दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:47 AM2024-10-28T07:47:11+5:302024-10-28T07:48:20+5:30

Maharashtra Assembly Election 2024 :

Maharashtra Assembly Election 2024 : Diwali currency notes.. Battle for survival for every party! | दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!

दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराला निघताना कार्यकर्ते सकाळी चिवडा खायचे, दुपारी कुठेतरी भाजी-पोळी, वडापाव खायचे अन् पुन्हा प्रचाराला निघायचे असे एकेकाळचे दिवस होते. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते घरून डबे आणायचे. पुढे संदर्भ बदलले. निवडणुकांमध्ये पैशांचा खेळ सुरू झाला. पैसा कमावण्यासाठी सत्ता हे प्रभावी साधन आहे हे लक्षात येऊ लागले आणि निवडणुका महाग होऊ लागल्या. ‘तुमचाच गेरू, अन् तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा’ असा नारा थोर कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख यांच्या प्रचारावेळी भिंतींवर रंगविला जायचा. ते मंतरलेले, भारावलेले दिवस होते. ‘तुम्ही स. का. पाटलांना हरवणारच’ या जॉर्ज फर्नांडिस यांच्या भिंतीवर लिहिलेल्या एका घोषणेने त्यावेळी चमत्कार केला होता. राजकीय पक्षांना तत्त्वनिष्ठेची चाड होती. सामाजिक धाकही होता, अपप्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला सारले जायचे, भ्रष्ट नेत्याची टिंगल केली जायची. वाईटांना वाळीत टाकण्याचे सामाजिक भान त्यावेळी मौजुद होते.  

ऐंशीच्या दशकानंतर वातावरण बिघडत गेले. नव्वदीचे दशक येतायेता ते आणखीच बिघडले आणि नंतरच्या तीस-पस्तीस वर्षांत तर धनशक्तीच्या जोरावर जिंकण्याची जणू स्पर्धाच लागली. खासगी शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून शिक्षणसम्राट बनलेल्या नेतेमंडळींचे एक मोठे पीक आले. सहकाराच्या माध्यमातून आलेल्या समृद्धीतून स्वाहाकार सुरू झाला आणि सहकार महर्षींची जागा सहकारसम्राटांनी घेतली. शिक्षणमहर्षी केव्हाच लोप पावले आणि त्या जागी शिक्षणसम्राटांची मोठी फळी उभी राहिली. राजकारणी आणि नोकरशहा यांच्या संगनमतातून काळ्या पैशांची समांतर व्यवस्था निर्माण झाली. बाणेदारपणा सोडून नोकरशाहीने सत्ताधाऱ्यांचे बटीक होणे पसंत केले आणि गैरप्रकारांतून पैसा कमावण्याची वाट दोघांनीही धरली. पैशांचे आमिष दाखवून नियमबाह्य कामे करण्यासाठी दोघांची हातमिळवणी झाली.

पूर्वी आपल्या पक्षासाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रत्येक मतदारसंघात होती, ते प्रचारात प्राण ओतायचे, आता भाड्याने माणसे आणावी लागतात. समर्पित कार्यकर्ते ते भाडोत्री लोक असा हा प्रवास आहे. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते, खालचे कार्यकर्तेही गणित मांडू लागले की आपला नेता इतका पैसा कमावतो, निवडणुकीत त्याने केले पाचदहा कोटी खर्च तर काय बिघडले?  त्यातच धनदांडग्या नेत्यांनी पैशांची खैरात सुरू करत निवडणुका महाग करून टाकल्या. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात अशा धनवान बड्या नेत्यांची नावे, ‘निवडणुका महाग करण्याचे जनक’ म्हणून पटकन तुमच्या डोळ्यासमोर येतील.  व्हिटॅमिन ‘एम’चा (मनी) डोस दिल्याशिवाय मग आपली म्हणविणारी माणसेही उत्साहाने पुढे येणे कमी होत गेली. ज्यांच्याकडे पाहून निर्व्याजपणे झोकून द्यावे असे नेते राहिले नाहीत आणि ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे पायही राहिले नाहीत.  

आयुष्यभर आपण सतरंज्याच उचलायच्या आहेत, कारण पदे तर नेते आणि नेत्यांच्या घरातच फिरत राहणार आहेत हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते आपल्या कार्यकर्तापणाची किंमत मागू लागले, यात त्यांचेही काय चुकले म्हणा? यावेळी तर कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी आहे. प्रचारकाळातील लक्ष्मी आणि दिवाळीचे लक्ष्मीपूजन यांचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे उमेदवारांची निवडणूक थोडी महागही होईल; पण त्यांचे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांच्या दारावर नोटांची तोरणे लागायला हरकत नाही. दिवाळीनिमित्त सगळीकडे सेल लागत असतात, यावेळी निवडणुकीचा नवा सेल लागला आहे. आमदारकी मिळण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले सर्वपक्षीय उमेदवार  पैशांचा पाऊस पाडायला तयार आहेत. दोन्ही हातांनी भरभरून घेण्याची संधी कार्यकर्त्यांना चालून आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वच थोर नेतेमंडळींनी तत्त्वांना तिलांजली देऊन सत्तास्थापनेचे अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अचाट प्रयोग केले.

सगळे प्रमुख पक्ष एकाच पंचवार्षिकमध्ये विरोधकही बनले आणि सत्ताधारीही बनले, असा अद्भुत योग जुळून आला. आपण असे अफाट प्रयोग तर केले; पण लोकांना ते किती पसंत पडले? लोक त्याची ईव्हीएममध्ये नेमकी कशी प्रतिक्रिया देतील? - या विचाराने सर्वच मोठे पक्ष धास्तावलेले आहेत. प्रत्येक पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. कार्यकर्त्यांचे महत्त्व यावेळी कधी नव्हे एवढे वाढले आहे. या वाढलेल्या महत्त्वाचे मोल वसूल करण्याची नामी संधी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सर्वात मोठ्या सणाच्या काळात चालून आली आहे. नेत्यांनी प्रामाणिकपणा केव्हाच सोडला. कार्यकर्ते त्यांच्याच मार्गावर गेले तर त्यांना तरी नावे कशी ठेवावी?

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Diwali currency notes.. Battle for survival for every party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.