कुठे नेऊन ठेवलाय..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 07:37 AM2023-06-10T07:37:55+5:302023-06-10T07:38:28+5:30
महाराष्ट्रात गत काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नऊ वर्षांपूर्वी विचारलेला प्रश्न आता भाजपलाच का विचारू नये, असा प्रश्न पडतो.
भारतीय जनता पक्षाने २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' या 'टॅगलाइन 'सह जाहिरातींची एक मालिका केली होती. पुढे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आज ते उपमुख्यमंत्री आहेत. गृह खात्याचा भारही त्यांच्याच खांद्यावर आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गत काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नऊ वर्षांपूर्वी विचारलेला प्रश्न आता भाजपलाच का विचारू नये, असा प्रश्न पडतो. गत काही दिवसांपासून राज्यात धार्मिक स्थळांच्या विटंबनांचे प्रकार सुरू आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा आणि समाजमाध्यमांवरील पोस्टचा रतीब सुरू आहे. काही ठिकाणी तर त्याचे पर्यवसान जातीय दंगलीत झाले.
कायद्याचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका येण्याजोग्या घटना राज्यात घडत आहेत. बलात्कार करुन विद्यार्थिनीची हत्या, महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घालण्याचा बीभत्स प्रकार. यांसारख्या घटनांमुळे राजधानी मुंबई हादरली आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्रच आहे की एखादे 'बिमारू राज्य, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उपरोल्लेखित मालिका कमी होती की काय, म्हणून शुक्रवारची सकाळ उगवली तीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने! तुमचा लवकरच दाभोलकर होणार, अशी धमकी पवार यांना देण्यात आली आहे. केवळ शरद पवारच नव्हे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनाही, रोज सकाळच्या पत्रकार परिषदा बंद न केल्यास बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करण्याची धमकी मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांचे प्रकार गांभीर्याने घेतले आहेत आणि पोलिसांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. धमक्या देण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींचा छडा लावणे पोलिसांसाठी फार कठीण काम ठरू नये. पोलीस लवकरच आरोपींपर्यंत पोहोचतील आणि सत्य काय ते बाहेर येईलच; परंतु कळीचा मुद्दा हा आहे, की काही वर्षापूर्वी सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची एवढी वैचारिक अधोगती कशी झाली, की पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळ राजकारणात घालवलेल्या एका वयोवृद्ध नेत्यास जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल जाते? संजय राऊत यांची ओळख आक्रमक नेता अशी आहे. त्यांची भाषा आणि शैली प्रसंगी कुणाला दुखवू शकते. शरद पवारांची तर तशीही ओळख नाही. एक अत्यंत सुसंस्कृत, संयमी, संयत भाषेत बोलणारा मृदुभाषी नेता अशीच त्यांची प्रतिमा आहे आणि तिला छेद जाईल, असे वर्तन त्यांच्याकडून कधीही घडले नाही.
ते केवळ राजकारणीच नाहीत, तर कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रांत गती व अभ्यास असलेला नेता, त्यामध्ये रमणारे अष्टावधानी व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख आहे. अशा नेत्यास जिवे मारण्याची धमकी देण्यास धजावणाऱ्याच्या मानसिक स्वास्थ्याची तपासणी करणे गरजेचे आहे. धमकी देणाऱ्याला पोलीस पकडतील व त्याला शिक्षाही होईल; पण केवळ त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. मुळात हा संघर्ष दोन व्यक्तींमधील नव्हे, तर दोन विचारधारांमधील, दोन प्रवृत्तीमधील आहे. एक व्यक्ती संपल्याने किंवा एका व्यक्तीस शिक्षा झाल्याने तो संघर्ष संपणार नाही. तसे असते तर नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आदींच्या हत्येनंतर ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करीत होते, ती विचारधारा केव्हाच संपली असती आणि आज धमकी देणाऱ्यास शरद पवारांना धमकी देण्याची गरजच भासली नसती.
महात्मा गांधींच्या हत्येला ७५ वर्षे उलटूनही गांधीविचार संपलेला नाही. उलट जगभर आणखी झळाळून निघत आहे. दुर्दैवाने, हिंसाचारावर विश्वास असणारे ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायलाच तयार नाहीत. हिंसेने व्यक्ती संपविता येते, तिचे विचार नाहीत! मध्ययुगीन कालखंडात लक्षावधी लोकांचे जीव घेऊन, शेकडो वर्षे या देशावर राज्य करूनही, विदेशी आक्रमक त्यांची विचारधारा या देशावर थोपू शकले नाहीत, मग आधुनिक काळात दोनचार व्यक्तींचे जीव घेऊन आपण आपली विचारधारा कशी काय थोपू शकू, याचा विचार त्या प्रवृत्तीच्या अनुयायांनी कधी तरी करायला हवा! तोवर 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' म्हणण्यावाचून प्रत्यवाय नाही!