगीत, चित्रकला आदी शास्त्रे व कलांचा अभ्यासक असा कालिदास ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातला राजा विक्रमादित्य याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक. याचे वास्तव्य मध्य प्रदेशात; परंतु बंगाल, ओडिशा, काश्मीर अशा प्रदेशांतही त्याने वास्तव्य केले. त्याच्या काव्यात या सर्व ठिकाणच्या निसर्गसौंदर्याचे अप्रतिम वर्णन चपखलपणे आढळते. हिमालयावरील त्याचे विशेष प्रेम ‘मेघदूत’ या काव्यात प्रकटले आहेच. विद्येबाबत व गुरूंबद्दल त्याला नितांत आदर होता. शृंगारात त्याची वृत्ती अधिक रमत असे. ही वस्तुस्थिती असली तरी तो स्वैराचारी नव्हता. विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणि वत्सल अशी त्याची प्रतिमा होती. ‘शाकुंतल’ या नाटकात कालिदासाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची साक्ष आढळते. प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने, ‘स्वर्ग व पृथ्वी यांचे मधुर मिलन जर कुठे पाहायचे असेल, तर मी कालिदासाच्या ‘शाकुंतल’कडे निर्देश करीन,’ असे गौरवोद्गार काढले आहेत. कोणतीही गोष्ट त्याग व तपस्या यांच्या आधारावरच दिव्य बनते, असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळेच अद्वितीय श्रेष्ठत्व असलेल्या या कविकुलगुरूचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते.