Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

By रवी टाले | Published: June 5, 2024 09:41 AM2024-06-05T09:41:13+5:302024-06-05T09:42:01+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ‘एकला चलो रे’ चा हट्ट न धरता काँग्रेसने राज्यात बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A tremendous revival of the covered Congress! | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

 - रवी टाले
(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण चर्चा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या अवतीभवती फिरत होती आणि प्रत्यक्ष निकालात मात्र फार चर्चेत नसलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला २३, एकत्रित शिवसेनेला १८, एकत्रित ‘राकाँ’ला चार, तर काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेना व ‘राकाँ’ची उभी शकले करीत, उभय पक्षांचा प्रत्येकी एक गट सोबत घेऊनही, भाजपला राज्यात जबर फटका बसला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या जागांची बेरीज केली तरी, त्यांचीही कामगिरी २०१९ च्या तुलनेत घसरलेली दिसते. याउलट काँग्रेसच्या जागांची संख्या तब्बल १२ पटींनी वाढली आहे, तर ‘राकाँ’च्या शरद पवार गटाची ताकदही जवळपास दुपटीने वाढलेली दिसत आहे.

हा निकाल बाहेरच्या निरीक्षकाला आश्चर्यजनक वाटू शकतो. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास असलेले मात्र त्यामुळे अचंबित होणार नाहीत. गत काही वर्षांत शिवसेना व भाजपच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस झाकोळली असली तरी, राज्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत. सतत धक्के बसूनही काँग्रेसने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही.  ‘एकला चलो रे’ ही भूमिका यापुढे चालणार नसल्याचे लक्षात घेऊन, बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्याचीच फळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निकालात चाखली आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष कधी एकत्र येतील, असा विचार काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही शिवला नसता. पण, ते केवळ एकत्रच आले नाहीत, तर एकमेकांना आपापल्या मतपेढ्यांचा लाभ पोहोचविण्यातही कमालीचे यशस्वी झाले. त्याचे श्रेय उभय पक्षांच्या नेत्यांना, की मतदारांच्या सुज्ञपणाला, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो. पण, राज्यात काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन झाले आहे, हे मात्र निश्चित ! 

त्यामध्ये सर्वाधिक योगदान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे. हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रदेश नेतृत्वाची असेल. दुर्दैवाने एवढी वाताहत होऊनही काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवरील लाथाळ्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही सुरूच होत्या. त्यातच राज्यात पक्षाकडे संपूर्ण राज्यात प्रभाव पडू शकणाऱ्या नेत्यांचा अभाव जाणवतो आणि पक्षाचा संघटनात्मक ढाचाही खिळखिळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवून ठेवायचे असल्यास, काँग्रेसला या सर्व आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल. काँग्रेसमधील लाथाळ्या बंद झाल्या, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील एखाद्या युवा आणि कर्तबगार नेत्याकडे विश्वासाने जबाबदारी सोपवून त्याला बळ दिले आणि संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यास प्राधान्य दिले, तर लोकसभा निवडणुकीत मिळविलेले क्रमांक एकचे स्थान भक्कम करता येईल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न आहेतच ! 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A tremendous revival of the covered Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.