सासरच्या परंपरेचं सुनेकडून पालन, भारती पवारांचं पक्षांतर
By किरण अग्रवाल | Published: March 22, 2019 02:27 PM2019-03-22T14:27:13+5:302019-03-22T14:29:03+5:30
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात तब्बल पाच दशकांची राजकीय कारकिर्द गाजविणाऱ्या स्व. ए. टी. पवार यांनी भारतीय लोकक्रांती दल ते राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस व भाजपा असा राजकिय प्रवास केल्याचे पाहता त्यांची स्नूषा डॉ. भारती पवार यांनीही भाजपात प्रवेश घेऊन सासरच्या परंपरेचेच पालन केले आहे.
किरण अग्रवाल
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात तब्बल पाच दशकांची राजकीय कारकिर्द गाजविणाऱ्या स्व. ए. टी. पवार यांनी भारतीय लोकक्रांती दल ते राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस व भाजपा असा राजकिय प्रवास केल्याचे पाहता त्यांची स्नूषा डॉ. भारती पवार यांनीही भाजपात प्रवेश घेऊन सासरच्या परंपरेचेच पालन केले आहे.
भारतीय कुटूंब व्यवस्थेत लग्नानंतर सासरी येणाऱ्या सुनेला सासरच्या प्रथा परंपरांचे अनुसरण करणे भाग पडते, नव्हे तेच त्यांच्याकडून अपेक्षिलेही जाते व त्यांचे कर्तव्यही ठरते. त्याचप्रमाणे राजकीय परिस्थितीतही बंडखोरी व पक्षांतराची परंपरा अनेक घराण्यांकडून कायम केली जाताना दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या डॉ. भारती पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व भाजपाचा झेंडा हाती घेऊन आपले श्वसुर स्व. अर्जुन तुळशीराम तथा ‘एटी’ पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. एटींनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्ष बदल केले होते तर डॉ. भारती यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी नवा राजकीय घरोबा केला आहे.
१९७१ पासून भारतीय लोकक्रांती दलाच्या माध्यमातून राजकारण केलेल्या ए टी पवार यांनी १९७२ मध्ये कळवण विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला होता. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १९७८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदही भूषविले होते. १९८० च्या निवडणूकीत काँग्रेसकडून विजय मिळवल्यानंतर १९८५ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागलेल्या एटींना ९० मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपाची वाट धरून उमेदवारी मिळवली व विजयही मिळवला. युती सरकारच्या काळात नऊ महिन्यांसाठी त्यांना आदिवासी विकास मंत्रीही करण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांचे बोट धरून ते राष्ट्रवादीत गेले व २००४ आणि २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेत निवडूनही गेले. सुमारे ४६ वर्षांच्या या राजकीय प्रवासात एटींनी चार पक्षांचे पाणी चाखले. कळवण या पूर्णपणे आदिवासी असलेल्या मतदारसंघात एटी हाच पक्ष अशीच परिस्थीती अधिकतर राहीली. परंतु तशीच परिस्थिती त्यांच्या स्नूषेबाबत राहील का याबाबत शंकाच बाळगता यावी.
महत्त्वाचे म्हणजे, लोकसभेच्या २००९ मधील निवडणूकीप्रसंगी ए टी पवार हेच लोकसभेसाठी इच्छुक होते. तेव्हा राष्ट्रवादीने नरहरी झिरवाळ यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या एटींनी कळवणमधील एका जाहीर सभेत छगन भुजबळ यांच्यासमक्ष ‘मी पक्षाला चालत नाही, मी आदिवासी आहे, काळा आहे’ अशी विधाने करून आपली नाराजी उघड करून दिली होती व तेवढ्यावरच न थांबता भाजपाच्या हरीश्चंद्र चव्हाण यांना मदत केली होती. वस्तुत: त्यावेळी भाजपाचे काही एक संघटनात्मक बळ दिंडोरी मतदार संघात नसताना एटींच्या सहकार्यानेच भाजपाला विजय मिळवता आला होता. त्यानंतर २०१४ मध्येही एटी पुन्हा इच्छूक होते. त्यावेळी त्यांची धाकटी स्नूषा जयश्री पवार यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले असल्याने त्यांची उमेदवारी पक्षातर्फे निश्चितही होती. परंतु सासऱ्यांसाठी जयश्री थांबल्या आणि वयोमानामुळे एटींऐवजी शिक्षीत उमेदवार म्हणून डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीने संधी दिली होती. अवघ्या दीड- दोन वर्षांच्या राजकिय वाटचालीवर म्हणजे अतिशय कमी कालवधीत डॉ. भारती यांना पक्षाने थेट लोकसभेच्या उमेदवारीची संधी दिली होती. तरी यंदा उमेदवारी बदलली म्हणून त्यांनी दल बदल केला.
सासरे ए टी पवार यांच्या प्रमाणेच त्यांच्या स्नूषा डॉ. भारती पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीला त्यागून भाजपाचे कमळ हाती धरले आहे, फरक एवढाच की, एटींपेक्षा कमी कालावधीत म्हणजेच अवघ्या सात वर्षात त्यांनी राजकीय रूळ बदलला आहे. २०१२ मध्ये त्या उमराणे गटातून जिल्हा परिषदेत निवडून गेल्या होत्या. २०१२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचीत जमातीसाठी राखीव झाले असता पंचायत समितीमधील कामकाजाच्या अनुभवाआधारे भारती यांच्या जाऊबाई सौ जयश्री पवार यांना संधी दिल्यापासून पवार कुटूंबियात मतभेदाची बीजे रोवली गेली होती. अर्थात, आता डॉ. भारती यांनी भाजपात प्रवेश घेतला असला तरी त्यांच्या जाऊ जयश्री आणि दीर नितीन पवार हे राष्ट्रवादीतच असून ते आगामी विधानसभा निवडणूकीतील तिकीटाचे प्रबळ दावेदार म्हणवतात. त्यामुळे डॉ. भारती यांचा पक्ष बदल कौटूंबिक पातळीवर कसा घेतला जातो यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. मात्र, भारती यांनी राजकारणात व त्यातही तिकीटासाठी सास-यांनी घालून दिलेल्या परंपरेचे पालन केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.