Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज !

By वसंत भोसले | Published: June 5, 2024 10:27 AM2024-06-05T10:27:23+5:302024-06-05T10:28:15+5:30

सोबत आमदार नाहीत, ‘तयार’ उमेदवार नाहीत, तरीही शरद पवारांनी मोठ्या निकराने, हिमतीने किल्ला लढवला आणि राखला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: NCP Sharad Pawar fight! | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज !

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज !

 - डाॅ. वसंत भाेसले
(संपादक, लाेकमत, काेल्हापूर)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने बहुसंख्य आमदारांनी सत्तेला जवळ करीत अजित पवार गटात जाणे पसंत केले. राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयाेगाने त्यांना बहाल केले. अशा परिस्थितीतही शेलारमामाची भूमिका घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवी फळी निर्माण केली.  काँग्रेस शिवसेनेशी उत्तम संवाद साधत चाळीस अंश तापमान असतानाही तब्बल साठ सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला. मविआच्या जागा वाटपात शरद पवार गटास केवळ दहा जागा मिळाल्या. त्यापैकी बारामती, शिरूर आणि बीड वगळता इतरत्र उमेदवार देखील नव्हते. शिवाय बारामतीत पवार विरुद्ध पवार अशा आव्हानाचा सामना करायचा हाेता. 

आपल्या सहा दशकांच्या राजकीय अनुभवाचा कस लावत शरद पवार यांनी दहाही मतदारसंघात चांगले उमेदवार दिले.  रावेर लाेकसभा मतदारसंघात अपवाद साेडला तर सर्व जागांवर महायुतीला जबरदस्त आव्हान निर्माण केले. माढ्यात भाजपमध्ये गेलेल्या माेहिते-पाटील घराण्याला बाहेर काढले. साताऱ्यात खासदार श्रीनिवास पाटील लढणार नसल्याने शशिकांत शिंदे यांना तयार केले.

नगरमध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना बाजूला काढले. दिंडाेरीत भास्कर भामरे यांना बळ दिले. भिवंडी या काँग्रेसच्या मतदारसंघाची जबाबदारी घेऊन प्रथमच राष्ट्रवादी रिंगणात उतरवली आणि सर्वसामान्यांना आवडणारा सुरेश म्हस्के उर्फ बाळ्यामामा यांना खासदार बनवून टाकले. शिरूरमधून डाॅ. अमाेल काेल्हे आणि बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा खासदार म्हणून वावर असला तरी अजित पवार यांना निष्प्रभ करण्यासाठी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची माेट बांधली.

वर्धासारख्या विदर्भातील मतदारसंघातही अमर काळे यांना बळ दिले आणि रामदास तडस या तगड्या उमेदवाराचा दम काढला. वयाच्या ८४ व्या वर्षी राष्ट्रवादीच्या दहा मतदारसंघाशिवाय काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा प्रचार करीत पवार राज्यभर फिरले. ५४ पैकी ४० आमदार पक्ष साेडून गेल्यानंतरही  प्रकृती सांभाळत त्यांनी दिलेली लढत वाखाणण्यासारखीच हाेती. प्रचारात काेणतेही वाद निर्माण हाेईल, असे वक्तव्य न करता शरद पवार यांनी महायुती विराेधात एक माेठी माेहीम उघडल्याची भूमिका मांडली. 

राज्याचे राजकारण सांभाळत असताना सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना वगळून संपूर्ण पवार कुटुंबीयांना एकत्र केले. पारंपरिक विराेधक असणाऱ्यांना देखील साद घातली. शिवसेना आणि काँग्रेसला मदत केली तशी त्यांची मदत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना मिळविलेल्या यशाच्या पलीकडे शेलारमामांनी किल्ला लढवत यश मिळविले. 
  

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024: NCP Sharad Pawar fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.