सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

By किरण अग्रवाल | Published: November 10, 2024 05:03 PM2024-11-10T17:03:36+5:302024-11-10T17:03:36+5:30

खानदेशात पहिल्याच टप्प्यात थेट पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्याने महायुतीच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून, आता विरोधी नेत्यांकडून सभांचे मैदान गाजवले जाण्याची प्रतीक्षा आहे.

maharashtra assembly election 2024 BJP Narendra Modi Jalgaon Dhule nandurbar assembly constituency | सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपा नेते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा धुळे येथे झाल्याने महायुतीच्या दृष्टीने जळगाव खान्देशचे असलेले महत्त्व अधोरेखित होऊन गेले म्हणायचे. या सभेतील मोदी यांचा सुस्पष्ट रोख व विरोधकांवरील हल्लाबोल पाहता यापुढील काळात सर्वपक्षीय प्रचार युद्ध कसे रंगते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

विधानसभेची निवडणूक आता बऱ्यापैकी रंगात आली आहे. दिवाळी  होऊन गेली आणि अर्ज माघारीही उलटून गेल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच प्रचाराने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 'डोअर टू डोअर' प्रचार व पदयात्रांवर भर दिसून आला. आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. यात भाजपाचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील प्रचाराच्या शुभारंभाची सभा खान्देशच्या धुळ्यात झाल्याने महायुतीच्या गोटात विजयाच्या विश्वासाचे बळ संचारणे स्वाभाविक म्हणायला हवे. भाजपाचे स्टार प्रचारक अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिंदेसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेते व अन्य पक्षांच्या स्टार प्रचारकांच्याही सभा यापुढील काळात नियोजित आहेत, त्यामुळे प्रचार आता गडद होणार आहे. 

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण 20 जागांपैकी भाजपाकडे सर्वाधिक आठ जागा असून, महायुतीचे तब्बल 15 आमदार आहेत. लगतच्या नाशिक जिल्ह्यातही भाजपाचे प्राबल्य आहे, यादृष्टीने पंतप्रधानांच्या राज्यातील पहिल्याच सभेचे नियोजन धुळ्यात केले गेले. आजवर महाराष्ट्रातील निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ धुळे नंदुरबार मध्ये होत आला, आता भाजपानेही याच 'बेल्ट'ला शुभारंभासाठी निवडले आहे. धुळ्यात मोदी यांनी आदिवासींचा मुद्दा, धुळे इंदोर रेल्वेमार्ग, इंडस्ट्रियल कॉरिडोर, टेक्सटाईल हब अशा विकासविषयक विविध मुद्द्यांना हात घालतानाच  विरोधकांचा सडकून समाचार घेतलाच, शिवाय 'एक है तो सेफ है'चा नारा देऊन भाजपाची असलेली वोट बँक अधिक बळकट करून दिली आहे. 

धुळ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याला इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक हब बनवण्याची ग्वाही देतानाच गेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने 'वोट जिहाद'चा मुद्दा छेडून सावध राहण्याचे आवाहन केले. तोच धागा पकडून पंतप्रधान मोदी यांनी हा 'एक है तो सेफ है' चा नारा दिला, जो या निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या प्रारंभातच चर्चित ठरून गेला. धुळ्यानंतरच्या नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेतही त्याची पुनरुक्ती केली गेल्याचे पाहता त्यातून भाजपाच्या वाटचालीची स्पष्टता होणारी आहे. 

अर्थात, जाहीर प्रचार सभांचा धडाका आताशी सुरू झाला आहे. विविध पक्षांच्या बाजूने आरोप प्रत्यारोपांचे मैदान गाजू लागले आहे. आगामी काळात यात भरच पडण्याची चिन्हे आहेत. खान्देशातील चोपडा, पाचोरा सारख्या जागांवर दोन्ही शिवसेनेत तर जळगाव शहर, चाळीसगाव, धुळे सारख्या ठिकाणी भाजपा व उद्धवसेनेत सामने होत असल्याने तेथे अधिक निकराचा प्रचार दिसतो आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे करून ठेवले आहे. एरंडोलमध्ये माजी खासदार ए.टी. पाटील यांनी बंड कायम ठेवले असून, नंदुरबार जिल्ह्यात मंत्री असलेले वडील विजयकुमार गावित भाजपाची उमेदवारी करत असताना त्यांच्या कन्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवामधून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अधिकृत पक्षीय उमेदवारांची अडचण झाली आहे. दुसरीकडे जागोजागच्या पोलिसांच्या तपासणीत लाखोंची बंडले हाती लागत आहेत. त्यामुळे मतदानाला राहिलेल्या दहा दिवसात प्रचार व स्पर्धा कोणत्या टोकाला पोहोचते हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

सारांशात, पंतप्रधान मोदी यांच्या सभेने खानदेशातील जाहीर प्रचारसभा सुरू झाल्या असून, यापुढील काळातही विविध मान्यवरांच्या तोफा धडाडणार आहेत. यातून मतदारांचे मतनिर्धारण व्हावे व मतदानाचा टक्का वाढावा हीच अपेक्षा.

Web Title: maharashtra assembly election 2024 BJP Narendra Modi Jalgaon Dhule nandurbar assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.