आजचा अग्रलेख: फाटके तोंड, घसरलेली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:23 AM2024-11-08T11:23:34+5:302024-11-08T11:31:12+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला २०२४ या वर्षी. योगायोगाने विधानसभेच्या निवडणुकाही याच वर्षात होत आहेत. प्रचारसभेतून उत्तमोत्तम भाषणे ऐकायला मिळतील, महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेणारे विचारधन कानावर पडेल, अशी आशा होती आणि आहे. पण

Maharashtra Assembly Election 2024: Today's Editorial: Cleft Mouth, Slipped Tongue | आजचा अग्रलेख: फाटके तोंड, घसरलेली जीभ

आजचा अग्रलेख: फाटके तोंड, घसरलेली जीभ

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला २०२४ या वर्षी. योगायोगाने विधानसभेच्या निवडणुकाही याच वर्षात होत आहेत. प्रचारसभेतून उत्तमोत्तम भाषणे ऐकायला मिळतील, महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेणारे विचारधन कानावर पडेल, अशी आशा होती आणि आहे. पण प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याझाल्याच खासदार अरविंद सावंत, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे समर्थक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या वाचाळ वृत्तीने मराठी संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सार्वजनिक जीवनात सभ्यतेचा वस्तुपाठ घालून देणारे यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर असताना या वाचाळवीरांनी महिलांच्या चारित्र्याचे जाहीरपणे धिंडवडे काढले आहेत. भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा उल्लेख होतो... एकेकाळी शेतकरी चळवळीत तुफान भाषणबाजी करणारे आणि भाजपच्या पाठिंब्याने आमदार झालेले सदाभाऊ खोत शरद पवार यांच्या आजारपणावरून व्यंग दर्शविणारी टीका करतात... ही मराठी माणसांची संस्कृती नाही. भाषण करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे वाट्टेल ते बोलण्याचा परवाना नव्हे. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी वक्तव्ये ही हीन दर्जाची भाषा आहे. सुजय विखे-पाटील डॉक्टर आहेत, खासदार होते. त्यांच्यासमोर त्यांचा समर्थक विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मुलीविषयी अश्लाघ्य भाषा वापरतो आणि त्याला विखे समर्थक टाळ्या वाजवून दाद देतात. ही कोणती संस्कृती आहे? शायना एन. सी. या आपल्या राहत्या भागाऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात यावरून विकृत टिप्पणी करणारी भाषा संसद सदस्य कशी वापरू शकतो? सदाभाऊ खोत यांना एकेकाळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तळमळीने धडाकेबाज भाषण करणारी तोफ म्हटले जायचे. त्या तोफेत राजकारणाचे पाणी गेले आणि ती धडाडण्याऐवजी फुसके बार काढू लागली. एकेरी उल्लेख करणे, शरद पवार यांच्या आजारपणावरून व्यंगात्मक बोलणे, हे सुसंस्कृत लोकप्रतिनिधींचे लक्षण म्हणावे का? विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते शरद पवार यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलले. कर्करोगावर मात करून उत्तम जगता येते, याचा वस्तुपाठ ज्यांनी समाजापुढे घालून दिला, अशा  ज्येष्ठ नेत्याच्या चेहऱ्याचा व्यंगात्मक उल्लेख करणे हा हीनपणा होय. सदाभाऊंच्या या अत्यंत असंस्कृत वक्तव्यावर व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी हसत होते, हे आणखी चीड आणणारे. खोत यांच्या भाषणानंतर फडणवीस बोलायला उठले तेव्हा त्यांनी खडसावून सांगायला हवे होते की, ‘सदाभाऊ, तुमची भाषा योग्य नाही.’ पण त्यांनीही तसे केले नाही. शरद पवार सार्वजनिक जीवनात वावरणारे राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. लोकशाहीत ते असलेही पाहिजे. पण जाहीरपणे बोलताना आपण कोणते शब्द, कोणती भाषा आणि कुठले संदर्भ वापरतो, याचे भान सुटता कामा नये. सदाभाऊंनी ते सोडले. कोणतीही व्यक्ती किंवा नेता परिपूर्ण नसतो. विचारात मतभिन्नता असू शकते. भारतीय लोकशाहीचे हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याची संधी घेत उद्याचा महाराष्ट्र कसा हवा, याचे उत्तम विवेचन व्यक्तिगत निंदा, नालस्ती न करता मांडता येऊ शकते. निवडणुकीचा प्रचार त्याचसाठी असतो. पण सध्या प्रचाराच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या धामधुमीत नेमका याचाच विसर पडलेला दिसतो. इतरांवर टीका करताना आपली पाटी किती मळलेली आहे, हे ध्यानी धरण्याचाही विवेक सद्यस्थितीत अनेकांनी गमावलेला दिसतो. सदाभाऊंनाही असेच सोयीस्कर विस्मरण झालेले असावे. त्यांचे स्वत:चे वर्तन, चारित्र्य आणि त्यांच्या ‘प्रगती’वर प्रश्नचिन्हे लावली गेलेली आहेत.   एखाद्याच्या व्यंगावर बोलत असताना आपल्या अंगातील सदरा किती स्वच्छ आहे, याचे थोडे चिंतन करायला हरकत नव्हती. सावंत असोत वा सदाभाऊ, टीका झाल्यावर या दोघांनीही माफी मागितली खरी; पण आधी तोंड फाटेपर्यंत वाट्टेल ते बोलून नंतर अंगावर उलटले की, माफी मागण्यात काय हशील आहे? जाणत्या लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यावर माफी मागण्याची अशी नामुष्की येते. अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल, तर सर्वच पक्षातल्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आपल्या फाटक्या तोंडाला विवेकाचा लगाम लावावा. आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत, म्हणून निवडणुकीच्या गलबल्यात जीभ घसरण्याला परवाना असता कामा नये. भाषेची अभिजातता दूर राहिली, किमान संस्कृती तरी राखा, म्हणजे झाले!

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Today's Editorial: Cleft Mouth, Slipped Tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.