अरं ऊठ की, काय पडलाईस रेड्यावानी...?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:51 AM2022-04-12T06:51:21+5:302022-04-12T06:52:53+5:30
कबड्डीत पैसा आला. आयपीएलमध्ये खेळांडूवर कोटींच्या बोली लागल्या आणि पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाला, तर त्याचे बक्षिसाचे लाख रुपये मिळतानाही ...
कबड्डीत पैसा आला. आयपीएलमध्ये खेळांडूवर कोटींच्या बोली लागल्या आणि पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाला, तर त्याचे बक्षिसाचे लाख रुपये मिळतानाही वांधे!
मैदान कुस्तीशौकिनांनी खचाचखच भरलेले.. कडाडणारी हलगी वातावरणाचा ताव वाढवत असते. घुमकं हलगीच्या तावाला आव्हान देत असतं. लालमातीचा अंगार फुललेला असतो. मैदानाच्या एका बाजूने मल्ल मैदानात येतो.. डोईला लालमातीचा टिळा लावतो.. उजवा पाय उचलून खाडकन शड्डू ठोकतो आणि वातावरणात रग निर्माण करतो. प्रतिस्पर्धी मल्लही तितक्याच दणक्यात शड्डू ठोकतो आणि मग खडाखडी सुरू होते.. कुस्ती रंगात आलेली असते. वस्ताद त्यातील धक वाढवता.. अरे ऊठ, काय पडलाईस रेड्यावानी..? - अशी हाळी देत कुस्ती तापवतात.. उभ्या महाराष्ट्राला आवडणारे हे दृश्य सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने कुस्तीशौकिनांनी अनुभवले. तब्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरच्या मातीतील मल्ल पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली.
कुस्ती हा लालमातीतला अत्यंत रांगडा खेळ. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवली. त्यासाठी रोम ऑलिम्पिक स्टेडियमच्या धर्तीवर देशातील कुस्तीचे पहिले मैदान बांधले. पूर्वी मल्ल जिंकला की त्याला पटका, नारळ व तोडा बक्षीस म्हणून द्यायचे. शाहू महाराजांनी कुस्तीतील ईर्षा वाढावी म्हणून १९१२ ला जिंकलेल्या मल्लाला चांदीची पहिली गदा दिली. राजाश्रय व लोकाश्रयामुळेच कुस्ती वाढली, फुलली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दीनानाथ सिंह, हरिश्चंद्र बिराजदार, युवराज पाटील या मल्लांनी एकेकाळी महाराष्ट्र आणि देश गाजवला; परंतु सध्याचे चित्र त्याला छेद देणारे आहे. शाहू महाराजांच्या काळात कोल्हापुरात तब्बल ८६ तालमी होत्या. आता कशाबशा चार-पाचच उरल्यात! कुस्ती पंढरीतूनच कुस्ती हद्दपार झाली, त्याला कारणेही अनेक आहेत.
उद्योजक, व्यावसायिकांची मुले क्रिकेटसह अन्य खेळांत जातात. कुस्तीत येणारी सर्व मुले ही शेतकऱ्यांचीच! एकत्र कुटुंब पद्धतीत कबिला मोठा असे. घरची एक-दोन पोरं तालमीत घालायची पद्धत होती. आता कुटुंबं विभक्त झाली, शेतीचे तुकडे पडले, आणि कुस्तीतला खर्चही वाढला. महाराष्ट्र केसरी दर्जाचा पैलवान घडवायचा तर महिन्याला किमान २५ हजार रुपये दूध-आहार व खुराकावर खर्चावे लागतात. या खेळात किमान दहा वर्षे तपश्चर्या करावी लागते. एक चांगला मल्ल घडविण्यासाठी किमान ३० लाख रुपये लागतात. पूर्वी साखर कारखाने आर्थिक मदत करायचे. गावोगावी जत्रा-यात्रांतून कुस्त्या व्हायच्या; त्यातून चांगले पैसे मिळायचे. हा लोकाश्रय कमी झाल्यामुळे कुस्तीकडील ओढा कमी झाला.
- तो वाढला पाहिजे यासाठी सरकारची धोरणेही पूरक नाहीत. पंजाब, दिल्ली, हरयाणामध्ये मल्ल राष्ट्रीय स्पर्धेत चमकला की त्याला लगेच नोकरी मिळते. आपल्याकडे आर्थिक विवंचनेपासून अनेक प्रश्नांचे ओझे मल्लाच्या मनावर असते. कुस्तीसारखाच रांगडा खेळ असणाऱ्या कबड्डीला व्यावसायिक स्वरूप आले. त्यात पैसा आला. आयपीएलमध्ये खेळांडूवर कोटींच्या बोली लागल्या आणि आमचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला तर त्याचे बक्षिसाचे लाख रुपये मिळतानाही वांधे असे चित्र आहे. मग कशी वाढणार कुस्ती आणि कोण उतरणार आखाड्यात?
ज्यांनी आयुष्यभर लालमातीची सेवा केली त्या हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांना सरकार दरमहा सहा हजार रुपये मानधन देते; परंतु ते नियमित मिळाल्याचा अनुभव नाही. आम्ही मेल्यावर शंभर रुपयांचा हारही वाट्याला येत नाही, अशी उद्विग्नता एका ज्येष्ठ मल्लाने व्यक्त केली आहे. पंजाब सरकार कुस्ती पाहून सरकारी नोकरी देते. आपल्याकडे महाराष्ट्र केसरींना थेट फौजदार करण्याची मागणी अनेक वर्षे हवेत आहे.
- असे असले तरी थोडी आशाही दिसते आहे. पुणे, कोल्हापूर येथील आखाड्यांत नवे कुस्तीगीर घडत आहेत. देशाला पहिले पाच हिंदकेसरी महाराष्ट्राने दिले आहेत. अनेक चांगले मल्ल कोल्हापूर, पुणे आणि महाराष्ट्राच्या मातीत घडत आहेत. त्यांच्या शड्डूचा आवाज ऑलिम्पिकपर्यंत घुमायचा असेल तर समाज व सरकारनेही त्यांना बळ दिले पाहिजे. जिंकलेल्या मल्लाला खांद्यावर उचलून घेतल्याने समाजाची जबाबदारी संपत नाही. तो जिंकावा यासाठीच समाजाने त्याला अगोदर खांद्यावर घेतल्यास महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाही.
- विश्वास पाटील, उप वृत्तसंपादक,
लोकमत, कोल्हापूर
vishwas.patil@lokmat.com