Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

By श्रीनिवास नागे | Published: June 8, 2024 09:39 AM2024-06-08T09:39:55+5:302024-06-08T09:40:03+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्हं यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मतं खाऊन त्यांची कोंडी करायची, हे याहीवेळी झालंच!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: 'Names' and 'Symbols' that eat millions of votes | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

- श्रीनिवास नागे
(वरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड’)

‘नावात काय आहे’ या ऐवजी ‘नावातच सगळं आहे’ असं आता म्हणावं लागतंय! निवडणुकीच्या राजकारणात मतदान यंत्रावरची नावंच कळीचा मुद्दा ठरताहेत. निवडणूक कोणतीही असो, मातब्बर उमेदवारांच्या विरोधकांची पहिली खेळी असते, मातब्बरांच्या नामसाधर्म्याचे मतदार शोधून त्यांना  रिंगणात उतरविण्याची. ‘डमी’ उभे करायचे, मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांच्या मतांचं विभाजन करून त्यांची कोंडी करायची, अशी ही खेळी! महाराष्ट्रात हा ‘रायगड पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. १९९१ पासून  काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षानं हा ‘पॅटर्न’ सुरू केला.  १९९६ मध्ये तर चार ‘डमी’ दत्ता पाटील मैदानात उतरले होते.

यंदा रायगडमध्येच शिवसेनेच्या अनंत गितेंसोबत आणखी तीन ‘अनंत गिते’ रिंगणात होते! २०१४ मधल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंच्या नामसाधर्म्याचे उमेदवार सुनील श्याम तटकरे यांना अपक्ष म्हणून उतरवलं गेलं. त्यांनी दहा हजार मतं खाल्ली आणि  तटकरेंचा अनंत गितेंकडून दोन हजार मतांनी पराभव झाला. २०१९ मध्येही तीन ‘सुनील तटकरे’ उभे होते. त्यातले राष्ट्रवादीचे तटकरे निवडून आले, पण इतर दोघांनी १३ हजार मतं खाल्ली.

लोकसभेच्या २०१४ मधल्या निवडणुकीत छत्तीसगडच्या महासमुंद मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते चंदुलाल साहू आणि काँग्रेसचे तेव्हाचे सर्वांत मातब्बर नेते अजित जोगी लढत होते. चंदुलालना हरवण्यासाठी जोगींनी त्यांच्या नावाशी मिळत्याजुळत्या तब्बल १० चंदुलाल साहूंना अपक्ष उभं केलं! या सगळ्यांनी ६८ हजार २९४ मतं खाल्ली. यंदा या कूटनीतीत भर पडली चिन्हातील साधर्म्याची नाशिकमधल्या दिंडोरी मतदारसंघात शिक्षकी पेशातले भास्कर भगरे (सर) महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे होते. त्यांचं चिन्ह होतं, ‘तुतारी वाजवणारा माणूस’. विरोधकांनी चाल खेळली.

तिसरी उत्तीर्ण असणारे अपक्ष बाबू भगरे यांच्या नावापुढं कंसात ‘सर’ लावून ‘तुतारी’ चिन्ह दिलं गेलं. दोन्ही उमेदवारांचं काहीसं सारखं नाव आणि चिन्ह यामुळं मतदार संभ्रमात पडले. खऱ्या शिक्षकाचं मताधिक्य घटलं आणि प्रचारात कुठंही न दिसलेल्या बाबू भगरेंना १ लाख ३ हजार २९ मतं मिळाली. भास्कर भगरे यांच्या काही विरोधकांनीच बाबू भगरेंचा प्रचार करत नवव्या क्रमांकाचं बटण दाबण्याचं आवाहन केलं. यात ज्यांना फारसं लिहिता, वाचता येत नाही, अशा आदिवासी मतदारांनी भास्कर भगरे समजून नऊ नंबरचं बटण दाबलं! 
या लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रावर उमेदवारांचं नाव, पक्ष, निवडणूक चिन्ह आणि फोटोही होता, तरीही समान नावांचा आणि चिन्हांचा हा ‘फंडा’ चालवला गेलाच.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं चिन्ह आहे, ‘तुतारी वाजवणारा माणूस’. मात्र निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हांच्या यादीत ‘ट्रम्पेट’ या वाद्याचा उल्लेखही ‘तुतारी’ असा केलाय. त्याचा फायदा उठवत शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांत विरोधकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून त्यांना ‘तुतारी’ चिन्ह मिळण्याची तजवीज केली. मतदारांचा गोंधळ उडाला आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ऐवजी ‘तुतारी’वर मतं गेली. महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघांत या चिन्हानं चार लाखांवर मतं खाल्ली! निवडणुकीचं तंत्र बदललं, प्रचाराची पद्धत बदलली, तरी प्रबळ विरोधकांच्या नावांचं भांडवल करून (आणि आता तर चिन्हाचा गोंधळ उडवून) एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण मात्र तेजीतच राहणार, हे मात्र निश्चित.
 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024: 'Names' and 'Symbols' that eat millions of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.